योगींच्या मुस्लीम मंत्र्याने ‘मुस्लीम स्वातंत्र्यसैनिकां’बद्दल शिकवण्याचा निर्णय घेतलाय पण

हिंदूत्ववादी विचार आणि हिंदूत्ववादी सरकार म्हणून संपुर्ण भारतात सर्वात जास्त टिका कोणावर केली जात असेल तर ते योगी सरकार. पण याच योगी सरकारमार्फत एक निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे,

मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा..

पण या निर्णयात एक गोम आहे.. सर्वात पहिला निर्णय कोणी घेतलाय आणि का ते बघुया. तर युपीची अल्पसंख्यांक राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी ही योजना राबवायला सुरवात करणात आहेत. दानिश अन्सारी हे युपीच्या मंत्रीमंडळातले एकमेव मुस्लीम मंत्री आहेत.

आत्ता हा झाला निर्णय पण यात एक गोम आहे. गोम अशी की, सरसकट सर्वच मुलांना नाही तर फक्त मदरशात शिकणाऱ्या मुलांना मुस्लीम स्वांतंत्र्य सैनिकांचा इतिहास शिकवला जाणार आहे.

याबाबत अन्सारी म्हणाले आहेत की,

त्यांचा विभाग अल्पसंख्याक समाजातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती अभ्यासक्रमात जोडण्याचा विचार करत आहे. यात मदरशातील विद्यार्थ्यांना मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांविषयी शिकवणं, मदरशाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित मोबाइल प्लिकेशन उपलब्ध करून देणं आणि वक्फच्या मालमत्तांना ‘बेकायदेशीर व्यवसाया’पासून मुक्त करणं, या अजेंड्यांचा समावेश आहे.

अचानक याचा विचार का? 

उत्तर प्रदेशातील मदरशाच्या विद्यार्थ्यांना मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांविषयी शिकवणं, जेणेकरून विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यात त्यांच्या समाजाच्या योगदानाची माहिती मिळेल, हा यामागचा विचार आहे.

तर हे पाऊल म्हणजे गुन्हेगार आणि माफियांसाठी संदेश आहे की देशात कायद्याचे राज्य कायम राहील आणि भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही, असंही अन्सारी यांनी स्पष्ट केलंय.

यासाठी उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेच्या (यूपीटीईटी) धर्तीवर मदरसा शिक्षकांची भरती परीक्षा घेण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

योगी सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमपत्रिकेचा प्लॅन केला आहे.

त्यात मंत्रीमंडळातील प्रत्येक सदस्य मंत्र्यांना आपल्या प्राथमिकतेचा विचार करत योजना आखायची आहे, ज्यामध्ये अन्सारी यांनी त्यांची प्राथमिकता स्पष्ट केली आहे. ही मदरशांसाठी नवी संकल्पना असेल, असं लखनौचे मुस्लिम धर्मगुरू मौलाना सैफ अब्बास नक्वी यांनी द प्रिंटला सांगितलं.

यात नक्की कोणकोणत्या स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश असेल, हे आताच सांगता येणार नाहीये. कारण अजून नावं निश्चित झालेली नाहीत. तरी सगळ्यात पाहिलं नाव जे डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे अशफाकउल्ला खान, असं अन्सारी म्हणालेत. 

काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री धरमपाल सिंह यांनी “राज्यातील मदरशांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रवाद शिकवला जाईल” असं वक्तव्य केलं होतं. शिवाय उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाने राष्ट्रगीत म्हणणं आणि सकाळच्या प्रार्थनेसह राष्ट्रध्वज फडकवणं अनिवार्य करण्याचे देखील आदेश दिले होते. ज्याला “सकारात्मक पाऊल” असं अन्सारी म्हणाले आहेत.

तर मदरसा विद्यार्थ्यांना मोबाइल फोनवर त्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी खास मोबाइल ॲपही विकसित करणार असल्याची माहिती अन्सारी यांनी दिलीये. 

एकंदरीत पाहता सध्या उत्तरप्रदेशमध्ये ठरल्याप्रमाणे बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. युपीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना केवळ पारंपरिक शिक्षणाशी संबंधित न ठेवता डिजिटल युगाकडे नेत राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न साध्याचं सरकार करताना दिसत आहेत. 

मग हे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे दानिश अन्सारी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

२५ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये दानिश अन्सारी यांना नव्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले. यापूर्वी त्यांनी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलं होतं.

विद्यार्थी दशेपासूनच ऍक्टिव्ह असणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर पूर्वांचलमधील बलिया इथून आलेले दानिश आजाद अन्सारी हे मुस्लिम ओबीसीमधील अन्सारी समाजातुन येतात. आणि हेच कारण आहे भाजपने त्यांना मंत्रिमंडळातदेखील स्थान दिलं. 

मुस्लिमांमधला असा बहुसंख्य समूह ज्याला आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळालं नाही. अशाच मुस्लिम समाजातील बहुजनांना सर्व संधी मिळाव्या म्हणून मुस्लिम पसमंदा नावाची एक चळवळ सुरु झाली.. आणि यातूनच दानिश आझाद येतात.

ते नेहमींनीच मोदी आणि योगी समर्थक राहिले असून योगी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण नेत्यांपैकी एक आहेत. अवघ्या ३३ वर्षांच्या दानिश आझाद अन्सारी यांना दिग्गज राजकारण्याचा अनुभव नसला, तरी ते कल्पनांनी भरलेले आहेत. तर त्यांना काम करण्याची इच्छा असून त्यांनी अनेकदा ती व्यक्त देखील करून दाखवली आहे.

५२ सदस्यीय योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम चेहरा असलेले अन्सारी हे अल्पसंख्याकांमधील तरुणांसाठी, विशेषत: त्यांचे शिक्षण आणि नोकरीसाठी कार्यरत राहणं आणि तरुण मुस्लिमांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं जातं. त्यांनीच या नवीन बदलाची कल्पना मांडली आहे. 

दानिश आझाद हे पदभार संभाळल्यापासूनच चर्चेत आहेत. आता त्यांनी जो मदरशांमध्ये मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींबद्दल शिकवण्याचा निर्णय मांडलाय त्याकडे देखील क्रांतिकारक पाऊल म्हणून बघितलं जातंय. त्यामुळे अन्सारी यांच्या या पावलाने युपीमध्ये कोणतं नवीन वळण येणार आहे? हे बघणं गरजेचं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.