पॅटर्न लक्षात आला का? पक्ष फोडल्याचा आरोप होतोय पण भाजप बंडखोरांना पक्षात घेत नाहीये

भारतीय जनता पक्ष आज देशातील सगळ्यात मजबूत पक्ष आहे. या ‘महाशक्तीला’ पुढच्या १०-१५ वर्षे तरी हरवणं शक्य नाही असं अनेक भाजप नेते अभिमानाने सांगतात. याचा विरोधकांना जेवढा धसका आहे तेवढाच धसका भाजपच्या आजी माजी मित्रपक्षांनी घेतला असेल.

विरोधी पक्षांना नामोहरम करणारं भाजप आपल्या मित्रपक्षांनाही सोडत नाहीये. ३५ वर्षे भाजपबरोबर युतीत राहिलेल्या शिवसेनेची काय अवस्था झाली आहे हे आपण बघतोय. अशीच अवस्था भाजपशी जवळपास तीन दशकं युतीत असलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) ची होऊ शकते असं जाणकार सांगतात.

कारण आहे माजी केंद्रीय मंत्री रामचंद्र प्रसाद (आरसीपी सिंग) यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू)चा  दिलेला राजीनामा. 

याच्या काही तासांपूर्वी पक्षाने काही आरसीपी सिंगांकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून स्पष्टीकरण मागितले होते.आरसीपी सिंग यांच्या मोदी मंत्रिमंडळात सामील होण्याला नितीश कुमार यांचा विरोध होता. मात्र पक्षाच्या विरोधात जाऊन आरसीपी सिंग केंद्रातल्या मोदी मंत्रिमंडळात जेडीयूच्या कोट्यातून सामील झाले होते. 

कधी काळी नितीश कुमार यांचे राइट हॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरसीपी सिंग यांनी केंद्रात गेल्यावर मात्र भाजपशी जवळीक साधण्यास सुरवात केली होती. त्यामुळंच नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग यांचा बरोबर गेम करताना त्यांना राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा तिकीट दिलं नाही आणि सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. 

आता त्यांनी जदयूमधून बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचं म्हटलं आहे. 

आरसीपी सिंग यांची भाजप नेतृत्वाशी असलेली जवळीक पाहता ते भाजपात प्रवेश करतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र या शक्यतेला फाटा देत त्यांनी आपला पक्ष काढण्याची घोषणा केली आहे आणि जनता दल हे डुबत जहाज असल्याने आमदारांनी आपल्यालबरोबर यावं असं अहवानही त्यांनी केलं आहे. 

आणि विशेष म्हणजे आरसीपी सिंग नितीश कुमार यांच्या पक्षाला भगदाड पाडून आमदार फोडूही शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप आणि जनता दलाचे संबंध बिघडल्याचं पाह्यला मिळतं. त्यामुळे भाजप आरसीपी सिंग यांना आमदार फोडण्यास रसद पुरवू शकतं असे कायसही बांधले जात आहेत.

त्यामुळे आरसीपी सिंग बिहारचे एकनाथ शिंदे ठरणार का? याकडे सगळ्यांचे येत्या काळात लक्ष असणार आहे.

मात्र यामुळेच अजून एक पॅटर्न समोर येत आहे तो म्हणजे भाजप आपले आजी माजी मित्र पक्ष तर फोडत आहे मात्र त्याचवेळी या पक्षातून फोडलेल्या बंडखोर आमदार खासदारांना सरळ पक्षात स्थापन करून घेत नाहीये. महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास शिवसेनेचं स्तिथी आपल्या डोळ्यापुढं आहे. एकनाथ शिंदे यांनी सेना नेतृत्व विरोधात बंड केलं. यात त्याला भाजपची साथ होती हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं आहे. 

मात्र त्याचवेळी शिंदे गटाने भाजपात प्रवेश केलेला नाहीये.

 जर शिंदे गटाने भाजपात प्रवेश केला तर त्यांना सध्या कोणताच कायदेशीर धोका नसणार आहे. मात्र तरीही शिंदे गट बाहेरच थांबून शिवसेनेवर दावा करत आहे. याआधीही जेव्हा राजू शेट्टींच्या पक्षात फूट पडली होती तेव्हाही असंच झालं. सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला भाजपाची फूस असल्याचे आरोप झाले आणि तरीही सदाभाऊ खोत यांनी भाजपमध्ये प्रवेश नं करता त्यांनी स्वतःचा रयत क्रांती संघटना हा पक्ष काढला.

याआधी उत्तरप्रदेशात जेव्हा अपना दलात फूट पडली होती तेव्हा देखील अनुप्रिया पटेल यांना पक्षात नं घेता भाजपने त्यांना अपना दलाच्या नावाचा उपयोग करून एक नवीन पक्ष स्थापन करण्यास प्रोत्साहित केलं होतं. लोकजनशक्ती पक्षात फूट पडली तेव्हा देखील हाच पॅटर्न. पशुपतीनाथ पारस यांनी ५ खासदारांना घेऊन बंडखोरी केली तेव्हा देखील त्यांना भाजपात प्रवेश नं देता लोकजनशक्ती पार्टी  उपयोग करून नवीन पक्ष स्थापन करण्यास सांगण्यात आलं. 

त्यामुळं भाजप या आमदारांना, खासदारांनां पक्षात नं घेता त्यांना नवीन पक्ष स्थापन करण्यास का सांगतं अशा प्रश्न पडतो. 

आणि त्याचं उत्तर शोधायचं म्हटल्यास ही पाच कारणं समोर येतात.

१)मित्रपक्षाला संपवायचा पाप डोक्यावर घ्यायचं नाहीये

२०१४ पासूनच सत्तेत आल्यानंतर भाजपवर मित्र नाराज असल्याचं दिसतात. शिरोमणी अकाली दल, तेलेगु देसम पार्टी, शिवसेना नंतरच्या काळात भाजपाला सोडून देखील गेले. त्यामुळे भविष्यात भाजपाला कोणी मित्र पक्ष उरेल का किंवा गरज असल्यास कोणता पक्ष युती करण्यास धजावेल का अशी स्तिथी आहे. त्यातच मित्रपक्षातील बंडखोर आमदारांना आपल्या पक्षात घेऊन  भाजपाला आपली प्रतिमा अजून मलिन करायची नसणार. त्यासाठी आम्ही मित्र पक्षाबरोबरच आहोत फक्त आम्ही त्या पक्षात फूट पडल्यानंतर एका गटाशी युती केली आहे असं भाजप सांगू शकतं. त्यामुळे अंतर्गत वादातून पक्ष फुटला आणि भाजपने दोघांपैकी एकाशी युती केली हे चित्र उभं करण्यास सोपं जातं आणि मित्रपक्षाला फोडल्याचं पापही डोक्यावर येत नाही.

२) आमदार खासदारांबरोबर पक्ष असेल तर मतदार आपल्याकडे वळेल याची ग्यारंटी

केवळ आमदार आणि खासदार घेऊन पक्ष वाढेलच असं नाही हे भाजपाला काही पक्षांतरांमध्ये लक्षात आलं आहे. त्याचवेळी जर आमदार खासदारांबरोबर त्यांचा पक्ष असला तर त्या पक्षाला मतदान करणारी एक विशिष्ट व्होटबँक देखील वळवता येते. पशुपतीनाथ पारस यांना नुसतं पक्षात घेतलं असता तर त्यांचाबरोबरच लोकजनशक्ती पक्षाला मतदान करणारी दलित वोटबँक भाजपच्या बरोबर आलीच असती असं नव्हतं. त्यामुळे पशुपतीनाथ पारस राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष असं नाव घेऊन पक्ष स्थापन  करतात तेव्हा त्यांना पक्षाच्या वोटबँकवर देखील आपल्याकडे वळवू शकतात. सदाभाऊ खोतांना रयत क्रांती संघटना स्थापन करण्यास सांगून शेतकऱ्यांचे नेतेही आमच्याकडे असल्याचा दावा करणं सोपं जातं.

३)मोठ्या नेत्यांची लीगसी देखील क्लेम करता येते

बहुसंख्य प्रादेशिक पक्ष पहिले तर ते एका नेत्याच्या करिष्म्यावर उभा राहिलेले दिसतात. भाजपशी युती करणारे पक्षही याला अपवाद नाहीत. त्यामुळे या पक्षातून बंडखोर करणारे आमदार, खासदार सरळ पक्षात घेतले तर त्यांच्या या मोठ्या नेत्यांची लीगसी क्लेम करता येनार नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास एकनाथ शिंदे यांनी जर सरळ भाजपात प्रवेश केला असता तर त्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण असं म्हणणं जड गेलं असतं. त्यामुळं भाजपात प्रवेश नं करता अनुप्रिया पटेल यांना अपना दल स्थापन करायला लावून भाजपाला सोनेलाल पटेल यांना मानणारा कुर्मी मतदार आपल्याकडे वळवता आला. तसंच बिहारमध्ये  रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपतीनाथ पारस यांना पुढं करून त्यांचा वारसा सांगता येऊ शकतो.

४)उपऱ्यांना घेतलं तर पक्षातील निष्टावंतांमध्ये नाराजी निर्माण होते

जेव्हा बाहेरील आमदार, खासदार यांना पक्षात घेतलं जातं तेव्हा निवडणुकीत ते निवडून आलेली जागाही त्यांना सोडावी लागते. यामुळे पक्षात वर्षानुवर्षे काम निष्टावंतांमध्ये नाराजी निर्माण होते. बंगालविधानसभेच्या आधी भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. यामुळं निष्टावंत नाराज झाले होते ज्याचा मोठा तोटा भाजपाला निवडणुकीत बसला होता. अशावेळी बंडखोरांना पक्षबाहेरच ठेऊन त्यांच्याशी युती करून हा प्रश्न सोडवता येतो. 

५)फुटलेल्या पक्ष कमकुवत झाला तर त्याची जागा विरोधी पक्ष घेऊ शकतात त्यामुळं पक्ष जिवंत ठेवला पाहिजे

जेव्हा एकदा पक्ष बंडखोरीमुळे कमजोर होतो तेव्हा त्या पक्षाचा लॉयल मतदार दुसरीकडे शिफ्ट होईल हे तर सरळ गणित आहे. मात्र त्याचवेळी  तो पक्ष गेल्याने निर्माण झालेली पोकळी विरोधी पक्ष भरून काढू शकतात. त्यामुळे जुन्या पक्षाचं अस्तित्व काही करून टिकवणे आवश्यक असतं. मग अशावेळी जुन्या पक्षाचंच नाव वापरून बंडखोरांना नवीन पक्ष स्थापन काण्यास सांगणं सोयीस्कर ठरतं. अशाने फुटलेल्या पक्षाचा मतदार जरी दोन गटात विभागला गेला तरी तो विरोधी पक्षाकडे जात नाही. म्हणजे जर शिवसेना पूर्णच संपली तर शिवसेनेच्या संपण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पुढे येऊ शकतात. मात्र त्याचवेळी जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट जिवंत ठेवला तर शिवसेनेचा मतदार या गटाकडे वळवता येऊ शकतो.

त्यामुळे या सर्व कारणांमुळे भाजपने हा नवीन पॅटर्न अंमलात आणल्याची शक्यता शक्यता सांगितली जाते.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.