बी टीम वगैरे सोडा. एमआयएमला बिहारचं राजकारण जमलं शिवसेनेला जमल नाही इतकचं..

बिहारचा निकाल लागला. नेहमी प्रमाणे मोदींनी सगळ्यांना धक्का देत धडाकेबाज कामगिरी केली. लालूंचे ३१ वर्षांचे युवराज तेजस्वी यादव यांनी त्यांच्या मानाने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत सर्वाधिक गंडले ते म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कॉंग्रेस.

नितीश कुमार यांचा गेम भाजपच्या सांगण्यावरून चिराग पासवान यांनी केला असं म्हणतात. तर कॉंग्रेसचा गेम नेहमीप्रमाणे असादुद्दिन ओवेसी यांनी केला. कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्या सारख्या नेत्यांचं म्हणणं आहे की ओवेसींची एमआयएम ही या निवडणुकीत भाजपला मदत म्हणूनच उतरली होती.

खरंच मुस्लिमांचा आवाज म्हणून ओळखली जाणारी एमएआयएम खरच भाजपची बी टीम म्हणून काम करते का?

एमआयएमची सुरवात हैद्राबादच्या निझामाच्या छत्रेछायेखाली वाढणारी संघटना म्हणून झाली. पुढे या संघटनेत कासीम रिझवी आला, त्यानेच वातावरण विखारी बनवलं. दंगली घडवून आणल्या, रझाकांरांच्याबरोबर हि संघटनादेखील बदनाम झाली.  निझाम बाजूला राहिला आणि या रिझवीच्या रझाकारांनी हिंदू धर्मीयांचे अत्याचार करण्यास सुरवात केली.

पुढे हैदराबाद संस्थान जेव्हा विलीन झाले तेव्हा कासीम रिझवी पाकिस्तानला पळून गेला जाताना तो हि संघटना औसा गावच्या अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे सोपवून गेला.

आजच्या असदुद्दिन ओवेसी आणि अकबर ओवेसीचे आजोबा. औवेसीच मुळ गाव लातूरजवळच औसा.  सल्लाउदिन हे औस्याचे तर कासिम रिझवी हा लातूरचा.

मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन ने नवीन नाव घेतलं नवीन नावं म्हणजे नावाच्या पुढे फक्त ऑल इंडिया लागलं. त्याचा शॉटफॉर्म A.I.M.I.M पण लोकांसाठी उल्लेख करताना आजही ती नुसती MIM असेल, तिथे ऑल इंडिया नावाचा शब्द रुळलाच नाही.

पुढे काय झालं तर MIM ने १९६० मध्ये पहिल्यांदा महानगरपालिका लढवली, पुढे विधानसभा लढली, चारमिनार हा मतदारसंघ कायम केला.  सलाहुद्दीन ओवेसी १९८४ साली पहिल्यांदा खासदार राहिले ते २००४ अखेर सलग निवडून आल. २००४ पासून असुउद्दीन ओवेसी हे त्यांचे पुत्र सलग खासदार म्हणून निवडून आले.

हे असुउद्दिन ओवेसी महत्वाकांक्षी आहेत. इंग्लंडच्या लिंकन इन या कॉलेजमधून त्यांनी बरिस्टरकीची डिग्री देखील मिळवली आहे. धूर्त हुशार ओवेसी यांनी हैदराबाद तेलंगना आंध्र येथे आपला पक्ष मोठा केलाच पण शिवाय एमआयएम याला भारताच्या कानाकोपऱ्यात न्यायचं ठरवलं.

आता एमआयएम हा पक्ष किती जरी नाही म्हटल तरी मुस्लीमांच नेतृत्व करणारा पक्ष आहे. गेली सत्तरवर्षे भारताच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम मतांवर पकड बनवून ठेवली आहे. जर एमआयएमला आपले मतदार वाढवायचे असतील तर त्यांना कॉंग्रेसला टार्गेट करणे भाग आहे.

आणि हेच ओवेसी करत आहेत.

अगदी महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाले तर एमआयएम गेल्या दोन विधानसभा निवडणुका आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मतदारांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यांचे काही आमदार खासदार देखील निवडून येताना दिसतात.

ओवेसी यांच म्हणणं हे की

कॉंग्रेस मुस्लिमांच्या तोंडावरून हात फिरवते मात्र त्यांच्या काळात मुसलमानांचा काहीही फायदा झाला नाही. मुस्लिम समाज गाळातच राहिला.

एमआयएमने या असंतुष्ट मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास मेहनत घेतली. याचाच फायदा त्यांना बिहार मध्ये देखील झाला.

बिहार मधील सीमांचल हा भारतातला अतिमागास प्रदेश मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली, नेहरूंच्या पासून ते मोदींच्या पर्यंत अनेक सरकारे आली.मात्र या भागाचा विकास कोणीही करू शकलेले नाही. इथे मुस्लिमांचे प्रमाण मोठे आहेच पण शिवाय दलित व मागासवर्गीय जातींचे प्रमाण देखील भरपूर आहे.

ओवेसीनी त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले. त्यांचे व्यवस्थित नियोजन, तरुण व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार यामुळे तिथले मतदार कॉंग्रेस आणि आरजेडीच्या घराणेशाहीच्या उमेदवारांकडून त्यांच्या दिशेने वळाले. कधी नव्हे ते एमआयएमने बिहारमध्ये आपले पाय रोवले आणि पाच उमेदवार निवडणून आणले. महागटबंधनचे आमदार कमी झाले याचा फायदा शेवटी भाजपने उठवला तर त्यात त्यांची काय चूक?

आज काही पत्रकार म्हणत आहेत की ओवेसीनी मुसलमानांचे मत फोडले आणि यात कॉंग्रेसचे नुकसान झाले.

जर हाच न्याय लावायचा झाला तर हिंदुत्वावर मत मागणाऱ्या शिवसेनेने देखील आपले अनेक उमेदवार  बिहार निवडणुकीत उभे केले होते, भाजपची जी कट्टर हिंदुत्वादी मते होती त्यांना आपल्या कडे वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना डिपॉझीट देखील वाचवता आले नाही.

शेवटी राजकारण हा डावप्रतिडाव यांचा गेम आहे, यात ओवेसी यशस्वी ठरले आणि शिवसेना फेल गेली बाकी यात विशेष असं काही नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.