फक्त सरनाईकच नव्हे तर सेनेत अस्वस्थ असणाऱ्या नेत्यांची एक फौजच तयार झालेय….

काल लेटरबॉम्बमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं.  ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं. हे पत्र ९ जून रोजी लिहण्यात आलं होतं मात्र माध्यमांमधून ते पत्र काल प्रसारित झालं…

या पत्रात सरनाईक म्हणतात,

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल.

याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल, असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनातल्या भावना आपल्याला कळवल्या आहेत,

प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याची केलेली भाषा, कॉंग्रेस राष्ट्रवादीवर केलेले गंभीर आरोप यावर चर्चा सुरू आहे. राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या पद्धतीने तर्क मांडत आहेत. पण या सर्व जर-तर च्या गोष्टींमध्ये खरच सेनेचे नेते महाविकास आघाडी झाल्याने अस्वस्थ आहेत का? व त्यांची संख्या किती आहे हे पहाणे गरजेचे आहे.

१) शिवाजीराव आढळराव पाटील

Screenshot 2021 06 21 at 5.39.18 PM

सध्या शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त कोणाच्या अस्वस्थतेची चर्चा असेल तर ती म्हणजे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील. त्यातुनच ते भाजप मध्ये जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मागच्या एक वर्षापासून सांगत आहेत.

त्याचं कारण म्हणजे सध्या अमोल कोल्हे यांच्या रुपाने इथं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला महाविकास आघाडीने एकत्र निवडणूका लढल्यास हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडावा लागेल. कारण आघाडीत गतवर्षीच्या विजयी उमेदवाराला संबधित जागा सोडली जाते.

त्यातूनच आढळरावांनी स्वबळाचा नारा आपल्या फेसबुकवरून देण्यास सुरवात केली आहे.

त्यातुनच मार्च महिन्यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अढळराव पाटील भाजपमध्ये जाण्याचे निम्मित शोधत असल्याची टीका केली होती.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले होते,

पुढच्या वेळी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अढळराव पाटील नैराश्यग्रस्त आहेत, इकडे तिकीट मिळणार नसल्यानं ते भाजपात जाण्याची तयारी करत आहेत.

सोबतचं मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिरूर मतदारसंघात एक बातमी फिरवण्यात येत होती. त्यात अढळराव-पाटील यांनी नागपूर येथे जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असून ते लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्या बातमीचे कात्रण अनेकांनी सोशल मिडीवर फिरविले होते.

आता यात किती खरं – किती खोट हे अढळराव पाटील यांनाचं माहित. पण आगामी निवडणूकांच्या निमीत्ताने त्यांची अडचण होणार आहे म्हणा किंवा झाली आहे म्हणा दोन्ही एकचं गोष्टी आहेत. अढळराव भाजपमध्ये जातील की नाही हा नंतरचा विषय झाला मात्र शिवाजीराव अढळवार यांच्यासारखा मोठ्ठा नेता सेनेनं आघाडीसाठी गमावणं हे सेनेला कधीही परवडणार ठरणार नाही.

२. अनंत गिते 

Screenshot 2021 06 21 at 5.41.45 PM

रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. तर पालकमंत्री पद देखील राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात एकूणचं राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मांड पक्की केली आहे.

पण दुसऱ्या बाजूला एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यारुपाने रायगड मतदारसंघ शिवसेनेचा गड होता. पण आता आगामी काळात इथं राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला अडचण येणार हे नक्की. कारण आगामी काळात जर एकत्र निवडणूका लढल्या तर हा मतदारसंघ देखील सिटींग खासदार म्हणून राष्ट्रवादीला सोडावा लागेल.

अशा वेळी आता दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनंत गिते यांच्यापुढच्या अडचणी चांगल्याचं वाढणार आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न देखील निर्माण होईल.

शिवाय आताचं रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. पण अदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यामुळे जेव्हा चक्रीवादळ आणि स्थानिक विषयांतील काम येतात तेव्हा ती केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची होतात, अशी तक्रार घेऊन शिवसेनेचे हे तीन आमदार उद्धव ठाकरेंकडे गेले होते. अखेर, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना मध्यस्थी करावी लागली होती. यामुळे रायगड जिल्हा पुर्णपणे गमावण्याची वेळ सेनेवर येवू शकते.

३. गुलाबराव पाटील आणि सुरेश जैन

Screenshot 2021 06 21 at 5.43.22 PM

खान्देशात आणि विषेशतः जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या रुपाने सध्या एक मोठा चेहरा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. पण त्यांच्या पक्ष प्रवेशापासूनचं इथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला मिळतं आहे. ज्यावेळी खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर होते तेव्हा स्थानिक आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एका माध्यमाकडे प्रतिक्रिया दिली होती.

ते आमदार म्हणाले होते,

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाविकास आघाडीत अडचणी निर्माण होतील. माझा खडसेंसोबत असलेला संघर्ष कायम राहणार आहे. माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या अशी चर्चा काही दिवसांपूर्वीच मी आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याशी केली आहे.

हे जरी एका आमदाराचं मत असलं तरी थोड्या फार फरकानं शिवसेनेच्या सगळ्याचं स्थानिक नेत्यांचं असचं मत आहे. त्याचं कारणं म्हणजे जळगाव शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्यातील विळ्या भोपळ्याचं वैर. यात देखील गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.

खडसे भाजपमध्ये असताना देखील शिवसेनेचे स्थानिक नेते त्यांना मदत करत नव्हते आणि हि गोष्ट उघडपणे ते स्वतः माध्यमांमध्ये सांगायचे. त्यामुळेच आता खडसे राष्ट्रवादीत आल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि खडसे यांच्यातील वैर उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा सातत्यानं आरोप राहिला आहे की,

शिवसेनेला मदत करण्याची वेळ येते तेव्हा एकनाथ खडसे फारकत घेतात.

सोबतचं एकनाथ खडसे यांच्या रुपानं जळगावच्या राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा आपली ताकद वाढू बघत आहे. सध्या जळगावमध्ये अकरा पैकी राष्ट्रवादीचा एकचं आमदार आहे तर शिवसेनेचे पाच. त्यामुळेच स्थानिक शिवसेनेमध्ये जास्त अस्वस्थता आहे.

४. संजय जाधव :

Screenshot 2021 06 21 at 5.45.14 PM

मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नाराजीने अक्षरशः टोक गाठलं होतं. त्यातूनच त्यांनी आपला राजीनामा लिहून उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता.

महाविकास आघाडीतला सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच गळचेपी होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता.

त्यावेळी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली असा जाधव यांचा दावा होता. पण त्यातही इथे राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नसतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय जाधव नाराज झाले होते.

परभणी हा लोकसभा मतदारसंघ एखादा अपवाद वगळता मागच्या ३ दशकांपासून शिवसेनेचा गड राहिला आहे. मात्र त्यातुलनेत शिवसेनेनं परभणीला दिलं नसल्याचा आरोप सातत्यानं केला जात असतो.

दुसऱ्या बाजूला परभणीतल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येत. जिंतूर तालुक्यात दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या असून दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. सोबतचं पाथरी आणि सोनपेठ या भागातील बाजार समित्या देखील राष्ट्रवादीकडे आहेत.

त्यामुळे तिथं अशासकीय सदस्य देखील आपला नियुक्त केला जावा असा दावा राष्ट्रवादीने केला होता.

५. इतर नाराज नेत्यांची फळी :

यात एकचं नाही तर अनेक चेहरे आहेत. राजकीय जाणकारांच्या मते कदाचित याच नाराजांच नेतृत्व काल प्रताप सरनाईक यांनी पत्राच्या माध्यमातुन केलं असावं. कारण फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या वाट्याला संख्येनं मंत्रीपद जास्त होती. पण महाविकास आघाडीमध्ये मंत्रीपदांवर बंधन आहेत.

त्यामुळेच पहिल्या फळीतील अनेकांना मंत्रीपदापासून लांब राहवं लागलं आहे. यात काही ठळक नाव सांगायची झाली तर दिपक सावंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, दिवाकर रावते, रामदास कदम, रवींद्र वायकर, तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, दिपक केसरकर अशी सांगता येतील. शिवाय ज्या कोकणात शिवसेनेची ताकद आहे तिथं देखील शिवसेनेनं एकच मंत्रिपद दिलंय, ते उदय सामंत यांना

फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेले शिवसेना नेते दीपक सावंत यांनी तर एकदा जाहीरपणे म्हटलं होतं की,

“दीड वर्षं मी उद्धव ठाकरेंकडे काम मागतोय, मात्र मला काम दिलं जात नाही. पक्ष संघटनेत तरी काम द्यावं.”

प्रताप सरनाईक यांनी देखील मंत्रीपद न मिळाल्याने दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. ते म्हणाले होते,

पक्षाला आमची लायकी नाही, असं वाटलं असेल तर आम्ही दखल घेण्यास भाग पाडू.

त्यामुळे एकूणच आता प्रताप सरनाईक यांनी या पत्राच्या माध्यमातुन दिड वर्षानंतर शिवसेना नेतृत्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र आता आगामी काळात त्यांना मंत्रिपद मिळणार की सरनाईक यांच्या मागणीप्रमाणे शिवसेना पुन्हा भाजप सोबत जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.