आता राहुल गांधींच्या आजूबाजूला ‘बडवे’ असल्याचा आरोप होतोय.. हे बडवे नेमके कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात थोडंसं मागं जा… एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बंद करून गुवाहाटीला गेले होते तिथपर्यंत… आलात? आता तो प्रसंग आठवा जेव्हा उद्धव ठाकरेंना उद्देशून आमदार संजय शिरसाठ यांनी सर्व आमदारांच्या वतीने एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचा आशय होता ‘मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील तुटत गेलेला संवाद’ ज्याला कारणीभूत ठरवण्यात आलं होतं ‘बडव्यांना’. 

या घटनेची आठवण करून देण्याचा उद्देश म्हणजे राज्यात जशी परिस्थिती जून महिन्यात शिवसेनेवर उद्भवली होती तशीच परिस्थिती सध्या देशपातळीवर एका पक्षावर आलीये. हा पक्ष म्हणजे…  

‘काँग्रेस’ 

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यापासून राहुल गांधींना धारेवर धरलं आहे. प्रत्येक मुलाखतीत ते राहुल यांच्या चुका दाखवत आहेत. पण राहुल यांच्यावर टीका करणारे एकटे आझाद आहेत का? तर नाही. 

जयवीर शेरगिल, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांमधील महत्वाचा चेहरा… शेरगील यांनी सुद्धा २४ ऑगस्टला त्यांच्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांनी देखील राहुल गांधींवरच टीका केली होती. 

दोघांनीही राहुल गांधींच्या आसपासचे लोकं त्यांच्या पर्यंत पोहचू देत नाहीत असा आरोप केला आहे. म्हणजेचं आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय भाषेत सांगायचं झाल्यास ” माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” ही थिम.

आझाद आणि शेरगील यांनी जरी समोर येऊन हे थेट बोललं असेल तरी इतर नेत्यांनी देखील वेळोवेळी ही गोष्ट अप्रत्यक्षपणे किंवा खाजगीत मांडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. म्हणून राहुल गांधींच्या बाजूचे ‘बडवे’ कोण? हे एकदा बघणं गरजेचं आहे… 

के.बी. बायजू 

आझाद यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात राहुल गांधींच्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचा उल्लेख केला होता. राहुल गांधी त्याचं ऐकत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आझाद यांच्या बोलण्याचा रोख बघितला तर के.बी. बायजू यांचं नाव पहिले येतं, असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितलं. 

के. बी. बायजू हे गांधींच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) माजी सदस्य म्हणून ओळखीचे आहेत. 

१९९१ मध्ये बायजु यांना पक्षाचे सेक्युरिटी डिटेल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पण २००७ मध्ये बायजू पक्षाचे सरचिटणीस बनले होते तेव्हापासून ते राहुल गांधींच्या टीमचा भाग आहेत. 

बायजू यांना काँग्रेस पक्षात औपचारिक इथं नाहीये पण राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यापासून ते यावर्षाच्या सुरुवातीला गोव्यात झालेल्या निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बायजु सांभाळतात. शिवाय भारत जोडो यात्रेशी संबंधित प्रमुख व्यक्तींमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

काँग्रेसच्या काही नेत्यांच्या माहितीनुसार, राहुल गांधींचा सर्व प्रवास बायजू सांभाळतात. म्हणून त्यांना पावर इतकी पावर मिळालेली आहे की राहुल गांधींनी कुणाशी, कुठे भेटावं हे ते ठरावात शिवाय राहुल यांच्यासोबत स्टेजवर देखील अनेकदा दिसतात. राहुल गांधींसाठी बायजूंचं महत्व अगदी एका प्रसंगावरून सांगायचं तर… 

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून पायउतार होण्यापूर्वी बायजुच कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राहुल गांधींमधील  संदेशवाहक होते. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पद सोडल्यानंतर यामागे बायजु यांना कुठेतरी जबाबदार ठरवल्याच्या चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु होत्या, असं सांगितलं जातं. 

अलंकार सवाई

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलंकार सवाई हे आयसीआयसीआय बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी आहेत, जे आज राहुल गांधींच्या पर्सनल स्टाफचा भाग आहेत. राहुल गांधींचं दैनंदिन कामकाज सवाईच सांभाळतात. काही काळ ते राहुल गांधींचा सोशल मीडिया देखील सांभाळत होते.

राहुल गांधींशी संपर्क साधायचा असेल तर आधी सवाई यांच्याशी डील करावं लागतं अशी सवाई यांची काँग्रेसच्या वर्तुळात ओळख आहे. तसंच राहुल यांचा माध्यमांशी असलेला संपर्क देखील ते कंट्रोल करतात. प्रेस कॉन्फरन्स सोडल्या तर गांधींचा प्रसारमाध्यमांशी संवाद मोठ्या प्रमाणावर मर्यादित करण्यात आला आहे, यामागे सवाई असल्याचं बोललं जातं. 

राहुल गांधींच्या प्रत्येक राजकीय दौऱ्यांमध्ये सवाई त्यांच्यासोबत दिसतात. 

त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगितली जाते की, सवाई जेव्हापासून राहुल गांधींच्या स्टाफमध्ये सामील झाले तेव्हापासून राहुल गांधींच्या टीमचा विस्तार झाला आहे मात्र तरी सवाई  ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदावर कायम आहेत.

कनिष्क सिंह

कनिष्क सिंग यांना राहुल गांधींचे जवळचे मित्र म्हणून काँग्रेसमध्ये संबोधलं जातं. राजस्थानचे माजी राज्यपाल एस.के.सिंग यांचे ते पुत्र आहेत. कनिष्क यांनी व्हार्टन बिझिनेस स्कूलमधून एमबीए केलं आहे. एका न्यूयॉर्कबेस्ड मर्चंट बँकिंग फर्ममधील काम सोडल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँगेस पक्षासोबतच केली होती. 

सुरुवातीच्या काळात कनिष्क शीला दीक्षित यांच्यासोबत काम करत होते. २००४ मध्ये ते गांधी कुटुंबियांच्या नरजेत आले जेव्हा त्यांनी एक लेख लिहिला होता ज्यात त्यांनी सोनिया गांधी यांची तुलना जॉन केरी यांच्याशी केली होती आणि दोघांच्याही विजयाचं भाकीत केलं होतं. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीपासून ते गांधी कुटुंबासोबत जोडले गेले.

त्यातल्या त्यात कनिष्क राहुल यांचे जास्त जवळचे मानले जातात, अगदी राहुल यांचा उजवा हात समजा. ते राहुल यांची सर्व गंभीर प्रकरणं सिंह सांभाळतात. त्यातही कायदा, सुरक्षा याकडे विशेष लक्ष ते देतात, अशी माहिती आहे. 

सचिन राव

सचिन राव देखील कनिष्क यांच्याप्रमाणेच एमबीए ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी मिशिगन बिझनेस स्कूलमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि इंटरनॅशनल बिझनेसचं शिक्षण घेतलं आहे. ते सध्या राव सध्या कर्मचारी प्रशिक्षण आणि ‘INC संदेश’चे प्रभारी आहेत. सोबतच राव हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे (CWC) सदस्यही आहेत. ही कमिटी म्हणजे पक्षाची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.

यापूर्वी त्यांनी इंडियन युथ काँग्रेस (IYC) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संस्थांचं कामकाज सांभाळलेलं आहे. 

२००७ मध्ये राहुल यांनी जेव्हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाची सूत्रं हाती घेतली होती तेव्हा राव यांना सोबत घेऊन त्यांनी IYC आणि NSUI च्या पुनर्बांधणीचं काम केलं होतं. नव्या सरचिटणीसांची पक्षातील ही पहिलीच असाइनमेंट म्हणून त्याला संबोधलं गेलं होतं.

राहुल यांच्या कार्यकाळात २००७ ते २००९ दरम्यान पहिल्यांदाच या दोन्ही संस्थांच्या अंतर्गत निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. ही राव यांचीच आयडिया होती, असं सांगितलं जातं. 

प्रवीण चक्रवर्ती

चक्रवर्ती हे सध्या काँग्रेसच्या डेटा अँड अॅनालिटिक्स शाखेचे अध्यक्ष आहेत. तसंच आर्थिक धोरणांशी संबंधित सगळे व्यवहार राहुल गांधींना सांगण्याचं, व्यवहार सांभाळण्याचं काम ते करतात. चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील एक टीम पक्षासाठी सर्वेक्षण आणि डेटा-आधारित तांत्रिक उपक्रम चालवते, असं सांगितलं जातं. 

अलिकडेच त्यांनी काँग्रेसच्या डिजिटल सदस्यता मोहिमेचं देखील नेतृत्व केलं. एमबीए केलेल्या चक्रवर्ती यांनी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत बहुचर्चित NYAY किमान वेतन हमी योजनेवर काम केलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल यांनी दारिद्र्य आणि बेरोजगारीवर कॉंग्रेस पक्षाचा रामबाण उपाय म्हणून या योजनेची घोषणा केली होती. 

मात्र NYAY योजना काँग्रेसला निवडणूक जिंकवून देऊ शकली नव्हती.

के. राजू

१९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी के. राजू २००९ मध्ये काँग्रेससोबत जोडले गेले. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी त्यांना काँग्रेसच्या गोटात आणलं होतं. सध्या ते राहुल गांधी यांच्या टीमचा भाग असून अल्पसंख्याक आणि जातीय राजकारण, समाज कल्याण यांच्याशी संबंधित कारभार सांभाळतात.

अशा सर्व व्यक्तींवर सध्या राहुल यांचे बडवे म्हणून आरोप केले जात आहे. काँग्रेसच्या कित्येक नेत्यांनी यातील अनेकांकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं आहे. महाराष्ट्रात या ‘बडवे’ आरोपानंतर काय झालं? आपल्याला माहीतच आहे. तेव्हा आता काँग्रेसला हा आरोप कुठे घेऊन जाईल? हे बघणं गरजेचं आहे… 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.