सचिनच्या द्विशतकाला डाग लावण्यासाठी, डेल स्टेननं रडीचा डाव खेळला होता

२४ फेब्रुवारी २०१०. १२ वर्ष झाली, तरी कोणताही क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकत नाही. ग्वाल्हेरच्या मैदानावर यादिवशी इतिहास रचला गेला होता. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच होती. कॅप्टन धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सेहवाग शेठ लवकर आऊट झाले, तीन नंबरला आलेला दिनेश कार्तिक मात्र आफ्रिकन बॉलिंग फोडून काढत होता. तरीही सगळ्यांचं लक्ष खिळलं होतं, सचिन तेंडुलकर वर.

कित्येक चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिननं त्यादिवशी क्रिकेटचं मैदान अक्षरश: गाजवलं. सेंच्युरी झाल्यावर त्यानं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आभाळाकडे पाहिलं. पण त्यादिवशी सेंच्युरीनंतर सचिन जरा अधिकच आक्रमक झाला. त्याच्या नावापुढचे रन्सचे आकडे पळत होते.

नशीब फुटलं की किती बेक्कार फुटतं, याचा अनुभव त्यादिवशी आफ्रिकन बॉलर्सला आला. सचिनची फटकेबाजी थांबत नव्हती आणि तेवढ्यात धोनी आला. धोनीनं पण धुवायला सुरुवात केली. तिकडं सचिननं दीडशेचा टप्पा पार केला, सगळीकडे आनंद पसरला. पुढचा टप्पा १७५, तोही पार. १८० झाले आणि सचिनची गाडी पोहचली १९० वर.

आता आनंदाची जागा टेन्शननं घेतली, कारण सचिन आणि नर्व्हस नाईंटीज ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ हे सगळ्या जगाला माहीत होतं. सचिनच्या रन्सच्या आकड्यांसोबतच ओव्हर्सही वाढत चालल्या होत्या. धोनीच्या हाणामारीमुळं सचिनला स्ट्राईक मिळेना. ४८ ओव्हर्स झाल्या तरी साहेब १९९ वर, ४९ ओव्हर्स झाल्या तरी साहेब १९९ वर. लास्ट सहा बॉलमध्ये स्ट्राईक मिळणार का आणि ती दोनशेची मॅजिक फिगर गाठली जाणार का? याची बेक्कार धाकधुक होती.

ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सचिन स्ट्राईकवर आला आणि गड्यानं पॉईंटला बॉल तटवत ती जगप्रसिद्ध सिंगल काढली. सगळ्या भारतात आनंद उसळला. वनडे क्रिकेटमध्ये आजवर कुठल्याच पुरुष क्रिकेटला न जमलेला विक्रम सचिन तेंडुलकरनं केला. त्यानी फक्त ५० ओव्हर्सच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकावली. शास्त्रीबुवांचा आवाज, पेपरची फ्रंटपेज आणि टीव्ही शो सगळीकडून सचिनवर कौतुकाचा पाऊस पडला.

मॅच झाली, सचिनचा रेकॉर्ड झाला, तो मोडलाही गेला. कधी कुणी दोनशे केल्यावर आणि प्रत्येक २४ फेब्रुवारीला त्याच्या दोनशेची आठवण होतेच. पण आणखी एका गोष्टीमुळं सचिनच्या या दोनशेची चर्चा झाली होती.

ती म्हणजे डेल स्टेनचा रडीचा डाव-

आपल्या पेस बॉलिंगची दहशत बसवणाऱ्या स्टेननं सचिनच्या दोनशेला दहा वर्ष उलटून गेल्यानंतर एक आरोप केला. तो म्हणाला, त्या मॅचवेळी सचिन १९० वैगेरे वर खेळत होता. त्यावेळी मी त्याला पायचीत पकडलेलं, माझ्यामते तरी तो आऊट होता. मी अपीलही केलं, पण अंपायर इयान गुल्डनं ते नाकारलं. मी कारण विचारलं, तर गुल्ड म्हणाले ”मित्रा आजूबाजूची लोकं बघ. मी जर आत्ता याला आऊट दिलं, तर परत हॉटेलवर जाऊ शकेल का?” म्हणून सचिन नॉटआऊट राहिला आणि त्याला दोनशे रन्स करता आले.

आता जसं स्टेन म्हणतोय, ते खरं मानलं तर सचिनच्या डबल सेंच्युरीला पद्धतशीर डाग लागतोय. पण गडी बॉलिंग खतरनाक टाकत असला, तरी बोलंदाजीमध्ये मात्र फेल गेलाय. कारण जर आकडेवारी आणि त्या मॅचमध्ये काय झालेलं हे धुंडाळलं, तर स्टेनभाऊ खोटं बोलतायत हे अगदी क्लिअर होतंय.

स्टेननं त्या मॅचमध्ये ६१ बॉल्स टाकले (एक नोबॉल पकडून सांगतोय.) त्यातले फक्त ३१ बॉल्स सचिन खेळला. सचिन स्ट्राईकवर असताना स्टेननं एकदाही एलबीडब्ल्यूचं अपील केलं नाही. स्टेन सचिनचा स्कोअर १९० असतानाचं गणित सांगतोय, म्हणल्यावर आपण जरा आणखी डीपमध्ये जाऊ. जेव्हा सचिन १९० च्या आसपास होता, तेव्हा तो स्टेनचे फक्त ३ बॉल्स खेळला आणि विशेष म्हणजे त्यातला एकपण पायाला लागला नाही. गडी तिन्ही बॉल बॅटनं खेळला. थोडक्यात काय, तर डबल सेंच्युरी थाटातच झाली होती. कुणी कितीही रडीचे डाव खेळले तरी.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.