पेगाससच्या टार्गेट लिस्टवरची लोकं सरकारसाठी घातक आहेत का?

पेगासस प्रोजेक्टचा काल सकाळ पासनचं बूम उठलाय. देशातल्या सगळ्याच माध्यमात फक्त पेगासस आणि पेगाससची टार्गेट लिस्ट दिसायला लागली आहे. आज दिवसभरात ३०० च्या वर हिटलिस्टमधली  नावं आली आहेत. यात अजून भर पडणार आहेच. म्हणजे द वायरने दिलेल्या बातमीनुसार एकूण ५० हजार लोकांच्या फोनमध्ये हा स्पायवेयर सोडण्यात आला होता.

आता फक्त विरोधकच नाहीत तर देशातल्या सत्ताधारी गटाच्या मंत्र्यांची नावंसुद्धा या लिस्ट मध्ये आहेत. 

काय आहे पेगासस 

पेगासस स्पायवेयर बनवणारी एक इस्रायली कंपनी आहे. हा स्पायवेयर iPhone किंवा एंड्रॉयड फोन मध्ये सोडला जातो. या स्पायवेअरच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांब बसून सर्विलांस डिवाइसच्या मदतीनं फोन कॉल, फोटो, कॅमेरा, लोकेशन, मॅसेज, आणि फोन कॉल रेकॉर्ड करता येत.

आता हि कंपनी म्हणते की, आम्ही फक्त सरकारच्या आदेशावरच काम करतो तर भारत सरकार म्हणतंय आम्ही अशाप्रकारे हेरगिरी केलेली नाही. 

आपला विषय कोणी हेरगिरी केली तो नाही. तर ज्यांची हेरगिरी झाली त्यांच्यापासून सरकारला काही धोका आहे का ? किंवा यांनी सरकारच्या वाकड्यात कधी पाय घातलाय काय हे बघणं आहे.

यातलं सुरवातीचं नावच राहुल गांधींचं आहे आणि ते असायला ही हवं.

कारण आजच्य घडीला सरकारला प्रत्येक विषयावर नडणारा विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींची ओळख आहे. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार राहुल गांधींची दोन वेळा हेरगिरी करण्यात आली आहे. त्यांचे दोन नंबर सर्विलांससाठी निवडण्यात आले होते.

द गार्डियन ने दिलेल्या वृत्तानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर काही महिन्यांनी राहुल गांधींची माहिती मागवण्यात आली होती. त्याचबरोबर राहुल गांधींच्या जवळच्या पाच मित्रांसमवेत काँग्रेसचे प्रमुख नेते संभावित टार्गेट साठी निवडले गेले होते.

रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यावर सुद्धा हेरगिरी करण्यात आली आहे.

आजच्या घडीला भारताच्या राजकारणात महत्वपूर्ण असणारे आणि बहुचर्चित अशा तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणारे प्रशांत किशोर यांचा नंबर सर्विलांससाठी निवडण्यात आला होता. राहुल गांधींचे फोन फॉरेन्सिक ऍनालिसीसी पाठवण्यात आले होते मात्र त्यांच्या फोनचे ऍनालिसीस झाले नाही.

पण प्रशांत किशोर यांचा फोन पाठवला होता तेव्हा ऍनालिसिस होऊन पेगासस या स्पायवेयरद्वारे त्यांचा फोन हॅक करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

एमनेस्टी सिक्युरिटी लॅब यांनी या फोन एग्झामिनेशन केलं तेव्हा एप्रिल मध्ये हा स्पायवेअर ऍक्टिव्ह असल्याची माहिती मिळाली. यात प्रशांत किशोर यांचे फोन कॉल्स, इमेल आणि मॅसेज पश्चिम बंगालच्या निवडणुकी दरम्यान हॅक करण्यात आले.

प्रशांत किशोर यांच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जीचा फोन सुद्धा निवडणुकांदरम्यान हॅक करण्यात आला होता. 

वायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांचाही समावेश 

भारताच्या प्रमुख वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग या वेल्लोर स्थित क्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी मे महिन्यात सरकारच्या लसीकरण धोरणांवर शंका उपस्थित केली होती.

तसंच क्लीनिकल वैज्ञानिक आणि ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान प्रौद्योगिकी संस्थान (टीएचएसटीआई) च्या कार्यकारी निदेशक पदाचा त्यांनी २०२० मध्ये राजीनामा दिला होता. राजीनामा देण्याचं कारण वैयक्तिक असलं तरी सरकारच्या धोरणांशी मतभेद असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. गगनदीप कांग या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या (WHO) वॅक्सीन रिसर्च आणि वापराच्या सल्लागार समितीत सदस्य आहेत.

रंजन गोगोई या मुख्य न्यायाधीशांच यात नाव आलं. 

सुप्रीम कोर्टातल्या मुख्य न्यायाधीश पदी असणाऱ्या रंजन गोगोईंवर त्यांच्याच ३५ वर्षाच्या जुनियर कोर्ट असिटेटन्टने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. भारताच्या न्यायपालिकेत पहिल्यांदाच असं घडलं आहे, की मुख्य न्यायाधीशांवर असे आरोप लागलेत. आता त्याच महिलेसमवेत तिच्या पतीच्या आणि ११ नातेवाईंकांच्या फोनमध्ये हा स्पायवेअर सोडण्यात आला होता.

विश्वहिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया

विहिंपचे प्रवीण तोगडिया आणि मोदींमधून विस्तव ही आडवा जात नाही. पण हेच दोघे एकेकाळी एकाच स्कुटरवरून कार्यकर्त्यांना भेटत असतं. अगदी जय आणि वीरू सारखं. पण २००२ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर या दोघांचं वाजलं. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत विहिंपने मोदींना पाठीमागून विरोध केला होता.

प्रवीण तोगड़िया सौराष्ट्रातल्या पटेल समुदायातून आहेत. आणि त्यांनी हार्दिक पटेलला पडद्याआडून मदत केली होती असं हि म्हंटल जात. याशिवाय संघ आणि भाजपला प्रवीण तोगडिया विंहिपच्या प्रमुखपदी नको असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यांच्यावर या विषयातून हेरगिरी झाली असण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या बंडखोर वसुंधराराजे सिंदिया

राजस्थानच्या वसुंधरा राजे यांना पक्षात मिळत असलेल्या दुय्यम दर्जामुळे त्या नाराज आहेत. वसुंधरा राजे यांनी आजवर अनेकांना आव्हान दिली आहेत. यातून मोदी शहा ही सुटलेले नाहीत. पण पंगे घेण्याची राजेंची आजची वेळ नाही. तर या आधी ही त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला डोळे दाखवलेत. त्यामुळंच की काय त्यांच्या फोनवर स्पायवेअरच डोळे गेले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल 

भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचं नाव ही या यादीत समाविष्ट आहे. ते तर भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत तरी ही त्यांच्यापासून ते त्यांच्या घरातले सदस्य, त्यांचे राजकीय सल्लागार, कुक, गार्डनर, आणि वैयक्तिक स्टाफ पण सर्विलांस मध्ये आला आहे.

अशोक लवासा 

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यातून सुटले नाहीत. त्यांनी २०२० सालीचा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते फिलिपिन्सच्या आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्ष पदी विराजमान आहेत. त्यांनी २०१८ ला जेव्हा निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार घेतला तेव्हा त्यांचा फोन सर्विलांस मध्ये आला आहे.

अशाप्रकारे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी, राहुल गांधींचा सोशल मीडिया प्रमुख अलंकार सवाई, ४० पत्रकार, विरोधी नेते, एनजीओ पासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांचाच कार्यक्रम या पेगासस स्पायवेअरनं केलाय. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.