ऑपरेशन ब्लू स्टार झाले नसते तर भिंद्रनवाले खलिस्तानची घोषणा करणार होता.

३० ऑक्टोंबर १९८४. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी भुवनेश्वरमध्ये भाषण करत होत्या.

“मुझे चिंता नही है की मै जिवीत रहूँ, या ना रहूँ. मेरी लंबी उमर रही है और, उसमें अगर मुझे किसी चिझ पर गौरव है तो वो है की मेरी सारी उमर सेवा मै बीत गयी है.”

याला संदर्भ होता ६ जून १९८४ या दिवसाचा.

६ जून १९८४. पवित्र शिख धर्मीयांच्या धार्मिक भावनांना छेद देत भारतीय सुरक्षा एजन्सीने ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ पुर्ण केले. पण त्यांच्या मते फुटीरतावादी ताकदींशी लढण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह ऑपरेशन असं याचं वर्णन केलं जात.

खलिस्तान चळवळीचा इतिहास :

१९७८ ला निरंकारी विरुद्धच्या संघर्षाने सुरवात झालेल्या पंजाबमधील या संघर्षाला बांगलादेश निर्मितीने चवताळून उठलेल्या पाकिस्तानने सक्रिय पाठिंबा दिला. पाकिस्तानमधील पंजाबमध्ये शीख तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना भारताविरुद्ध भडकविण्यात आले आणि मार्च १९८१ मध्ये स्वायत्त खलिस्तानचा झेंडा आनंदपुर साहिब वर फडकवण्यात आला.

यात प्रमुख होते जनरल सिंह भिद्रनवाले.

भिंद्रनवालेंला खरतर काँग्रेसनेच वर आणले होते. त्यामागे काँग्रेसचा उद्देश असा की शीख लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अकालींविरुद्ध अशी एखादी तरी व्यक्ती असावी जी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याला खीळ घालू शकेल.

पण भिंद्रनवाले हळू हळू कॉंग्रेसवरच आणि सरकावरच उलटू लागले, टिका करु लागले. वादग्रस्त मुद्द्यांवर भाषणे करत होते.

१९८२ साली भिंद्रनवाले चौक गुरुद्वारा सोडून आधी सुवर्ण मंदिरमध्ये गुरू नानक निवास आणि त्याच्या काही महिन्यानंतर अकाल तख्त वरून त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुरुवात केली.

डिसेंबर १९८३ मध्ये यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला. तेथेच आपले मुख्यालय स्थापन करून  त्यांनी सुवर्णमंदिरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जमवला.

इंदिरा गांधीनी चर्चेला प्राधान्य दिले :

इंदिरा गांधी यांना लष्करी कारवाई टाळायची होती. चर्चेच्या माध्यमातून ही समस्या सोडवायची होती. ऑपरेशन ब्लू स्टार सुरु करण्यापूर्वी त्यांनी भिंद्रनवाल्याला पत्र लिहिले होते. सोबतच शिरोमणि अकाली दलाचे तत्कालिन अध्यक्ष संत हरचंदसिंग लोंगोवाल यांनाही पत्र लिहिले होते.

म्हणजेच त्यांनी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यास प्राथमिकता दिली होती. पण शांततामय मार्गाने तोडगा निघाला तर नाहीच पण परिस्थिती बिकट झाली.

यानंतर सुरु झाले ऑपरेशन ब्लू स्टार

जनरल भिंद्रनवाले सिंह आणि त्यांचे समर्थकांना जेरबंद करण्यासाठी भारतीय सैन्याद्वारे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान एक लष्करी मोहीम चालवण्यात आली होती, तेच ऑपरेशन ब्लू स्टार होय.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशावरून, भारतीय सैन्य अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये  शिरले.

जेव्हा भिंद्रनवालेने मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरामध्ये भक्कम तटबंदी निर्माण केली तेव्हा भिंद्रनवालेला बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधीनी भारतीय सेनेकडून सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.

याचे नेतृत्व केले तत्कालिन भारतीय सेनाचा चीफ जनरल अरुण श्रीधर वैद्य, मेजर जनरल कुलदीप ब्रार, लेफ्टनंट जनरल सुंदरजीत यांनी.

भिंद्रनवाले मारले गेले पण पाकिस्तान मध्ये असल्याच्या बातम्या आल्या :

भारतीय सैन्याने २ जूनच्या रात्री आक्रमण केले आणि ३ जूनला पंजाब राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सैन्याने मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांवर हल्ला केला.

यात जनरल शाहबेग सिंग आणि भिंद्रनवाले मारले गेले. पण दुसऱ्या दिवशी भिंद्रनवाले पाकिस्तानला निघून गेले, अशा बातम्या येण्यास सुरुवात झाली.

पाकिस्तानी टीव्ही भिंद्रनवाले पाकिस्तानात आहेत, अशा आशयाच्या घोषणा करू लागले. त्यांना 30 जूनला टीव्हीवर दाखवलं जाणार अशाही घोषणा झाली.

पण जनरल ब्रार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

भिंद्रनवालेचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे. त्यांच्या अनुयायांनी अंतिम दर्शन घेतलं आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे.

५ जूनला रात्री सैन्याने सुरु केलेल्या या कारवाईमुळे ६ जूनला संध्याकाळपर्यंत सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या ताब्यातून सोडवण्यात आले होते.पण दुर्दैव म्हणजे शिखांच्या श्रद्धेचे केंद्र असलेलं अकाल तख्त या कारवाईत पूर्णपणे उध्वस्त झाले.

ऑपरेशन ब्लू स्टार नंतरचे परिणाम

ऑपरेशन ब्लू स्टार ज्यांच्या आदेशावरून झाले, त्या इंदिरा गांधींची दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून दिल्लीध्ये शीख समाजाविरोधात दंगली उसळल्या.

पुढे १३ वे सेना प्रमुख, जनरल ए.एस.वैद्य, ज्यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते, त्यांची सेवानिवृत्ती नंतर पुण्यामध्ये हत्या करण्यात आली.

१९९५ मध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची ही हत्या करण्यात आली.

टोरांटो-माँट्रियल-लंडन-दिल्ली असा मार्ग कापणारे एयर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले गेले आणि त्यात दुर्दैवाने सर्वच्या सर्व ३२९ प्रवासी मारले गेले.

पण एक गोष्ट मात्र नक्की की भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर भिंद्रनवाले खलिस्तानची घोषणा करणार होता. याची त्याने पूर्ण तयारी केली होती. त्याला पाकिस्तानचे प्रत्यक्ष पाठबळ होते. अमृतसरला खालिस्तानची राजधानी करण्याचा कट त्याने रचला होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.