मुस्लीम सुफी संताच्या भूमीने दिलाय पाकिस्तानी हिंदूंना सहारा !!
काल नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पास झाले. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. हे विधेयक मुसलमानांवर अन्याय करणारे आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर बाधा आणणारे आहे असे काही जणांचे म्हणणे आहे. या विधेयकावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात लोकसभेत गरमागरम वाद झाले, एवढच काय तर संपूर्ण देश या विधेयकावरून दोन भागात विभागला गेलाय.
पण दिल्लीतला एक एरिया आहे जिथे हे विधेयक पास झाल्याबद्दल दिवाळी साजरी करण्यात आली.
मजनू का टिला
दिल्लीमध्ये यमुना नदीच्या काठावरचा हा भाग. खूप वर्षापूर्वी अब्दुल्ला नावाचा एक सुफी संत होता. आपल्या नावेतून लोकांना फुकटात नदी पार करून द्यायचा. लोक त्याला विचारायचे तू पैसे का घेत नाहीस तर म्हणायचा की ये अल्लाह का काम है. त्याच्या अशा या वागण्यावरून त्याच नाव मजनू पडल होतं.
या मजनूची किर्ती शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी मजनू बाबाची भेट घेतली. त्याच्या जवळ महिनाभर निवास केला.
पुढे या मजनू बाबाच्या आणि गुरु नानक भेटीच्या आठवणी खातर एका शीख सरदाराने तिथे गुरुद्वारा बांधला आणि नाव दिले मजनू का टिला. दिल्लीमधला हा पहिला गुरुद्वारा असावा. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जेव्हा ब्रिटीश सरकारने नवी दिल्ली वसवायचं ठरवलं तेव्हा त्यांनी बिहार झारखंडमधून अनेक कामगार इथेच आणून ठेवले.
साधारण १९५९ च्या दरम्यान तिबेटवर चीनने आपल्या पोलादी हाताचा विळखा आवळला तेव्हा दलाई लामांच्या सोबत हजारो तिबेटीयन भारतात आले. या रिफ्युजीना नेहरूंच्या सरकारने या मजनू का टीलामध्येच वसवलं. १९६२ सालच्या भारत चीन युद्धानंतर तिबेटीयन रिफ्युजींचा ओघ वाढला. त्यांची संख्या इतकी झाली की या भागाला दिल्लीकर छोटा तिबेट म्हणून ओळखू लागले.
तिबेटकरांनी या मजनू का टीलाला आपलं घर मानल. तिबेटची खाद्य संस्कृती, तिबेटीयन वस्तूंचे शॉपिंग यासाठी दिल्लीला आलेले पर्यटक खास मजनू का टिलाला भेट देतात.
याच मजनू का टिला मध्ये २०१४ साली काही नवीन पाहुणे आले. तेही थेट पाकिस्तानहून. ते होते हिंदू रिफ्युजी!!
पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात राहणारे हे हिंदू कुटुंब तीर्थयात्रेचा व्हिसा घेऊन भारतात आले ते परत गेलेच नाहीत. त्यांना या मजनू की टिला मध्येच राहण्याची व्यवस्था करण्यात आली. छोटे छोटे तंबू, झोपड्या मध्ये राहणारे हे पाकिस्तानी हिंदू निर्वासित थोडेथोडके नाहीत तर जवळपास ७०० जण आहेत.
१९४७ साली फाळणीवेळी पाकिस्तानहून आलेले हिंदू लोक इथून जवळच राहिलेले. त्यांना पुढे भारत सरकारने सामावून घेतले.
मात्र आता आलेल्या निर्वासितांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याबाबत कोणताही कायदा देखील नसल्यामुळे कोणतीही नोकरी करता येत नव्हती. जवळपास सुरु असणाऱ्या बांधकामच्या साईटवर जाऊन थोडे फार काम मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट असायचे. त्यातून दिवसाला २००-३०० एवढीच काय ती कमाई व्हायची.
पाकिस्तानमध्ये ४०-५० एकर जमिनीचे मालक असणाऱ्यांना भारतात आल्यावर जेवणाचीही भ्रांत असायची. रोगराई, साथीचे रोग यावर उपचारासाठी सुद्धा काही व्यवस्था नव्हती. काही वर्षांपूर्वी तिथे आग लागली त्यातही अनेक रीफ्युजींचे नुकसान झाले.
मात्र तरीही हे पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात जाण्यास तयार नव्हते. भारत हीच आमची माता आहे आणि इथेच आम्हाला आज ना उद्या न्याय मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करायचे.
गेली पाच सहावर्षे काही धार्मिक संघटना, गुरुद्वारा आणि तिबेटीयन कम्युनिटीकडून व्यवस्था करण्यात आलेल्या लंगरवर त्यांची खाण्याची व्यवस्था होत होती.
काही एनजीओमार्फेत त्यांच्या मुलांची शाळा सुरु होती. त्यातच कालचा मोदी सरकारचा हा निर्णय आल्यावर आपल्याला न्याय मिळेल याची त्यांना खात्री मिळाली आहे. आपल्या मुलांचे भविष्य भीतीच्या छायेतून बाहेर निघेल आणि सन्मानाने जगता येईल असा विश्वासत्यांना वाटतो आहे.
एका मुस्लीम सुफी संत आणि शीख धर्माच्या संस्थापकाच्या भेटीने पावन झालेली, दूर परदेशी तिबेटीयननां सहारा देणारी ही मजनू का टिलाची सर्वधर्मसमभाव जपणारी भूमी आता हिंदू रिफ्युजीना सुद्धा त्यांचं हक्काच घर मिळवून देईल यात शंका नाही.
हे ही वाच भिडू.
- उपकाराची परतफेड म्हणून पोलंडदेशाचे नागरिक कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करणार.
- होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर भारताचं राष्ट्रपती भवन उभं आहे.
- चिकन तंदुरी, बटर चिकन, दाल मखनीचा शोध या माणसाने लावला.