नव्या चार घोषणा, पण मोदींनी आजवर लाल किल्ल्यावरुन केलेल्या घोषणांचं काय झालं ?

देशात आज सगळीकडे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहाव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत लाल किल्ल्यावरून दरवर्षी प्रमाणे आज पुन्हा नवीन काही घोषणा केल्या आणि आश्वासनं दिली आहेत.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीअगोदरचं हे लाल किल्ल्यावरचं शेवटचं भाषण आहे. तर, साहजिकच नरेंद्र मोदी आज निवडणूकीच्या दृष्टीकोनातून आज पुन्हा नवीन व्हिजन सर्वांसमोर ठेवणार होते. नरेंद्र मोदींनी म्हणलं की आज घेतलेले निर्णय पुढच्या १००० वर्षाची दिशा निश्चित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला लोकसभा निवडणूकीचा अँगल दिला जात आहे.

आज मोदींनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली.

देशात आतापर्यंत १० हजार जन औषधी केंद्र होती. आता २५ हजार केंद्र तयार होणार आहेत. शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. त्यांना स्वत:चं घर घेण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. अॅग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून वुमन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देत, महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल आणि ग्रामीण भागातील २ कोटी महिलांना लखपती बनवण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या नऊ वर्षात अशाच योजनांचा पाऊस पाडला होता.

या योजना कोणत्या होत्या? या योजना कीतपत मार्गी लागल्या हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे…

२०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास ६५ मिनिटं भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी तीन महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर २०१४ पासुन ते २०२३ पर्यंत दरवर्षी लालकिल्यावरून नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरू झाला.

त्यात पहिली योजना होती ती प्रत्येक घरात शौचालय असण्याची. ही योजना सुरू झाली २ ऑक्टोबर २०१४ ला, या योजनेअंतर्गत देशातील अशा गरीब कुटुंबांना लाभ मिळणार होता. ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही आणि त्यामुळे त्यांना शौचालय बांधता येत नाही. त्यांना उघड्यावर शौचालयास जावं लागतं म्हणून सरकार त्यांना आर्थिक मदत करतं. अशा प्रत्येक आर्थिक दुर्बल कुटुंबाला सरकार १२,००० अनुदान देतं.

२०१४ पासून आतापर्यंत ११.६८ कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. उघड्यावर शौचमुक्त गावांची संख्या ६.०३ लाख झाली असून जिल्ह्यांची संख्या ७०६ झाली आहे. खुल्या शौचमुक्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या ३५ आहे.

दुसरी योजना आहे ती जनधन योजना.

केंद्रातली सत्ता हातात घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकेसोबत जोडण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी जनधन योजना १५ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली.

आतापर्यंत पाहिल्यास सरकारने ज्या पद्धतीने ही योजना राबवली, ती पूर्णपणे यशस्वी ठरली. योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये याअंतर्गत ४५ कोटींहून जास्त बँक खाती उघडण्यात आली होती. तर, आत्तापर्यंत हा आकडा वाढून ४८.९९ कोटी झाला आहे.

तिसरी योजना आहे आदर्श सासंद ग्राम योजना.

सांसद आदर्श ग्राम योजनेचा ११ ऑक्टोबर २०१४ रोजी शुभारंभ करण्यात आला होता. महात्मा गांधींचे आदर्श भारतीय ग्राम हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने ही योजना सुरू करण्यात आली होती. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराने एक ग्रामपंचायत दत्तक घेऊन पायाभूत सुविधांसह सामाजिक विकास कसा साधता येईल यासाठी मार्गदर्शन करायचं असतं. हे काम २०२४ पर्यंत पुर्ण करण्याचं टार्गेट आहे. आदर्श ग्राम योजनेच्या वेबसाईटनुसार त्याअंतर्गत ३२९४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. ४७२ ग्रामपंचायतींचे काम बाकी आहे.

त्याचबरोबर स्मार्ट सिटी – नमामि गंगे ही योजना २०१४ मध्ये देशभरातील १०० शहरे स्मार्ट करण्यासाठी सुरू करण्यात आली. 

नागरिकांसाठी अनुकूल शहरं आणि क्षेत्र विकसित करण्यासाठी ६,८५,७५८ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह इतर अनेक कार्यक्रम घेतले गेले. मात्र, शासनाचा हा प्रकल्प आजपर्यंत स्पीड घेऊ शकला नसल्यामुळे थंड गेला आहे. याशिवाय गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली नमामि गंगे योजनाही फ्लॉपच्या यादीत समाविष्ट झाल्याच चित्र आहे.

२०१५ च्या स्वातंत्र्य दिनी नरेंद्र मोदींनी ८६ मिनिटं भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

२०१५ च्या भाषणातील पहिली योजना म्हणजे स्टार्टअप इंडिया. या योजनेची १६ जानेवारी २०१६ ला सुरवात झाली. भारत सरकारने सुरू केलेला स्टार्टअप भारतातील नाविन्य आणि स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी आणि स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी भारत सरकारने हा पुढाकार घेतला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ९९,३८० स्टार्टअप सुरू झाले आहेत. त्याच वेळी पोर्टलवर ६५५,१७१ नोंदण्या झाल्या आहेत.

स्किल इंडिया प्रधानमंत्री कौशल भारत योजना १५ जुलै २०१५ रोजी सुरू झाली.

या मोहिमेअंतर्गत २०२२ पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी लोकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, जे नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर व्हिजनशी जोडलेलं होतं. ड्रीम प्रोजेक्ट असूनही यामध्ये  अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. विरोधकांनीही ही योजना फ्लॉप असल्याचे म्हटले होतं.

तिसरी योजना आहे, वन रँक वन पेन्शन योजना.

म्हणजे सैन्य दलात एकाच वेळी सारख्याच पदावर काम केलेले दोन माजी सैनिक जरी वेगवेगळ्या वेळी निवृत्त झाले तरी त्या दोघांना सारखेच निवृत्तीवेतन या योजनेमार्फत मिळतं. सुमारे २५ लाख माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन अंतर्गत लाभ दिला जात आहे. २०२२ मध्ये पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या दुरुस्तीनुसार आता सैनिकाला १९,७२६ रुपये पेन्शन मिळतं.

२०१६ ला नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तीन महत्वाच्या घोषणा केल्या होत्या.

या भाषणात त्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची घोषणा केली होती. ही योजना १८ फेब्रुवारी २०१६ सुरू झाली. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, १८ विमा कंपन्या, १.७ लाख बँक शाखा आणि ४४,००० सामायिक सेवा केंद्रे २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लाभ देण्यासाठी सेवा देत आहेत. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण २५,१८६ कोटी रुपयांचा पीक विमा हप्ता भरण्यात आला आहे.

तिसरी योजना आहे. ई नाम प्रकल्प योजना.

शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकांची विक्री करण्यासाठी ई-नाम वेबसाइट २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत देशभरातील एकूण १३६१ मंडई ऑनलाइन लिंक करण्यात आल्या आहेत. ८ फेब्रुवारीपर्यंत २.५  लाख कोटी रुपयांचा करार झाला आहे. फेब्रुवारीपर्यंत देशातील १.७४ कोटी शेतकरी आणि २.३९ लाख व्यापारी या पोर्टलशी जोडले गेले आहेत.

२०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५६ मिनटं भाषण केलं त्या भाषणातही योजनाचा पाऊस पाडला.

त्यातली पहिली सर्वात महत्वाची घोषणा होती. जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्याची घोषणा.

५ ऑगस्ट २०१९ ला घोषणेवर काम सुरू झालं. काश्मीर व्हॅलीची पहिली परकीय गुंतवणूक श्रीनगरमधील सेम्पोरा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये झाली. या वर्षी १९ मार्च रोजी बुर्ज खलिफा बांधणाऱ्या एमार कंपनीने १० लाख चौरस फूट जागेवर ५०० कोटी रुपये खर्चून श्रीनगर मॉल आणि आयटी पार्क बांधण्याचे भूमिपूजन केलं होतं. प्रकल्पाची अंतिम मुदत २०२६ आहे. यामुळे १३,५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

२०१७ च्या भाषणातील दुसरी महत्वाची योजना म्हणजे शौर्य पुरस्कार वेबसाइट.

सैनिकांच्या सन्मानार्थ शौर्य पुरस्कार वेबसाइट सुरू करण्याची घोषणा केली होती. वेबसाइटवर शौर्य पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण माहिती आहे. १ कोटींहून अधिक लोकांनी वेबसाइटला भेट दिली आहे. ६ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

तिसरी योजना आहे जीईम रत्न पोर्टल योजना.

ही योजना १७ मे २०१७ ला सुरू करण्यात आली होती.  ही भारत सरकारची ई-मार्केटप्लेस वेबसाइट आहे. या अंतर्गत ३५ लाख उत्पादनांची विक्री होते. त्याच वेळी, ६७ लाख विक्रेते त्याच्याशी संबंधित आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जेम पोर्टलवर १,०६,७६० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला, जो आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या व्यवसायापेक्षा १७८ टक्के अधिक आहे.

२०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८२ मिनिटं भाषण केलं होतं या भाषणात त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या.

त्यातली पहिली प्रमुख घोषणा होती आयुष्यमान भारत योजना.

ही योजना २५ सप्टेंबर २०१८ ला सुरू झाली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत १७.६९ कोटी लोकांना कार्ड जारी करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ ५० कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. देशभरातील १३,००० हून अधिक रुग्णालये या योजनेशी संबंधित आहेत.

दुसरी घोषणा आहे गगनयान मिशनची घोषणा.

गगनयानचे पहिले मिशन ऑगस्ट २०२३ मध्ये लॉन्च केले जाईल. दुसऱ्या मिशनमध्ये रोबो पाठवण्यात येणार असून शेवटच्या मोहिमेत तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले जातील. इस्रो प्रमुखांनी सांगितले की, दुसरे मिशन पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये प्रक्षेपित केले जाईल.

तिसरी योजना आहे. ग्राम स्वराज अभियान योजना.

ही योजना १४ एप्रिल २०१८ ला सुरू झाली होती. १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज अभियान सुरू करण्यात आले. ग्राम स्वराज अभियानात देशातील २१०५८ गावांसाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला. ज्या अंतर्गत केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गावात पोहोचवल्या.

२०१९ ला नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावर ९३ मिनिटं भाषण केलं या भाषणात त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती.

२०१४ मध्ये केंद्राची सत्ता हाती घेतल्यानंतर, पहिल्या टर्मच्या शेवटच्या वर्षात, मोदी सरकारने शेतकर्‍यांना फायदा व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीच्या आधी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी ही योजना सुरू करण्यात आली. मोदींच्या कार्यकाळात ही योजना खूप यशस्वी ठरली आणि तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीएम किसान योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६,००० रुपये जमा करते. ही रक्कम दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. केंद्र सरकारने आतापर्यंत १२ हप्ते जारी केले आहेत.

२०१९ च्या भाषणात त्यांनी जल जीवन मिशन योजनेची घोषना केली होती. १५ ऑगस्ट २०१९ ला या योजनेची सुरवात झाली होती. २०२४ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ११२ कोटी घरांना कनेक्शन देण्यात आले आहेत. एकूण १९ कोटी कुटुंबांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याच वर्षी एक महत्वाची घोषणा केली होती ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा.

जनरल बिपिन रावत ३१ डिसेंबर २०१९ रोजी देशाचे पहिले CDS बनले होते. ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, ३० सप्टेंबर २०२२ रोजी अनिल चौहान नवीन CDS बनले.

२०२० मध्ये नरेंद्र मोदी ८६ मिनटं भाषण केलं. ज्यात त्यांनी महत्वाच्या तीन घोषणा केल्या होत्या.

त्यातली एक घोषणा म्हणजे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान देशातील सर्व लोकांचा वैद्यकीय डेटा ऑनलाइन करणे हा या योजनेचा उद्देश आहे. देशात आतापर्यंत ४४ कोटी हेल्थ आयडी कार्ड बनवण्यात आले आहेत. २९ कोटी लोकांनी त्यांचे हेल्थ कार्ड लिंक केले आहे.

दुसरी योजना म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण १९६८ आणि १९८६ नंतर मुक्त भारताचे हे तिसरे शैक्षणिक धोरण आहे. त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्यात आली आहे. २०२० मध्ये पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात याबद्दल बोलले होते.

तिसरी योजना म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण योजना.

देशात कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या या योजनेने केंद्राने ज्या पद्धतीने विचार सुरू केला होता त्याच पद्धतीने काम केले. २६ मार्च २०२० रोजी सुरू झालेल्या या योजनेचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक नागरिकाला सांभाळणे असे होते. देशातील सुमारे ८० कोटी लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून रेशन मिळत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला पाच किलोपेक्षा जास्त धान्य दिले.

२०२१ ला नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ८८ मिनटं भाषण केलं या भाषणात त्यांनी दरवर्षी प्रमाणे काही घोषणा केल्या होत्या.

त्यामधील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे वंदे भारत ट्रेनची घोषणा. आतापर्यंत २५ वंदे भारत ट्रेन धावल्या आहेत.

आता मोदींनी यावर्षी केलेल्या घोषणांचं पुढं काय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.