आबांना अडकवण्यासाठी आलेल्या महिलेला आबा “ताई” म्हणाले

साल २००५, जून महिना असेल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असणाऱ्या आर आर पाटील यांचा चित्रकूट बंगला.

नेहमी प्रमाणे आर आर आबांचा जनता दरबार भरला होता. लोक आपली गाऱ्हाणी उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडत होते. आबा आपल्या परीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच एक मुलगी आबांच्या टेबल जवळ येऊन त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती.

आबांचं सुरवातीला लक्ष नव्हतं. मात्र काही वेळाने अधिकच जवळ येऊ लागल्यावर आबांना दिसलं की भडक मेकअप केलेली ती मुलगी मी बार बाला असून आमचे प्रश्न ऐकून घ्या असं काहीस ती म्हणत होती. बोलता बोलता ती जास्तच खेटण्याचा प्रयत्न करू लागल्यावर आबा काहीसे रागावले. त्या बारबालेला म्हणाले,

“ताई थोडंसं दूर सरकून बोला”

नेमकं ती मुलगी आबांच्या जवळ येऊ पाहत होती तेव्हा एक माणूस फोटो काढत होता. आबांना या सगळ्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी लगेच ड्युटीवर उभ्या असलेल्या पोलिसांना बोलवले. पोलिसांनी त्या कॅमेरामन आणि त्या बार बालेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे थोडी चौकशी केली आणि वेगळेच सत्य समोर आले.

ती बारबाला नव्हतीच तर ती मुलगी मिड डे या इंग्रजी वर्तमानपत्राची वार्ताहर होती.  तपासल्यावर वगैरे लक्षात आलं कि या दोघांनी सिक्रेट कॅमेरा देखील आणला होता व ते आर आर आबांना स्टिंग ऑपरेशन करून अडकवण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांनाही अटक करण्यात आली.

नेमकं काय होत प्रकरण ?

आर आर आबा जेव्हा गृहमंत्री पदी आले तेव्हा त्यांनी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे डान्सबार वर बंदी.

या घटनेला कारण ठरलेलं ते म्हणजे स्वत: एका कारवाईत आर.आर. पाटलांचा असलेला सहभाग. गृहमंत्री म्हणून आर.आर. पाटील डान्सबारवरील कारवाई दरम्यान सहभागी झाले होते. त्या डान्सबारवर एका रात्रीच कलेक्शन म्हणून १७ कोटी जमा झाल्याच आबांना समजलं. बरीच गावाकडची मुलं मुबई लोणावल्याच्या डान्सबारमध्ये येवून पैसे उडवत असल्याच त्यांनी पाहीलं. ही मुलं पैसा कुठून आणतात तर शेती विकून. डान्सबार बंद केले नाहीत तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही या उद्दात हेतून त्यांनी डान्सबार बंदी करण्यासंबधित हालचाली सुरू केल्या.

तेव्हा संसदिय कामकाज मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील कारभार पहात होते. आर. आर. पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना बोलावून नेमकं काय करता येईल. कायदेशीर तरतूदी काय आहेत व असा कायदा विधीमंडळ पारीत करू शकते का याची चाचपणी करण्यास सुरवात केली.

विधिमंडळाची एक विशिष्ट नियमावली असते. ब्ल्यू बुक नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या नियमावली विधिमंडळाचे कायदे सांगण्यात आलेले आहेत. विधीमंडळाच्या ग्रंथालयातून हर्षवर्धन पाटलांनी हे पुस्तक मिळवले. त्यानूसार स्वत: संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कायदाच्या मसूदा तयार केला. तो मसूदा विधीमंडळात मांडण्यात आला व बहुमताने डान्सबार बंदीचा कायदा पास करण्यात आला.

त्यानंतर सुरू झालं ते रणकंदन.

लोकांच्या दोन्ही बाजूने भुमिका होत्या. काही लोकांच म्हणणं होतं की पुर्वी चार भिंतीच्या आत चालणारा हा व्यवसाय या कायदामुळे बाहेरपर्यन्त फोफावला जाईल. काहींच म्हणणं होतं की बेरोजगार झालेल्या त्या मुलींनी काय करायचं? प्रश्न रास्त होते पण त्यासाठी डान्सबार सारखी किड समाजात असणं कधीच योग्य नव्हतं. या कायद्यामुळे राज्यातल्या डान्सबारला मोठ्ठा धक्का सहन करावा लागला होता. साहजिक एक कायदा येतो म्हणून पैसे मिळवून देणाऱ्या इतक्या मोठ्या व्यवसायावर पाणी फिरवण्यास डान्सबारवाले शक्य नव्हतं.

त्यांनी कोर्ट कचेरीच्या मार्ग तर अवलंबला पण शिवाय माध्यमांमधून आर आर आबांचे चारित्र्यहनन करण्यास सुरवात केली.

विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रे आणि माध्यमे यात आघाडीवर होती. काही मोजक्या माध्यमसम्राटांची मुंबईमध्ये मक्तेदारी होती. ग्रामीण भागातून आलेले इंग्रजी बोलण्यात काहीसे पिछाडीवर असणारे मंत्री त्यांच्या खाजगी चर्चांमध्ये कुत्सित विनोदाचा विषय झाले होते.

मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल जोरदार कळवळा असणारे विचारवंत व पत्रकार या गावठी गृहमंत्र्याला शहरी जीवन काय कळणार या चर्चा करत होते. डान्स बार बंद झाले तर त्यात काम करणाऱ्या महिलांना वेश्याव्यवसायाचा मार्ग पत्करावा लागेल असे आरोप आबांवर केले जात होते मात्र खरं तर डान्स बार मालकांची मोठी लॉबी या आरोपकर्त्यांच्या पाठीशी उभी आहे असं बोललं जात होतं.

आर आर पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती.

अशातच आर आर आबांवरचा हा स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न फसला. बातमी साठी कोणत्याही थराला जाणाऱ्या पत्रकारितेवर या निमित्ताने जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. मराठी माध्यमे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले. 

स्टिंग ऑपरेशनच फुटलेलं पेव आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी माध्यमांची जबाबदारी याविषयी सखोल चर्चा झाली. मक्तेदारी करून आपल्याला हव्या तशा बातम्यांना वळण देण्याच्या पद्धतीवर टीका करून बुरखा फेडण्याचा प्रयत्न झाला.

या स्टिंग ऑपरेशनमूळ आर.आर.पाटील यांचे स्वच्छ चरित्र उजळून निघालं. उपमुख्यमंत्री गृहमंत्री या मोठ्या पदांवर पोहचून ही परस्त्रीला ताई म्हणून हाक मारण्याचे ग्रामीण संस्कार त्यांनी जपलेले हे अनेकांना विशेष वाटलं. हाच आर आर आबांचा साधेपणा जनतेला त्यांच्याकडे खेचून घ्यायचा.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.