बारामतीला लग्नसोहळ्यासाठी आलेले राजीव गांधी चंद्रशेखर यांचं सरकार पाडण्याचा प्लॅन आखत होते..

४ मार्च १९९१. बारामतीमध्ये लाखोंच्या संख्येने लोकांचा लोंढा येत होता. बघेल तिथे माणसांची गर्दी होती. सगळे रस्ते ट्रॅफिकमुळे जाम झाले होते. यात बैलगाडीतून येणाऱ्या गरीब शेतकऱ्यापासून ते थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांचा समावेश होता. कारणच असं होतं,

महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या लेकीचं सुप्रिया यांचं सदानंद सुळे यांच्याशी लग्न होत होतं.

संपूर्ण तालुक्यात ट्रकने पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. स्वतः शरद पवार आपल्या मतदारसंघातील ५४ गावांमध्ये जाऊन निमंत्रण देऊन आले होते. आजवर कधी कोणी पाहिलं नाही असा विवाह सोहळा बारामतीला होणार अशी चर्चा राज्यभरात सुरु होती. मीडियाचं देखील या कार्यक्रमाकडे बारीक लक्ष होतं फक्त राज्यभरातील नाही तर राष्ट्रीय पातळीवरचे दिग्गज नेते या लग्न सोहळ्यासाठी हजर झाले होते.

यात सर्वात प्रमुख नाव होतं पंतप्रधान चंद्रशेखर आणि काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी.

शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते मात्र जनतादलात असलेल्या चन्द्रशेखर यांच्याशी त्यांचे बऱ्याच काळापासूनचे घरगुती संबंध होते. सुप्रिया यांच्यासाठी त्यांचं काका पुतणीच नातं होतं. दिलखुलास आणि रांगड्या स्वभावाचे चंद्रशेखर कधी पंतप्रधानपदाचा रुबाब वगैरे दाखवणारे नव्हते. जरी शरद पवार मुख्यमंत्री नसते, कुठल्याही राजकीय पक्षात असते तरी चन्द्रशेखर या लग्नाला हमखास आले असते.

 संध्याकाळी विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या रांगेत फेटा घातलेले राजीव गांधी आणि चन्द्रशेखर यांची जोडी सगळ्या पाहुण्यांमध्ये विशेष करून उठून दिसत होती.

Chandra Shekhar Rajiv Gandhi

लग्नाचा कार्यक्रम भव्य होता मात्र यात पैशांचा अपव्यय आणि विनाकारणचा झकपकपणा टाळण्यात आला होता. विशेष म्हणजे या लग्नात जेवणाचा अवडंबर नव्हता. वऱ्हाडी माणसापासून प्रत्येकाला फक्त एक लाडू देण्यात आला होता. राजकीय घरांच्या लग्नात जेवणाचे पाट मांडले जातात, करोडो रुपये उधळले जातात हे सगळं पवारांनी खोटं करून दाखवलेलं.

अक्षताला अजून सुरवात व्हायची होती. पंतप्रधानांनी शेजारी बसलेल्या राजीव गांधी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. 

या सगळ्याची राजकीय पार्श्वभूमी सांगायची झाली तर राजीव गांधी आणि चंद्रशेखर यांच्यात नवी नवी मैत्री झाली होती. एकेकाळचे हे कट्टर विरोधक मात्र व्ही.पी.सिंग यांना पंतप्रधानपदापासून दूर रोखण्यासाठी एकत्र झाले. काँग्रेसचा पाठिंबा घेत चंद्रशेखर पंतप्रधानपदी आरूढ झाले होते.

त्यांच्या शपथविधीला जवळपास तीन चार महिनेच झाले होते. कोणतंही आघाडी सरकार असते त्याप्रमाणे काँग्रेस आणि त्यांच्या पक्षात कारभार चालवण्यावरून मतभेद होते. त्यांच्यात धुसफुस सुरु असायचीच. मात्र सरकार पाडण्याचे प्लॅन बनत आहेत याची चन्द्रशेखर यांना काहीच कल्पना नव्हती.

शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात या घटनेविषयी सांगतात,

लग्नाच्या घडामोडीमुळे दिल्लीत काय घडामोडी होत आहेत यापासून ते अनभिज्ञ होते. सुप्रिया व सदानंद यांच्यावर अक्षता वगैरे पडल्यावर ते स्टेजवरून खाली चंद्रशेखर व राजीव गांधी आहेत तिथे गेले. तिथे दोघांची चर्चा त्यांच्या कानावर पडली.

पंतप्रधान राजीव गांधींना विचारत होते,

“तुम्ही दिल्लीला कधी निघताय?”

राजीव गांधी म्हणाले,

“कार्यक्रम संपन्न झाला कि थोड्या वेळाने निघेन.”

चन्द्रशेखर यांनी त्यांना कसे आले आहेत वगैरे चौकशी केली. राजीवजींनी सांगितलं कि छोटं विमान घेऊन आलो आहे. त्यावर चंद्रशेखर म्हणाले,

“मी पुण्याहून सरकारी विमानाने दिल्लीला जाणार आहे. तुम्ही माझ्यासोबत का नाही येत ?”

यावर राजीव गांधी म्हणाले,

“माझं इथं थोडस काम आहे. काही वेळ थांबावे लागेल. ”

चंद्रशेखर म्हणाले,

“ठीक आहे मी पुण्याला जातो. तिथे माझी कामे आटपतो. तुम्ही तिथे आला कि आपण एकत्रच निघू.”

राजीव गांधींनी होकार दिला आणि पुढे व्हा असं सांगितलं.

पंतप्रधानांनी स्टेजवर जाऊन वधूवरांना आशीर्वाद दिला आणि ते आपला ताफा घेऊन पुण्याला गेले.

इकडे राजीव गांधी लग्नसमारंभात बसून होते. त्यांनी बराच वेळ शरद पवारांशी गप्पा मारल्या. इतर पाहुण्यांसोबत अगदी खेळीमेळीने ते बोलत बसले. अगदी घरचा समारंभ असल्याप्रमाणे त्यांचं वागणं होतं. जवळपास दोन तास झाले, एव्हाना पंतप्रधान पुण्याला पोहचले होते. थोड्याच वेळात ते निघणार होते. शरद पवारांची घालमेल सुरु झाली. राजीव गांधी सारख्या पाहुण्यांना आता तुम्ही निघा हे कस सांगायचं असा प्रश्न त्यांना पडलं होता.

तरी ते राजीवजींना म्हणाले,

“पीएम पुण्याला पोहचतील. तुम्हालाही तिकडे जाण्यास दोन तास लागतील. काय करायचं?”

यावर राजीव गांधी स्पष्टपणे म्हणाले,

“मला त्यांच्याबरोबर जायचं नाहीए. मी मागाहून येतो तुम्ही पुढे जा असा निरोप चंद्रशेखरजींना पोहचवा.”

शरद पवारांना जाणवलं राजीव गांधी हे पंतप्रधानांना टाळत आहेत म्हणजे नक्की काही तरी गडबड आहे. तरी त्यांनी पुण्याला तेव्हा जिल्हाधिकारी असलेल्या श्रीनिवास पाटील यांना फोन केला आणि राजीव गांधींचा निरोप पंतप्रधानांना पोहचवण्यास सांगितलं.

चंद्रशेखर निघून गेले. राजीव गांधी हे सुप्रिया व सदानंद सुळे यांचा लग्न समारंभ पूर्ण झाल्यावर निघाले.

या सगळ्या घडामोडी मागे मोठं कारण होतं. शरद पवार सांगतात या दोन्ही पक्षांचं मोठं काही तरी बिनसलं होतं. राजीव गांधींच्या निवासस्थानाबाहेर दोन कॉन्स्टेबल उभे केले आहेत असे आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांवर केले होते. याच रागातून राजीव गांधींनी चन्द्रशेखर यांच्या बरोबर प्रवास करणे टाळले होते.

वाद चांगलाच पेटला. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत उभा केला आणि त्यावरून गदारोळ झाला. प्रकरणाने पेट घेतला. शरद पवारांनी दोन्ही नेत्यांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी त्यांना फोन वर म्हणाले,

“आता निवडणुकांना सामोरे जाण्यास आपण तयार नाही त्यामुळे चन्द्रशेखर यांचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.”

पण संध्याकाळी ४ वाजता बातमी आली की पंतप्रधानांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना सुपूर्द केला आहे.

त्यांची समजूत काढण्यासाठी तातडीने शरद पवार दिल्लीला आले. तडक चन्द्रशेखर यांच्या निवासस्थानी पोहचले आणि काँग्रेसची भूमिका सांगितली. त्यावर चंद्रशेखर म्हणाले,

“प्रधानमंत्री को आप लोग क्या समजते हो? ये चंद्रशेखर कि बात नही ये प्रधानमंत्री के पद की गरिमा कि बात है.”

शरद पवारांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण चंद्रशेखर ऐकले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं,

“राजीव गांधींना सांगा. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक असे निर्णय बदलणे चंद्रशेखरच्या स्वभावात बसत नाही. मी मला हवं ते केलं. “

स्वाभिमानी चंद्रशेखर यांनी आपला राजीनामा मागे घेतलाच नाही. जनता दलाचं सरकार पडलं आणि देश नव्या निवडणुकांसाठी सज्ज झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.