जगाच्या पाठीवर, मोलकरीण ते हिंदीतला आनंद…सीमा देव यांची कारकीर्द खूप मोठी आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं.

वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांची सगळ्यात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका. ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. तसच दिवंगत आणि प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं हे बेस्ट कपल म्हणून ओळखलं जायचं. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडे सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती.

सीमा देव यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार जवळपास वर्षभर त्या वयोमानामुळे आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजारानेही ग्रासलं असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

सीमा देव यांचं माहेरचं नाव नलिनी सराफ. मुंबईतल्या गिरगावात त्यांचं अख्ख बालपण गेलं. त्यांनी शाळेत असल्यापासूनच नृत्याची आवड जोपासली होती. कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्या गाणं गायच्या. गाणं आणि नृत्याची आवड होती त्यामुळे त्यांची फिल्म दुनियेकडे ओढ जास्त होती. पण त्या होत्या सारस्वत गौड समाजातल्या आणि या समाजातल्या मुली किंवा महिलांनी गाण-बजावण करण म्हणजे त्यावेळी अपराध मानला जायचा, तरी सीमा देव यांनी मागे वळून पाहिलं नाही.

त्यांनी जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रीं सुद्धा अभिनय क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवत होत्या. खरतर एकंदरीतच महिलांसाठी या कळात फिल्मी दुनियेत काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. समाजाची बोलणी आणि नजरा यावर मात करत त्या पुढे आल्या आणि फक्त मराठीच नाही तर सीमा देव हे मराठी नाव पुढे हिंदी सिनेसृष्टीतही गाजलं. सीमा देव यांनी भूमिका केलेल्या सिनेमांची संख्या सुमारे ऐंशीच्या घरात आहे.

१९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केलं आणि तिथेच त्यांची भेट झाली होती रमेश देव यांच्यासोबत.

रमेश देव आणि सीमा देव पहिल्यांदा भेटले कसे होते हा किस्सा सुद्धा एकदम भारी आहे. सीमा देव गिरगावातच राहत असतानाची गोष्ट. सिनेसृष्टीत काहीतरी काम मिळणार या हेतूने सीमा देव आपल्या आईसोबत गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत जाण्यासाठी चर्नी रोड स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये चढल्या आणि पुढच्याच ग्रॅंट रोड स्टेशनवर रमेश देव नेमके याच डब्यात चढले आणि या दोघींच्या समोरच येऊन बसले. खरं तर सीमा देव यांच्या आईना पडद्यावरचे रमेश देव अजिबात आवडत नसत.

त्यात नेमके तेच समोर येऊन बसलेले. गोरेगाव स्टेशनवरच रमेश देव उतरले आणि त्यांनाही फिल्मीस्तान स्टुडिओतच जायच होत म्हणून ते चालत चालत निघाले. आता या दोघींना फिल्मीस्तान स्टुडिओ कुठे आहे हे माहित नव्हत. त्यामुळे त्या दोघी रमेश देव यांच्या मागोमाग चालतच फिल्मीस्तान स्टुडिओत पोहचल्या. फिल्मीस्तान त्यावेळी मराठी चित्रपटाची निर्मिती करत होतं.

तिथेच रमेश देव आणि नलिनी सराफ म्हणजेच सीमा देव या दोघांचीही स्क्रीन टेस्ट झाली आणि तेव्हा ‘आलिया भोगासी’ या चित्रपटासाठी ते भाऊ बहिणीच्या भूमिकेसाठी निवडले गेले. कालांतराने गोविंद सरय्या दिग्दर्शित ‘सरस्वतीचंद्र’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी भाऊ बहिणीची भूमिका साकारली.

जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे सीमा देव यांचे काही उल्लेखनीय मराठी सिनेमे म्हणता येतील.

नंदिनी, काळी बायको, जानकी, पोरींची धमाल बापाची कमाल, सर्जा, जिवा सखा, कुंकू या सिनेमांमध्येही त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या. शिवाय हिंदीतलं त्यांचं काम सांगायचं म्हणजे, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या सिनेमातली त्यांची भूमिका छोटी आहे पण लक्षात राहणारी आहे.

सीमाताईंनी अनेक वर्ष हिंदी सिनेमात लहान मोठ्या भूमिका साकारताना राजेश खन्ना, अमिताभ बच्चन तर झालेच शिवाय अनिल कपूर, गोविंदा, श्रीदेवी अशा किमान दोन पिढ्यांतल्या स्टारसोबत भूमिका साकारलेली आहे. आनंदमध्ये रमेश देव आणि सीमाताई पती पत्नीच्या भूमिकेत होते. परत ‘मैने तेरे लिए ही साथ रंग के सपने चुने’ या गाण्यात राजेश खन्नासोबत देव दाम्पत्य होतं.

१९८८ साली राजेश खन्नाने प्रोड्यूस केलेल्या जय जय शिव शंकर या चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

शिवाय भाभी की चूडियाँ, आँचल, प्रेमपत्र, ‘मियाँ बीबी राजी, तकदीर, हथकडी, मर्द हे सीमा देव यांचे हिंदी सिनेमेही बरेच गाजले. काही काळानंतर मात्र सीमा देव यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करण बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा देव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेऊन स्वत:ला संसारात गुंतवून घेतलं. पुढे आई म्हणून आपली कर्तव्य पार पाडत असताना, आयुष्याच्या एका टप्प्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देवच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.

२०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पण सीमा देव यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्या मोलकरीण या सिनेमातलं ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर’ हे गाणं कायम वाजत राहील हे नक्की. सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.