रायगडावर केलेली लायटिंग कितपत योग्य?

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिम्मित किल्ले रायगड आकर्षक रोषणाईने उजळून निघाला. रायगड अंधारात राहायला नको आणि शिवजयंती दिवशी आकर्षक दिसावा म्हणून ही लायटिंग केली गेल्याच सांगितलं गेलं. मात्र या डिस्को लाईटवरुनच आता वादाला तोंड फुटलं आहे.

नक्की काय झालयं रायगडावर? 

शिवसेनेचे खासादर श्रीकांत शिंदे हे चार दिवसांपूर्वी रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गडावरील अनेक प्रश्नांकडे लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपाय सूचवले. शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचे वाटप करण्याचे ठरले. सोबतच तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत देत शिंदेनी त्यांचे पालकत्वदेखील स्वीकारले.

या रायगड दौऱ्यावेळी शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी शिंदे यांच्या रायगड किल्यावरील विद्युत रोषणाईची गोष्ट लक्षात आणून दिली. निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्युत रोषणाईचे नुकसान झाल्याने ती बंद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुरातत्व खात्याने देखील त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला, आणि रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. मात्र, विद्युत रोषणाई करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले.

त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो काही फंड लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका. १९ फेब्रुवारी पर्यंत रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले.

यानुसार खा. श्रीकांत शिंदे यांच्या खर्चाने हि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. 

मात्र यानंतर या रोषणाईवर सर्व स्तरातून आक्षेप घेण्यात येत आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काळा दिवस म्हणून तुलना

यावर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून ही विद्युत रोषणाई म्हणजे विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी असल्याचं मत नोंदवलं. तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं ही ते म्हणाले.

यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझ्या दृष्टीने रायगडचा विषय संपला आहे. अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेतला तो योग्य नाही. साधे लाईट लावले असते तर काही नाही मात्र डिस्को लाईट लावले. मी अध्यक्ष असून देखील काहीही करायचं असेल तर आधी परवानगी घेतो, मग हे कसं झालं? असं हि ते म्हणाले.

याबाबतील खुलासा करताना श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत की,

मी कधी डिस्कोथेकमध्ये गेलेलो नाही त्यामुळे डिस्कोथेकची लायटिंग कशी असते मला माहित नाही. या रोषणाईमुळे रायगड किल्ल्याच्या सौदर्यात भरच पडलेली आहे. त्यामुळे शिवजयंतीचा दिवस या रोषणाईमुळे रायगडासाठी काळा दिवस आहे असे संभाजीराजेंची केलेले टोकाचे वक्तव्य योग्य नाही. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लायटिंगवर आक्षेप 

रायगडावर करण्यात आलेल्या या लायटिंगवर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी देखील आक्षेप घेतला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाराजांच्या जयंतीनिमित्त काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काही वेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये अशा गोष्टी होत असतात.

मात्र या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातील पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

छ. शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि सध्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील गडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. मात्र याबाबत संभाजीराजे छत्रपती अधिक बोलू शकतील, असं ही ते म्हणाले. 

गिर्यारोहकांमधून देखील ही रोषणाई बदलण्याची मागणी केली आहे. 

सह्याद्री माउंटेरिंग ऑर्गनायझेशन यांनी देखील रायगड हे पवित्र स्थान असून ही डिस्को रोषणाई बकवास असल्याचे म्हणत लवकरच त्यात बदल करण्याची मागणी केली आहे.

यामुळे एकूणच छत्रपती घराणे, शासन, शिवभक्त आणि गिर्यारोहक या सर्वानीच या विद्युत रोषणाईचा निषेध केला आहे. त्यामुळे आता ही रायगड आकर्षक दिसण्यासाठी केलेली हि रोषणाई कितपत योग्य आहे असा सवाल सगळीकडे विचारला जात आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.