देशातले २० लाख लोक मारले आणि सांगितलं देशाच्या भल्यासाठी करावं लागलं.

जगभरातले सगळ्यात खतरनाक हुकूमशहा कोणते असं विचारलं तरी आपल्या डोळ्यासमोर एडॉल्फ हिटलर, बेनिटो मुसोलिनी हि नावं येतात.

पण यांच्याहीपेक्षा एकजण भलेही प्रसिद्ध नव्हता पण त्याने केलेलं कांड जेव्हा जगासमोर आलं तेव्हा क्रूरकर्मा म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं तो होता पोल पॉट.

चार वर्ष सत्तेत असताना या गड्याने देशाची बरीचशी लोकं मारून टाकली. पोल पॉट हा कंबोडिया देशाचा पंतप्रधान होता आणि त्याने कित्येक सामान्य लोकांना विनाकारण यमसदनी पाठवलं आजचा किस्सा त्याच्याबद्दल.

कंबोडिया हा एक छोटासा देश आहे, बाजूला व्हिएतनाम आणि थायलँड सारखे देश आहेत. १९५३ साली कंबोडिया देश स्वतंत्र झाला. या देशातील राजकीय पक्ष असलेल्या आणि कम्युनिस्ट विचारसरणीला प्राधान्य देणारा पक्ष ख्मेर रुजचा नेता पोल पॉट याने आजवरची सगळ्यात भयानक मानवी कत्तल घडवून आणली आणि लोकांमध्ये पराकोटीची दहशत बसवली होती. ख्मेर रूज पक्षाचे ते अध्यक्ष होते आणि ती पार्टी ते चालवत होते. पण मनमानी कारभार , स्वतःच्या मनाला वाटेल तसं प्रजेला वागवणं अशा प्रकाराने त्याने त्याच्याच देशातल्या जवळपास २० लाख लोकांना मरणाच्या दाढेत ढकललं.

पोल पॉट त्याच्या तरुण वयात कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झाला. त्यावेळी कंबोडिया फ्रांस मध्ये विलीन होता. पोल पॉट त्याच लोकांना सपोर्ट करत असे जी लोक कंबोडिया देश वेगळा असावा म्हणून आंदोलने करी. पुढे त्याने क्रांतिकारक व्हायचं ठरवलं आणि तो पूर्णवेळ हेच काम करू लागला. मधल्या काळात शांतपणे अभ्यास करून सगळ्या विषयांचा अभ्यास करून त्याने पुन्हा राजकारणात उडी घेतली.

हळूहळू तो त्याची कम्युनिस्ट पार्टी सुद्धा बनवत होता पण त्याच्या भयंकर आयडिया ऐकून त्याच्या वरिष्ठ लोकांनी त्याची पार्टी बंद पडली आणि इतर अशा विचार करणाऱ्या पार्ट्यांचीसुद्धा तशीच गत केली. पुढे पोल पॉट जंगलात एका व्हिएतनामी टोळीशी झाली आणि त्या टोळीला पोल पॉटचे विचार पटले आणि त्यांनी टोळी अजून शक्तिशाली बनवण्यावर भर दिला. हा पोल पॉट इतका प्रभावी बोलायचं कि एका झटक्यात तो समोरच्याला आपले विचार पटवून देई आणि त्याला आपल्या टोळीत सामील करून घेई.

पुढे या टोळीला घेऊन पोल पॉटने एक आर्मी बनवली आणि ख्मेर रूज नावाचा पक्ष निर्माण केला. पोल पॉटच्या बऱ्याच गोष्टी हिटलरसोबत मेळ खात असे. बराच काळ आर्मी आणि पक्ष वाढवण्यावर त्याने लक्ष दिले. पुढे या टोळीने सरकारविरुद्ध हल्ला चढवला. पोल पॉटला सत्तेत आणण्यात या युद्धाचा मोठा वाट होता. पुढे बराच काळ ख्मेर रुज आणि जनरल लोन नोल सेनेत हे युद्ध चालू राहील. नेहमीप्रमाणे अमेरिकेने विनाकारण या युद्धात भाग घेतला आणि कंबोडिया, व्हिएतनाम नष्ट करून तो भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी तब्बल ७० हजार सैनिक या युद्धात पाठवले.

अमेरिकेने चार वर्ष हे युद्ध लढवलं, या युध्दामुळे कंबोडियातील स्थानिक लोकं ख्मेर रूजच्या बाजूने लढू लागले आणि पोल पॉट हा अधिक शक्तिशाली झाला. ज्यावेळी अमेरिकेने बॉम्बवर्षाव सुरु केला होता तेव्हा जवळपास ७५% कंबोडिया पोल पॉटने ताब्यात घेतला होता. युद्ध ज्यावेळी थांबलं तेव्हा  १९७५ साली पोल पॉटने पूर्णपणे कंबोडियावर राज्य सुरु केलं होतं.

युद्ध थांबल्यानंतर तिथल्या लोकांना वाटलं कि आता आपण शांततेने या देशात राहू शकतो पण त्यांना जराही अंदाज नव्हता कि त्यांचा दुर्दैवी काळ आता सुरु झाला होता. याच दिवसाची वाट पोल पॉट इतक्यता वर्षांपासून पाहत होता. त्याच्या मनात असलेलं देशाचं चित्र त्याने रंगवायला सुरवात केली आणि मॉडर्निटी संपवून देशाला पुन्हा प्राचीन संस्कृती करण्याचा त्याचा  निर्धार होता.

त्याच्या या निर्धारात आडकाठी करणारे लोक होते उच्चशिक्षित आणि जास्त पैसा कमावणारे लोक. सगळ्यात आधी त्याने हि ऑफिसात काम करणारी उच्चशिक्षित मंडळी उचलबांगडी करून बाहेर खेचली आणि त्यांना जबरदस्तीने भाताच्या शेतीत काम करायला जुंपलं. या लोकांमध्ये वकील, डॉकटर आणि अनेक सरकारी कर्मचारी मंडळी होती. जनावरासारखं त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं.

या लोकांमधुन जर कोणी त्याला विरोध केला तर त्याला सरळ टॉर्चर सेंटर मध्ये भरती केलं जायचं. तिथे बेदम मारहाण करून आणि भयानक भयानक शिक्षा देऊन त्यांना टॉर्चर केलं जायचं. या टॉर्चरमुळे लोकं गपगुमान पोल पॉटचे नियम मान्य करून निमूटपणे तसे वागायचे नाहीतर त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागायचं. पोल पॉटच्या अशा हुकूमशाहीमुळे देशात गरिबी आली, अन्नपाण्यावाचून लोकं मारायला लागली.

जितकी लोकं यामुळे आणि टॉर्चरमुळे मरायची त्यांना एका विशिष्ठ जागेत पुरण्यात यायचं आणि त्या जागेला आज आपण फिलिंग फिल्ड म्हणून ओळखतो.

इतक्यावरच पोल पॉट थांबला नाही त्याने लोकांच्या राहणीमानावर सुद्धा हक्क गाजवायला सुरवात केली. जी लोकं त्याने सांगितलेला ड्रेस घालत नसत त्यांना तो सरळ गोळ्या घालायचा. लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करता येत नव्हते, खाता येत नव्हतं. लहान मुलांना बळजबरीने घरातून ओढून नेऊन मिलिट्रीत भरती केलं जात असे. नवरा बायकोला वेगळं केलं जात असे. प्रेमी युगुलाला जागेवर गोळ्या घालून ठार केलं जात असे.

केवळ स्वतःच्या मनाला वाटेल तस लोकांना वागायला लावल्याने त्याने जबर दहशत लोकांमध्ये बसवली. जेव्हा या लोकसंख्येचा सर्वे केला गेला तेव्हा त्याच्या हुकूमशाहीला बळी पडून जवळपास २०लाख लोक मरण पावले होते.

१९७९ साली व्हिएतनामची एक मोठी फौज कंबोडियामध्ये घुसली आणि त्यामुळे पोल पॉटने परत जंगलात आश्रय घेतला पण चीन आणि अमेरिकेने मदत केल्याने त्याने पुन्हा युद्ध चालू ठेवले. १९९८ साली पोल पॉट जेरबंद झाला आणि वयाच्या ७२व्या वर्षी तो मरण पावला.

शेवटच्या काळात त्याला त्याच्या कृत्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं कि,

मी हे सगळं देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं, देशाची ओळख जपण्यासाठी केलं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.