ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हे ४ भारत-पाकिस्तान वंशाचे चेहरे टॉपवर आहेत

महाराष्ट्रात जशा वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आहेत आणि घडत आहेत – बंड झालं, सरकार पडलं, नवीन सरकार स्थापन झालं आणि आता पक्षाच्या चिन्हावरून प्रकरण तापतंय… या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एका देशात अशाच नाटकीय घडामोडी घडल्या आहेत.

देश आहे ब्रिटन. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या बोरिस यांनी स्वत:च्याच खासदारांचं समर्थन आज गमावलं आहे. गेल्या ३ तासात त्यांच्या ५० हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काहीच तासांपूर्वी मंत्री झालेल्या मिशेल डोनलन यांनी देखील राजीनामा दिलाय.

बोरिस यांच्या विरोधात कॅबिनेटमध्येच बंड देखील झालं होतं. तरी देखील पदावर राहण्याचा त्यांचा हट्ट होता. कॅबिनेटमधील सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता जेव्हा एकामागून एक खासदार, मंत्री पक्ष सोडून जात असल्याने बोरिस यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव वाढत चालल्यामुळे अखेर त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय. 

बोरिस जॉन्सन पंतप्रधानपद सोडणार असल्याची घोषणा झाली आहे परंतु जोपर्यंत नवीन पंतप्रधान कार्यभार स्वीकारत नाही तोपर्यंत बोरिस या पदावर ते कायम राहतील, असं त्यांनी सांगितलंय. 

म्हणून आता नवीन पंतप्रधानाची शोधाशोध सुरु झाली आहे. यामध्ये ९ जणांचं नाव टॉपमध्ये आहे. ज्यामध्ये ४ जण असे आहेत ज्यांचा भारत आणि पाकिस्तानशी संबंध आहे. भारतीय वंशाचे ३ जण आणि पाकिस्तानी वंशाचा एका व्यक्ती या शर्यतीत आघाडीवर आहेत. 

कोण आहेत हे लोक? त्यांनी कशी ब्रिटनच्या राजकारणावर आपली छाप निर्माण केली आहे? बघूया… 

१.  रिषी सुनक 

“सरकार योग्यप्रकारे, सक्षमपणे आणि गंभीरपणे चालवलं जावं अशी जनतेची अपेक्षा आहे. मात्र ते सध्याचं सरकार करू शकत नाहीये” असं म्हणत रिषी यांनी काही त्यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 

रिषी सुनक हे भारतीय वंशांचे आहेत. रिषी यांचं कुटुंब मुळचं पंजाबचं. मात्र त्यांचे आई-वडील इंग्लंडला शिफ्ट झाले आणि तिथंच रिषी यांचा जन्म झाला. त्यांनी ऑक्सफोर्ड आणि स्टँडफोर्ड या प्रतिष्ठित विद्यापिठांमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील डॉक्टर होते, तर आई मेडिकल चालवायची. त्यांचं अजून एक भारत कनेक्शन म्हणजे ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

रिषी आणि मूर्ती दाम्पत्याची कन्या अक्षता यांचं २००९ मध्ये लग्न झालं होतं.

राजकारणात येण्याआधी त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये काम केलं, तसंच एका मोठ्या इन्व्हेस्टमेन्ट फर्मचे ते सहसंस्थापकही होते.

WhatsApp Image 2022 07 08 at 4.27.10 PM
source-social media

२०१५ मध्ये रिषी पहिल्यांदा निवडून आले. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार झालेल्या रिषी यांनी बोरिस जॉन्सन यांच्या ‘लीव्ह EU’ मोहिमेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्येही त्यांनी निवडणुकीत बाजी मारली. २०१८ मध्ये ते ब्रिटनचे निवासमंत्री झाले आणि २०२० मध्ये त्यांची ब्रिटनच्या सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद असणाऱ्या अर्थमंत्री पदी वर्णी लागली. 

जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी कोविड-19 महामारीमुळे पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनचे आदेश दिले होते तेव्हा रिषी यांनी लाखो नोक-या सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचाव पॅकेज तयार केलं होतं. या योजनेअंतर्गत जे लोक नोकरीशिवाय असतील अशा लोकांच्या वेतनाच्या ८० टक्के रक्कम सरकारने दिली होती. या योजनेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती.

‘मदत करण्यासाठी बाहेर खा’ (eat out to help out) ही त्यांची योजनाही प्रचंड यशस्वी ठरली.

त्यांच्या कामामुळेच त्यांनी बोरिस जॉन्सन यांना मागे टाकलं. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा जॉन्सन यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उभा राहिला होता, तेव्हा देखील रिषी यांचं नावच टॉपला होतं आणि आताही आहे. 

२. साजिद जाविद

माजी आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी सर्वात आधी बोरिस सरकारमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. “समस्या वरच्या पातळीवरून सुरू होते”, असं सूचक वक्तव्य त्यांनी राजीनामा देताना केलं होतं.

साजिद हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. त्यांचा जन्म १९६९ साली रॉकडेल इथल्या एका पाकिस्तानी निर्वासित कुटुंबात झाला. त्यांचे वडील बस कंडक्टर होते. राजकीय प्रवास सुरु करण्यापूर्वी जाविद बँकर म्हणून काम करत होते. 

जाविद २०१० मध्ये पहिल्यांदा खासदार  झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. साजिद जावेद यांनी लंडनचे महापौर म्हणूनही काम पहिले आहे. २०१९ मध्ये जावेद यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला होता. नेतृत्वाच्या रांगेतील टॉपच्या चार उमेदवारांच्या यादीत ते पोहोचले होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी मागे घेत त्यांनी जॉन्सन यांना पाठिंबा दिला होता.

WhatsApp Image 2022 07 08 at 4.27.05 PM
source social media

त्यानंतर त्यांना जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्रीपद मिळालं. मात्र सहा महिन्यांतच त्यांनी आपल्या सल्लागारांशी झालेल्या वादामुळे राजीनामा दिला. तरी तेव्हापासून सतत त्यांनी वाढणारी महागाई आणि राष्ट्रीय कर्जाच्या धोक्यांविरूद्ध इशारा दिला आहे.

परत २०२१ मध्ये त्यांना आरोग्यमंत्री बनवण्यात आलं. तेव्हा त्यांनी कोरोना काळाचं नियोजन केलं. मात्र त्यांनी त्या पदाचा देखील ५ जुलैला राजीनामा दिला. 

३. सुएला ब्रेवरमन

ब्रिटनच्या अॅटर्नी जनरल सुएला ब्रेवरमन यांनीही पंतप्रधान जॉन्सन यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. शिवाय जॉन्सन यांनी राजीनामा देण्याच्या आदल्या रात्री आपण नेतेपदाच्या स्पर्धेत राहण्यास उत्सुक असल्याचा इरादा जाहीर केला होता. शर्यतीतील सहभागाची औपचारिक घोषणा करणाऱ्या सुएला पहिल्या खासदारांपैकी एक आहेत.

सुएला या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म गोव्याचा. आई नर्स होती आणि वडील हाऊसिंग असोसिएशनमध्ये काम करत होते. बॅरिस्टर असलेल्या सुएला सध्याच्या ब्रिटन सरकारमधील सर्वात वरिष्ठ कायदेविषयक अधिकारी आहेत.

शिवाय त्या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला अॅटर्नी जनरल आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या पहिल्या महिला अॅटर्नी जनरल आहेत.

WhatsApp Image 2022 07 08 at 4.28.26 PM
source social media

त्या गर्भवती असताना, त्यांना रजेवर जाण्याची परवानगी देण्यासाठी मंत्रालयीन आणि इतर मातृत्व भत्ते कायदा २०२१ (The Ministerial and Other Maternity Allowances Act, 2021) लागू करण्यात आला होता. त्यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा अॅटर्नी जनरल पदाचा कार्यभार स्वीकारला. 

 ब्रेव्हरमन यांना त्यांच्या पक्षाच्या ब्रेग्झिट समर्थक गटाकडून काही प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार “२०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं मला पूर्ण करायची आहेत. म्हणून मी उभी पंतप्रधान पदासाठी उत्सुक आहे” असं त्या म्हणाल्या आहेत.

४. प्रीती पटेल

बोरिस सरकारमधील गृहमंत्री प्रिती पटेल. त्यांचा जन्म लंडनमधलाच. मात्र त्यांचे आई-वडिल मूळ गुजरातचे आहेत. गुजरातहून ते युगांडाला गेले. २०१९ च्या जुलैमध्ये त्या ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री बनल्या. 

१९९७ मध्ये त्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा भाग बनल्या आणि पुढील तीन वर्षे त्या पक्षाच्या उप-प्रेस सचिव होत्या. त्यांनी सर्वप्रथम २००५ मध्ये नॉटिंगहॅम मतदारसंघातून निवडणूक लढविली होती पण ती त्यांना जिंकता आली नाही. त्यानंतर २०१०मध्ये त्यांनी वीटहॅमच्या जागेवरून निवडणूक जिंकली आणि खासदार झाल्या.

२०१४ मध्ये त्यांना कोषागार मंत्री बनविण्यात आलं आणि २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्या रोजगार मंत्री झाल्या. २०१६ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय विकास सचिव झाल्या. पण काही कारणामुळे एका वर्षानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी जोरदार कमबॅक केलं आणि २०१९ मध्ये ब्रिटनच्या गृहमंत्री झाल्या.

WhatsApp Image 2022 07 08 at 4.27.48 PM
source social media

त्यांनी ब्रिटनमधील समलिंगी जोडप्यांच्या विवाहाच्या वैधतेला विरोध केला होता. धूम्रपानाविरोधातही त्यांनी मोहीम राबवली. आपल्या धारदार वक्तव्यांसाठी आणि कठोर शब्दांसाठी प्रीती प्रसिद्ध आहेत. प्रचारादरम्यान अनेकदा ब्रिटनचा अभिमान, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा अभिमान अशा घोषणांचा वापर करताना त्यांना बघितलं गेलंय.

प्रीती ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या लोकांच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांच्याकडे पंतप्रधान मोदींच्या लंडन दौऱ्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून ब्रिटनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 

अशा या चार भारत-पाकिस्तान वंशाच्या नेत्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत टॉपला नाव आलं आहे. दोन महिला आणि दोन पुरुष असलेल्या या समीकरणात ३ भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्या ब्रिटननं आपल्या मातृभूमीवर राज्य केलं त्याच ब्रिटनमध्ये आता भारताचे तीन पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. ही गोष्ट निश्चितच प्रेरणा देणारी आहे. 

तरी… राजकारण साखर कारखान्याचं असो किंवा ब्रिटनचं कधीही काहीही होऊ शकतं. म्हणून नक्की पंतप्रधानपद कोण जिंकतं हे तर येत्या दिवसांतच कळेल… 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.