पंतप्रधान चंद्रशेखर यांच सरकार दारात उभारणाऱ्या दोन हवालदारांमुळे पडलं होतं.

१९९१ सालचा मार्च महिना, राजधानी दिल्लीतील वातावरण प्रचंड तापलं होतं. ही गर्मी उन्हाळ्यामुळे नाही तर सत्तेच्या राजकारणामुळे वाढली होती. खुद्द पंतप्रधान चंद्रशेखर यांची खुर्ची डळमळीत झाली होती. आणि याला कारणीभूत ठरले होते दोन पोलीस हवालदार.

नेमकं काय घडलं होतं सविस्तर पाहू.

ऐंशीच्या दशकात जेव्हा बोफोर्सच्या आरोपामुळे राजीव गांधींचं सरकार निवडणुकीत बहुमत जिंकू शकलं नाही तेव्हा त्यांचे कट्टर विरोधक जनता दलाच्या छत्राखाली एकत्र आले आणि व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले. अगदी भाजपसुद्धा या सरकारमध्ये होती. पण राममंदिराचं आंदोलन तापलं, अडवाणींच्या रथयात्रेने देशभरात खळबळ उडवली, पुरोगामी पक्षांनी यावरून दंगा सुरु केला. लालूंनी रथयात्रेचा लगाम ओढला आणि चिडलेल्या भाजपने व्ही.पी.सिंग यांचा पाठिंबा काढून घेतला.

वर्षभरात कोसळलेल्या जनता सरकारनंतर पुन्हा निवडणुका घेणे देशाला परवडणारे नव्हते. संसदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. अखेर राजीव गांधींनी चन्द्रशेखर पंतप्रधान होणार असतील तर नव्या सरकारला काँग्रेसतर्फे बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं.

जनता दलाचे ६४ खासदार फोडून समाजवादी जनता दल बनवणारे चंद्रशेखर १० नोव्हेम्बर १९९० रोजी पंतप्रधान तर देवीलाल उपपंतप्रधान बनले.

सुरवातीचे दोन तीन महिने सरकार सुरळीत चाललं. अस्सल ग्रामीण शेतकरी कुटूंबातून आलेले चंद्रशेखर आपल्या फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना शहरी कृत्रिम गोडगोड बोलणे जमायचं नाही. थेट पाकिस्तानी पंतप्रधानांना फोन करून त्याची खरडपट्टी काढण्याएवढा रांगडेपणा त्यांच्याकडे होता.

याच्या उलट त्यांच्या आघाडीतील राजीव गांधी हे इंग्लंडमधून शिकून आलेले, कॉम्युटर लॅपटॉप वापरणारे, लहानपणापासून पंतप्रधान निवासाच्या सुरक्षित वातावरणात वाढलेले नेते. दोघांच्या विचारात फरक पडणे आणि त्यातून संघर्ष होणे साहजिक होते.

अशातच हे हवालदारांचे प्रकरण उभे राहिले.

झालं असं होतं की काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांच्या घराबाहेर म्हणजे १० जनपथ रोड या बंगल्याबाहेर अचानक दोन पोलीस कॉन्स्टेबल पहारा देण्यासाठी उभे राहिले होते. कोणाच्या तरी लक्षात आलं की हे कॉन्स्टेबल राजीव गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेमधील नाहीत किंवा त्यांची राजीव यांना किंवा त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती. जेव्हा हि बातमी फूटली तेव्हा देशभर खळबळ उडाली.

हे दोघे साध्या वेशातील कॉन्स्टेबल होते प्रेम सिंग आणि राज सिंग. दोघेही हरियाणा पोलिसच्या सीआयडी डिपार्टमेंटमधील पोलीस होते, ते दिल्लीत येऊन राजीव गांधींच्या घराबाहेर पहारा का देत आहेत हा मुख्य प्रश्न पडला. प्रकरण गंभीर होते.

२ मार्च रोजी १० जनपथच्या बाहेर चहा पीत उभे असलेल्या या दोन्ही कॉन्स्टेबलना दिल्ली पोलीसांनी अटक केली. त्यांनी सांगितलं कि

आम्हाला माहिती गोळा करून आणण्यासाठी  देण्यात आलेलं आहे.

राजीव गांधी यांना हे जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. तेव्हा हरयाणामध्ये मुख्यमंत्री होते  ओमप्रकाश चौटाला. त्यांचं आणि त्यांच्या भावाचं जरासुद्धा पटत नव्हतं. हा रणजित सिंह चौटाला राजीव गांधींच्याकडे आला आणि त्याने सांगितले की खुद्द मुख्यमंत्र्यानी आदेश दिला म्हणून ते पोलीस तुमच्या घराबाहेर उभे राहिले होते.

झालं. संपूर्ण गोंधळ सुरु झाला. ओमप्रकाश चौटाला यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या इशाऱ्यावर राजीव गांधींवर हेरगिरी करण्यासाठी हे पोलीस पाठवून दिले असा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली डोक्यावर घेतली. 

४ मार्च रोजी चंद्रशेखर आणि राजीव गांधी हे दोघेही शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला म्हणून बारामतीला आले होते

पण तिथेही सगळ्यांच्या लक्षात येत होतं कि या दोन्ही नेत्यांच्यामध्ये काही तरी बिनसलं आहे. राजीव गांधींनी पंतप्रधानांच्या सोबत विमान प्रवास देखील टाळला.

वाद चांगलाच पेटला. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत उभा केला आणि त्यावरून गदारोळ झाला. चौटाला यांनी राजीनामा दिला नाही तर काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेणार अशी चिन्हे दिसू लागली.

राजीव गांधींना वेळोवेळी तामिळ आणि शीख अतिरेकी गटांकडून येणाऱ्या धमक्या, त्यांची आई इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी केलेली हत्या यामुळे हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे असं अनेकांचं म्हणणं होतं. 

पण पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आपण राजीव गांधींवर हेरगिरी करत आहे याचा साफ इन्कार केला. दोन्ही बाजुंनी आरोपप्रत्यारोप वाढले. प्रकरणाने चांगलाच पेट घेतला.

त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता बातमी आली की पंतप्रधानांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना सुपूर्द केला आहे.

राजीव गांधींना हे अनपेक्षित होतं. चंद्रशेखर यांची समजूत काढण्यासाठी तातडीने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व चंद्रशेखर यांचे जुने मित्र शरद पवार दिल्लीला आले. तडक चन्द्रशेखर यांच्या निवासस्थानी पोहचले आणि काँग्रेसची भूमिका सांगितली. त्यावर चंद्रशेखर म्हणाले,

“प्रधानमंत्री को आप लोग क्या समजते हो? ये चंद्रशेखर कि बात नही ये प्रधानमंत्री के पद की गरिमा कि बात है. जिनके समर्थन पर सरकार चल रही है, उस पार्टी के अध्यक्ष स्वयं पंतप्रधान रह चुके है. उनपे नजर रखने के लिए मैं दो कॉन्स्टेबल रखुंगा ? कैसी बात कर रही है काँग्रेस?  “

शरद पवारांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण चंद्रशेखर ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली होती. त्यांनी पवारांना स्पष्टपणे सांगितलं,

“राजीव गांधींना सांगा. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक असे निर्णय बदलणे चंद्रशेखरच्या स्वभावात बसत नाही. मी मला हवं ते केलं. “

स्वाभिमानी चंद्रशेखर यांनी आपला राजीनामा मागे घेतलाच नाही. जनता दलाचं सरकार पडलं आणि देश नव्या निवडणुकांना सामोरा गेला. दुर्दैव म्हणजे याच निवडणुकीच्या प्रचारात राजीव गांधी यांची तामिळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करून हत्या घडवून आणली.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Nayan says

    उभे राहणे आणि उभारणे यात फरक आहे

Leave A Reply

Your email address will not be published.