कर्नाटकात गेम फिरवणारे, काँग्रेसचे ज्युनियर प्रशांत किशोर…
कर्नाटकात भाजपला रोखणं काँग्रेसला जड जाईल, भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा रेकॉर्ड बनवेल अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. काँग्रेसनंही भारत जोडो यात्रा, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या अशा नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली, प्रचारात स्थानिक मुद्दे लाऊन धरले आणि भाजपला धक्का देत, कर्नाटकात एकहाती सत्ता मिळवली.
काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय जितकं काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांना जातं तितकंच राजकीय रणनीतीकारांनाही.
काँग्रेसने २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात पक्षाची रणनीती आखण्यासाठी एका व्यक्तीची निवड केली होती. याच व्यक्तीला काँग्रेसचे प्रशांत किशोर २.O असं म्हटलं गेलं. त्यांचं नाव आहे…
सुनील कनुगोलू
सुनील कनुगोलू हे असोसिएशन ऑफ ब्रिलियंट माइंड्स (एबीएम) या भाजपच्या पर्सनलाइज्ड प्रचार संस्थेचे माजी प्रमुख आहेत. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एसआर इंडिपेंडंट फिशरीज प्रायव्हेट लिमिटेड, एसआर नॅचरो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रेनस्टॉर्म इनोव्हेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड (बीएसआयआर) या तीन कंपन्यांमध्ये कनुगोलू यांनी संचालकपद भूषवलं आहे आणि आता ते माइंडशेअर अॅनालिटिक्सचे प्रमुख आहेत.
त्यांना मुख्यतः कर्नाटकसाठी निवडण्यात आलं यामागे खूप लॉजिकल कारण होतं.
सुनील कनुगोलू हे मूळचे कर्नाटकचे आहेत. कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता आणि माध्यमिक शाळेपर्यंत त्यांनी तेथेच शिक्षण घेतले होते. चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत आणि फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
वय वर्ष ४० सुद्धा नसलं तरी कनुगोलू यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या डझनहून अधिक निवडणुकांची रणनीती आखली आहे.
तर सुमारे दशकभराच्या कारकीर्दीत त्यांनी डझनहून जास्त मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे.
कनुगोलू यांनी आत्ता काँग्रेसची धुरा सांभाळली असली, तरी त्यांनी याआधी भाजपसोबत आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही काम केलं आहे.
कनुगोलू यांची निवडणूक सल्लामसलत आणि रणनीती या कामाची सुरुवातच थेट नरेंद्र मोदींसोबत झाली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी कनुगोलू मोदींना संपर्क वाढवण्यासाठी डेटा विश्लेषणाचा वापर करण्याचं प्रेझेन्टेशन घेऊन भेटले होते, तेव्हा त्यांना पोलर म्हणून कायम ठेवण्यात आलं होतं.
ज्यांनी कनुगोलू यांच्यासोबत काम केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशांत किशोर यांच्या पूर्वीच्या सिटीझन फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स (कॅग)ने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची अधिकृत जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच कनुगोलू यांनी मोदींसाठी वैयक्तिक निवडणूक सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
या प्रचारा दरम्यान कनुगोलू आणि प्रशांत किशोर यांनी एकत्र काम केलं होतं.
२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये कनुगोलू यांना भाजपने प्रशांत किशोर यांना टक्कर देणारी निवडणूक सल्लागार कंपनी स्थापन करण्याचं काम दिलं होतं. त्यानंतर कनुगोलू यांनी एबीएमची स्थापना केली होती आणि त्याचे प्रमुख म्हणून कामही पहिलं होतं. किशोर यांचे भाजपशी, विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मतभेद होते. परंतु कनुगोलू यांचे पक्षाशी सुरळीत संबंध होते. याच घटकामुळे भाजपने त्यांच्यावर एबीएमचं नेतृत्व सोपवलं होतं.
२०१८ मध्ये कनुगोलू त्यातून बाहेर पडले मात्र एबीएमने निवडणुकीनंतर भाजपसाठी निवडणुकीची रणनीती आखणं सुरूच ठेवलं आहे.
या सगळ्या दरम्यान प्रशांत किशोर आणि कनुगोलू यांचे अनेकदा रस्ते क्रॉस झाले आहेत. मात्र तरीही दोघांचं वेगळेपण ठळक दिसून येतं. अगदी सध्या उदाहरणातून सांगायचं तर या दोघांचं सार्वजनिक व्यक्तिमत्व बघता येईल…
प्रशांत किशोर यांचं आयुष्य आणि काम प्रत्येकाला दिसतं. कारण ते अगदी उघड आहे. प्रशांत किशोर काही सार्वजनिक झगमगाटापासून दूर जात नाहीत. तर कनुगोलू अगदी याच्या उलट आहेत. ते स्वत:बद्दल जास्त माहिती बाहेर पडू देत नाहीत. म्हणूनच कर्नाटकात काँग्रेसची जबाबदारी लीलया पेलत त्यांनी योग्य अशी रणनीतीही आखली आणि काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
कनुगोलू यांच्या कामाची काही उदाहरणं बघूया…
२०१७ ची उत्तर प्रदेश निवडणूक ही कनुगोलू यांच्यासाठी सर्वात यशस्वी निवडणूक प्रचार मोहीम होती. त्यात भाजपने दणदणीत विजय नोंदवला होता. आता त्यांनी रणनीती आखलेल्या इतर निवडणुका कदाचित त्यांच्या क्लायंटच्या विजयासोबत संपल्या नसतील, परंतु त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम झालाच होता.
जसं २०१६ मध्ये तमिळनाडूमध्ये द्रमुकसाठी त्यांनी निवडणूक प्रचारमोहिम आखली होती. यात पक्ष पराभूत झाला होता, मात्र तरी त्यांनी जिंकलेल्या जागांची संख्या ६६ ने वाढली होती.
कर्नाटक काँग्रेसनं प्रचारात वापरलेले महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे मुद्दे, गॅस सिलिंडरची पूजा करुन मतदानाला जाणं या गोष्टींचा मतदानात फरक पडला आणि पराभवाच्या चर्चा असताना काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली, म्हणून काँग्रेसचं कौतुक होतंय, ज्याचं श्रेय अर्थातच कार्यकर्ते आणि नेत्यांइतकंच मास्टरमाईंड सुनील कनुगोलू यांनाही जातं.
हे ही वाच भिडू :
- दोन जिल्हे पाकिस्तानातून भारतात आणले, पण कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नही निर्माण केला
- या महत्वाच्या निवडणूकांनंतर कळेल कॉंग्रेस विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार का?
- रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डी.के.शिवकुमार…!!!