फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट वगळता कोणताच मोठा प्रोजेक्ट विदर्भात आला नाही

वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टनंतर टाटा एअरबस प्रोजेक्ट सुद्धा गुजरातला गेला. त्यामुळे टाटा एअरबस प्रोजेक्टवरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे.

या टीकेला आता आणखी वेगळं वळण मिळालं आहे. 

कारण महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा असलेला टाटा एअरबसचा प्रोजेक्ट हा विदर्भात नागपूर शहरात येणार होता, परंतु हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विदर्भाचं नुकसान झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीने सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय.

ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरात मधील साहेबांचे आदेश महत्वाचे आहेत, म्हणून त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधूनच लढवायला हवी. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकही मोठा प्रोजेक्ट विदर्भात आलेला नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “पतंजली कंपनीचा मोठा प्रकल्प नागपूर शहरात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु अजून सुद्धा प्रकल्प निर्माण झाला नाही. यासोबतच अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार होता, तो प्रोजेक्ट सुद्धा औरंगाबाद शहरात नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहे.” असा आरोप सुद्धा अतुल लोंढे यांनी केला आहे. 

या आरोपामुळे चर्चा सुरु आहे की, खरंच फडणवीसांच्या काळात विदर्भात कोणताच मोठा प्रकल्प आलेला नाही का? 

कारण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्ग, मेट्रो यांसारखे मोठं मोठे प्रकल्प विदर्भात आणि महाराष्ट्रात सुरु झाले. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र अव्वल होता आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येत होते, परंतु त्याच काळात देवेंद्र फडणवीस ज्या प्रदेशातून येतात त्या विदर्भातच कोणता मोठा प्रोजेक्ट सुरु झाला नाही असं म्हणणे अनेकांना धक्कादायक वाटेल.

पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात विदर्भात सुरु झालेल्या प्रोजेक्टची यादी पहिली तर अमरावतीचा टेक्सटाईल पार्क वगळता एकही प्रोजेक्टची गुंतवणूक टाटा एअर बस प्रक्लपा एवढी नाही.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून २०१९ पर्यंत विदर्भात ६ मोठे प्रोजेक्ट्स सुरु झालेले आहेत. यामध्ये अमरावतीच्या नांदगाव पेठ मध्ये टेक्सटाईल पार्क, चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीमध्ये युरिया निर्मितीचा प्लांट सुरु करण्याचे करार झाले.

तर नागपूरच्या मिहानमध्ये सियाट कंपनीचा तयार निर्मितीचा प्रोजेक्ट, पतंजलीचा आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रोजेक्ट, ग्लोबल लॉजिकचा आयटी पार्क, रुआगचा एरोस्पेसचे सुटे पार्ट बनवण्याचा प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.

या सर्व प्रोजेक्ट्समध्ये अमरावती जिल्ह्यातील टेक्सटाईल पार्क सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी कापड उद्योगांचा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आला होता. मे २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी या पार्कचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा या पार्कमध्ये ८ मोठ्या टेक्सटाईल कंपन्यांनी १ हजार २४३ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. यात ३ हजार ७०० लोकांना थेट रोजगाराची संधी निर्माण होणार होती.

सध्या या टेक्सटाईल पार्कमध्ये १० कंपन्यांचे उत्पादन सुरु आहे, यात रेमंड, सियाराम या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. भविष्यात या पार्कमध्ये १० हजार कोटींपर्यंत गुंतवणूक होणार असल्याचा अंदाज आहे.

अमरावतीच्या या प्रोजेक्टपाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये सुद्धा काही प्रोजेक्ट सुरु झाले आहेत परंतु ते टेक्सटाईल पार्क इतके मोठे नाहीत.

१) रिलायन्स दसॉ कंपनीचा प्रोजेक्ट

२०१७ मध्ये रिलायन्स आणि दसॉ कंपनीने रॅफेल विमानांचे सुटे पार्ट बनवण्यासाठी नागपूर मिहानमध्ये प्रोजेक्टचं भूमिपूजन केलं. या प्रोजेक्टमध्ये १०० मिलियन युरो म्हणजेच ८२० कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

२) सियाट टायर प्रोजेक्ट 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात डिसेंबर २०१४ मध्ये सियाट कंपनीच्या टायर प्रोजेक्टचं मिहानमध्ये भूमिपूजन करण्यात आलं. या प्रोजेक्टमध्ये ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. २ वर्षानंतरच या प्लांटमधून २ वर्षांनी २०१६ मध्ये या टायर निर्मिती सुरु झाली. 

३) पतंजली प्रोजेक्ट 

२०१७ मध्ये पतंजली कंपनीचा फूड पार्कचं मिहानमध्ये भूमिपूजन करण्यात आलं. मिहानमध्ये २३२ एकर जमिनीवर सुरु करण्यात आलेला हा प्लांट जगातील सगळ्यात मोठा फूड प्लांट असल्याची घोषणा करण्यात आली होती. या प्लांटमध्ये अंदाजे ३००-४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. डिसेंबर २०२१ मध्ये या प्रोजेक्टमधून उत्पादन सुरु होणार होतं, पण काही अडचणींमुळे उत्पादन रखडलंय. 

४) ग्लोबल लॉजिक आयटी प्रोजेक्ट 

आयटी क्षेत्रात नावाजलेली कंपनी ग्लोबल लॉजिकने २०१५ मध्ये नागपूरच्या मिहानमध्ये आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. २०१६ पासून मिहानमध्ये कंपनीचा प्रोजेक्ट सुरु झाला आहे. २०१६ मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून प्रोजेक्टचा विस्तार केला होता.

प्रोजेक्टच्या अतिरिक्त जागेमध्ये इनोव्हेशन लॅब, मोबाईल, हेल्थकेअर, मोबाईल कॅरियर्स, मीडिया, कम्युनिकेशन्स, सिक्युरिटी, आयओटी कनेक्टेड उपकरण बनवण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता.

५) रुआग एरोस्पेस प्रोजेक्ट 

ऑगस्ट २०१६ मध्ये मिहानमधील टाटांच्या प्रोजेक्टमधून १०० व्य बोईंग विमानाचं हस्तांतरण करण्यात आलं. त्याचवेळी मिहानमध्ये रूआग या विमान उत्पादन कंपनीच्या प्रोजेक्टचं भूमिपूजन करण्यात आलं. रुआगकडून विमान उत्पादनात लागणारे मेटल शीट, विमानाला लागणारे सुटे पार्ट आणि त्यांच्या जुळवणी करण्यात येणार होत्या. या प्रोजेक्टमध्ये २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती.

या प्रकल्पांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यात कोळशाचा वापर करून युरिया निर्मितीचा प्रोजेक्ट सुरु केला जाणार होता. या प्रकल्पासाठी अमेरिकेच्या स्टोनतेक कंपनीबरोबर ६.५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. परंतु हा प्रोजेक्ट कुठपर्यंत पोहोचला आहे हे अजूनही स्पष्ट नाही. 

या प्रकल्पांसोबतच नंतर रिफायनरीला कोकणात विरोध सुरु झाल्यानंतर ही रिफायनरी विदर्भात येईल अशी चर्चा होती. पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात याबाबत कोणत्याच हालचाली होण्यात आल्या नाहीत. यंदा केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रिफायनरीची विदर्भात आणण्याबददल घोषणा केली होती, पण प्रोजेक्ट समोर गेलेला नाही. यासोबतच २२ हजार कोटींचा टाटा एअर बस प्रकल्प नागपुरातच येणार अशी चर्चा होती पण तो सुद्धा प्रोजेक्ट नागपुरात आला नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना विदर्भात आलेल्या प्रोजेक्समधील गुंतवणुकीचा आकडा बघितल्यास, एकही प्रोजेक्ट ऑइल रिफायनरी किंवा टाटा एअरबस प्रोजेक्ट एवढा मोठा नाही.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.