आता सौदी अरेबियाने सुद्धा तबलिगी जमातीवर बंदी घातली आहे

सौदी अरेबियाने सुन्नी मुस्लिमांमधील सर्वात मोठी संघटना तबलिगी जमातीवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाचं म्हणणं आहे की,

तबलिगी जमात संघटना समाजासाठी धोका आहे. ही संघटना दहशतवादाचे प्रवेशद्वार आहे.

जगाभरातील मुस्लिमांच्या हितांचे संरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे तबलिगी जमात संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पण ही तबलीगी जमात नेमकी आहे काय ? कारण भारतात सुद्धा कोविडच्या पहिल्या लाटेवेळी या जमातीने दिल्लीत कार्यक्रम घेतल्यावरून दंगा झाला होता.

तर तबलीगी जमातचा अर्थ आहे की अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे.

तबलीगी जमात ही एक धार्मिक संस्था आहे. १९२६ सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास कांधलवी यांनी ही संस्था स्थापन केली होती.

तबलीगी जमातीचा पहिला जाहीर कार्यक्रम १९४१ मध्ये झाला होता. त्यावेळी अंदाजे २५ हजार लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ही मुसलमानांची जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. याची केंद्रं १४० देशात आहेत. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरू असतो, म्हणजेच लोक इथं येत-जात राहतात.

तबलीगीच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम आहेत –

कलमा – कलमाचं वाचन करणे
सलात – दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
इल्म – इस्लामचं शिक्षण घेणे
इकराम ए मुस्लीम – मुस्लीम समुदायातील लोकांचा सन्मान करणे
इख्लास ए नियत – प्रामाणिक उद्देशाने काम करणे.
दावत ओ तबलीग – इस्लामचा प्रचार करणे

प्रचार कसा केला जातो ?
जमातीतील आठ ते दहा लोकांचा एक गट केला जातो. नंतर कोणत्या गटाने कुठं प्रचारासाठी जावं, हे सांगितलं जातं. ठरल्याप्रमाणे हे लोक गावोगाव जातात आणि तिथं इस्लामचा प्रचार करतात.

जे लोक त्यांच्यात सामील होतात त्या लोकांना इस्लामचं महत्त्व सांगितलं जातं. नमाज पठण झाल्यावर कुराणचं वाचन केलं जातं.

दिल्लीत काय दंगा झाला होता?

कोविडचं पहिलं लॉकडाऊन लागलं होतं. त्यावेळेस जमावबंदी होती. मात्र दिल्लीतल्या निजामुद्दीन इथली मुस्लिम संस्था तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातूनही या कार्यक्रमाला अनेकजण उपस्थित होते, अशी माहिती आहे. महाराष्ट्रात बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

परदेशातही होतात कार्यक्रम

तबलीगी जमातचे कार्यक्रम भारतातच होतात, असं नाही. त्यांचं जाळं भारताबाहेरही आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये तबलीगी कार्यरत आहे.

तबलीगी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मलेशियातील क्वालालांपूरमधील एका मशिदीमध्ये करण्यात आलं होतं. २७ फेब्रुवारी २०२० ते १ मार्च २०२० च्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या होत्या.

अल् जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

जगभरात एक प्रभावी आध्यात्मिक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमातचे कार्य आता पाकिस्तान आणि बांगलादेशातील गटबाजीचे बळी ठरले आहे.

सौदी अरेबियाचा विषय बघता इस्लामिक मंत्री डॉ. अब्दुलल्लातिफ अल शेख यांनी मशिदींना आणि मौलवींना शुक्रवारच्या नमाजादरम्यान तबलिगी संघटनेत सहभागी न होण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले होते.

या गटामुळे ब्रेनवॉश होण्याचा धोका असून दहशतवादाचे एक प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या संघटनेटच्या प्रमुख चुका लोकांसमोर आणण्याचे निर्देश मौलवींना देण्यात आले होते. ही संघटना समाजासाठी धोकादायक असून तबलिगीसह इतर पक्षपाती गटांशी संबंध ठेवणे बेकायदेशीर आहे, हे लोकांना सांगण्याचे निर्देश देण्यात आले.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.