ज्याच्या नशिबी गुलीगत धोका त्याचं आवडतं गाणं, क्या हुआं तेरा वादा….

साल होतं 1971. मोहम्मद रफी आणि त्यांची अम्मा दोघेही इस्लाम धर्मामध्ये पवित्र असलेल्या ‘हज’ला गेले होते. परत येत असतांना त्यांना तेथील काही मौलविंनी सांगितले की,

“अब आप हाजी हो गए हैं. इसलिए अब आपको फ़िल्मों में नहीं गाना चाहिए”

आता रफी साहेब होते एक साधे, सरळ आणि सज्जन गृहस्थ. त्यांनी मौलविंचे म्हणणे लगेच ऐकले आणि देशात येवून ‘आपण गाणं सोडत असल्याचे जाहिर पण केले. इकडे मात्र त्यांच्या आवाजाने रसिकांच्या मनावर गारुड घातलं होतं.

ते आपल्या करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर होते. यापुर्वी पाच फिल्म फेअर पुरस्कार त्यांना होते. असं असतांना गाणं सोडण्याचा त्यांचा निर्णय चाहत्यांसाठीच नाही तर संपुर्ण फिल्म इंडस्ट्रीजला धक्का देणारा होता.

पुढे कित्येक महिने रफी साहेब गाण्यांपासून लांब राहिले.

त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होवू लागला. सगळा घरखर्च थांबला होता. उपासमारीचे दिवस लांब नव्हते. तेव्हा त्यांच्या भावांनी त्यांना सांगितले की

“तुमचा रेशमी आवाजच आपल्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. अल्लाहने दिलेला सुंदर आवाजाला असे न्याय द्या.” 

त्यानंतर नौशाद साहेबांनीही त्यांना समजावले की,

“यह गाना छोड़ कर ग़लत कर रहे हो मियां. ईमानदारी का पेशा कर रहे हो, किसी का दिल नहीं दुखा रहे. यह भी एक इबादत है” 

रफी साहेबांना लवकरच सगळ्यांची मत पटू लागली.

त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार केला न् गायनाकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा त्याच दिमाखात एन्ट्री घेतली पण रफी साहेब खरे परतले ते 1977 साली आलेल्या ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुवा तेरा वादा’ या गाण्यातुन.

रफींच्या आवाजातील या गाण्याने त्यावेळी लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले.

आजही प्रेमभंग झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणींच्या तोंडावर हमखास हे गाणे असते. प्रेमात गुलाबी मौसमात असताना घेतलेल्या शपथेचं अन् एकमेकांना दिलेल्या वचनांची आठवण करून देत त्यांच काय झालं? असा आपल्या कातर आवाजात जोडीदाराला प्रश्न विचारत थेट प्रेमभंगाच्या भावनेलाच साद घालतात.

पुढे याच गाण्याला त्यांना सर्वोकृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला.

त्यासोबतच करिअर मधील सहावा फिल्मफेअर देखील या गाण्याला मिळाला. याला पुरस्कार किती मिळाले त्याहीपेक्षा आजही हे गाणे एकांतात ऐकणारे अनेक भिडू आपल्याला आपल्याच आजूबाजूला पाहायला मिळतील. यामुळेच हे गाणं आजही जिवंत वाटतं.

यानंतर रफी एक्सप्रेस सुसाट निघाली. एका पेक्षा एक सुपरहिट गाण्यांची त्यांनी लाईनच लावली. ‘हम किसी से कम नहीं’, ‘यादों की बारात’, अभिमान, बैराग, लोफ़र, हवस, दोस्ताना, अदालत, अमर अकबर एंथनी, कुर्बानी यासारख्या अनेक चित्रपटांसाठी गायलेली गाणी त्यांनी आपल्या आवाजात अजरामर केली आहेत.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.