महाराष्ट्रात येईल अशी चर्चा होती, मात्र टाटा एअरबसचा प्रोजेक्ट देखील गुजरातनेच पळवला

वेदांता-फॉक्सकॉनचा कम्प्युटर्स चिप्स बनवण्याचा २ लाख कोटींचा प्रोजेक्ट ऐनवेळी गुजरातला गेला, तेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे गुजरातने पळवून नेलेल्या प्रकल्पांचीच चर्चा सुरु झाली होती. सगळ्या चर्चा साकारात्मक असतांना सुद्धा शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने प्रकल्प गुजरातला दिला, अशी टीका विरोधी पक्षाने केली होती.

तेव्हा विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याचं आश्वासन दिलं होतं.

ते म्हणाले की, “पुढच्या २ वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही ते बघा.”

फडणवीस यांच्या घोषणेसोबतच उद्योग मंत्री उदय सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला जाईल असं आश्वासन दिलं होतं. तसाच याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे अशी माहिती सुद्धा दिली होती.

त्यामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जरी गुजरातमध्ये गेला असला तरी, तब्बल २२ हजार कोटी गुंतवणुक असलेला टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूरला येईल अशी जोरदार चर्चा सुरु होती. 

कारण नागपुरात विमान उद्योगाशी निगडित पायाभूत सुविधा असलेला मिहान प्रकल्प आहे. या सुविधांसोबतच महाराष्ट्र सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी लॉबिंग केली होती त्यामुळे हा प्रकल्प नागपुरातच उभारला जाईल अशी चर्चा केली जात होती. मात्र आता हा प्रोजेक्ट गुजरातच्या वडोदरा शहरात सुरु होणार आहे. 

येत्या ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रोजेक्टचं भूमिपूजन करण्यात येणार आहे.

संरक्षण खात्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या एअरबसचा प्रोजेक्ट पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीकडे देण्यात आला आहे. भारतातील टाटा आणि स्पेनची ‘एअर बस डिफेन्स अँड स्पेस’ या कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पात सी-२९५ एअर बस बनवण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये २१ हजार ९३५ कोटींची गुंतवणूक होणार असून तब्बल ६ हजार जणांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुविधा गुजरातच्या वडोदरा शहरापेक्षा नागपुरातच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

नागपूर शहरामध्ये कोणत्याही एरोस्पेस उद्योगाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कारण एरोस्पेस उद्योगासाठीच नागपुरात मिहान सेज प्रकल्प म्हणजेच मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अँड हब एअरपोर्ट ॲट नागपूर ची उभारणी करण्यात आली आहे. 

नागपूर शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन २००८ मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने नागपूर विमानतळाला लागूनच या स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती सुरु केली. २००९ मध्ये याच सेजच्या नावाने मिहान कंपनीची निर्मिती करण्यात आली. या कंपनीत ५१ टक्के शेअर्स महाराष्ट्र सरकारचे आहेत तर ४९ टक्के शेअर्स केंद्र सरकारचे आहेत.

मिहानमध्ये ८ वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. 

१) विमानतळ 

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरमध्ये दोन धावपट्ट्या आहेत. इथे १४ लाख प्रवासी आणि ८ लाख ७० हजार टॅन मालवाहतूक करण्याची क्षमता असलेले टर्मिनल बांधले जात आहे. तसेच टर्मिनलमध्ये ५० आणि बाजूच्या भागात ५० अशी १०० विमानाची पार्किंग करण्याची जागा उपलब्ध आहे. 

२) कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेपासून दूर असलेले शहर

नागपूर शहर पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेपासून हे शहर लांब आहेच; सोबतच सागरी सीमेपासून सुद्धा लांब आहे. तसेच नागपूरचा पट्टा भूकंपाच्या धक्यांपासून सुरक्षित आहे. त्यामुळे नागपूरला इतर शहरांपेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं. तर वडोदरा शहर पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी जवळ आहे.

३) प्रशासकीय सुविधा 

मिहानमध्ये प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी एकखिडकी योजना लागू करण्यात आलेली आहे. तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी आयातशुल्क माफ करण्यात आले आहे. पहिल्या पाच वर्षांपर्यंत निर्यात उत्पन्नावरील आयकरावर पूर्णपणे सूट देण्यात येते तर त्यासमोरच्या ५ वर्षात आयकरात ५० टक्के सुट दिली जाते.

इथे सुरु होणाऱ्या व्यवसायासाठी ५०० मिलियन डॉलरपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विक्री आणि सेवा करात सुद्धा सवलत दिली जाते. 

४) प्रशिक्षित मनुष्यबळ 

नागपूर शासकीय आयटीआय हे महाराष्ट्रातील उत्तम इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टीट्युटपैकी एक आहे. यात विमानाची बांधणी आणि दुरुस्तीचे कोर्स शिकवले जातात. सोबतच बाकी संस्थांमध्ये सुद्धा याचे कोर्स उपलब्ध आहेत त्यामुळे विमान कंपन्यांसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ इथे सहज उपलब्ध होते. 

५) एअर इंडियाचा एमआरओ प्लांट 

मिहानमध्ये एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेसचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये एअर बस आणि बोईंग या दोन्हीप्रकारच्या विमानाची दुरुस्ती केली जाते. इथे विमानाचे सुटे पार्ट, विमानाची बांधणी, दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगची कामं केली जातात. एअर इंडिया आता टाटा कंपनीच्या हातात आहे.

६) नागपूरला यापूर्वी आलेल्या कंपन्या देखील मेन फॅक्ट ठरतो.

मिहानची निर्मिती करतांना एमआयओ प्लांट आणि जेट फ्युलसाठी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी कंपन्या तर इथे आलेल्याच होत्या. परंतु २०१३ मध्ये मॅक्स ऐरस्पेस आणि २०१७ मध्ये रफाईल विमान बनवणारी दसॉ-रिलायंस या कंपनी सुद्धा मिहानमध्ये आलेल्या आहेत.

सोबतच ब्राह्मोस मिसाईल्सचे उत्पादन सुद्धा नागपुरातच केले जाते. नागपुरात ब्रह्मोसचा प्लांट असल्यामुळे संरक्षण आणि गुप्तचर विभागाचे चांगले नेटवर्क इथे आहे. त्यामुळे संरक्षण साहित्य असलेल्या टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी ही जागा उत्तम आहे. 

यासोबतच मिहानमध्ये सॉफ्टवेअर, फूड प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि नागपूर एम्ससारखी हेल्थकेअर सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. 

पण महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असतांना सुद्धा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय.

या प्रकल्पामध्ये ९६ टक्के काम टाटा कंपनीकडून केले जाणार आहेत तर ४ टक्के काम स्पेनच्या कंपनीकडून केले जाणार आहे. यात १३ हजार ४०० पार्टस आणि ४ हजार ६०० असेंम्बल्सचं उत्पादन इथे केलं जाणार आहे. परंतु आता या उद्योगाच्या माध्यमातून मिळणारे ६ हजार रपोजगार आणि भविष्यात या उद्योगाच्या माध्यमातून येणाऱ्या दुसऱ्या उद्योगांवर महाराष्ट्राला पाणी सोडावं लागलंय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.