राष्ट्रवादीची ॲाफर स्वीकारुन राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत तर होणार नाही ना ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालांकडून नेमण्यात येणाऱ्या बारा जागांमधून विधान परिषदेवर पाठविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शेट्टींचा घरी जाऊन चांगली तासभर चर्चा करुन पक्षाच्या वतीने त्यांना हा प्रस्ताव दिला आहे.

शेट्टींच्या स्वभावानुसार तत्काळ होकार न देता, या प्रस्तावावर पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत चर्चा करुन दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे शेट्टींनी सांगितले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, शिरोळ विधानसभा मतदारसंघात बदललेली राजकीय गणिते, सध्या देशात असलेला लॉकडाउन आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी पाहता राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय शेट्टींसमोर दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.

मात्र, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर गेल्यामुळे राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत होणार नाही ना? असा प्रश्न शेतकरी संघटनेतील अनेक जाणकारांना पडला आहे.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना एका जीवाने उभी केली होती. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून झाली असली, तरी शेट्टी आणि खोत यांच्या राजकारणामध्ये बराच फरक आहे. शरद जोशी यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर जातीयवादी गिधाडांशी युती केली, असा आरोप करून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात संघटनेला मोठा जनाधार आहे, संघटनेची मोठी ताकद आहे. या भागात संघटना कायमच आक्रमक राहिली आहे. विशेष करून ऊस दरासाठी संघटनेने रस्त्यावर उतरून आपल्या ताकदीच्या जोरावर वाहतूक बंद करून सरकारकडून अपेक्षित ऊसदर घेतला आहे. शेट्टी-खोतांनी बांधलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या आक्रमतेमुळेच हजार-बाराशे रुपयांवर असणारा ऊसदर दोन हजारांपुढे गेला आहे. 

सांगली, सातारा, सोलापूर या पट्ट्यात साखर कारखानदार, दूध डेअरींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, त्यामुळे नाईलाजाने राजू शेट्टींची सर्व आंदोलन हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच झाली.

त्यामुळे शेट्टींनी शरद पवार यांना टोकाचा विरोध केला. या संघर्षातूनच पवारांनी राजू शेट्टींची जात काढली होती. शरद जोशींशी ज्या कारणावरुन फारकत घेतली, त्याच भाजपशी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शेट्टींनी मैत्री केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. खुद्द मोदी यांनी सांगलीच्या सभेत शेट्टींच्या कामांचा गौरव केला. शेट्टी लोकसभा निवडणूक जिंकले. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची आशा होती. पण, मोदींकडून ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. केंद्रात मंत्रिपदाचा मनोभंग झाल्यानंतर शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतली आणि केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीकेचा आसूड ओढणे सुरू केले.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधून सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रिपद घेतले, विधान परिषदेवर वर्णी लावून घेतली. मंत्रिपद मिळाल्यामुळे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात धुसफूस सुरू झाली. याचा परिणाम म्हणून सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. खोतांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. दरम्यानच्या काळात झालेला शेतकरी संप आणि आंदोलनांमध्ये खोत यांची भूमिका वादग्रस्त राहिली.

राजू शेट्टी यांनी देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून दिल्लीत महामोर्चाचे आयोजन केले. किसान संसद आयोजित करून त्यांनी संसद परिसरात ठिय्या मांडला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे ही भूमिका ठेवून राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जुळवून घेतले. त्याचवेळी आयुष्यभर ज्या पवारांवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली, त्याच नेत्यांबरोबर आता कसे जायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पण, पर्याय ही नव्हता.

लोकसभा निवडणुकीत त्यांना हातकणंगलेची जागा राखता आली नाही. राजू शेट्टींचा पराभव झाला, हातातून खासदारकी गेली. शिरोळमधून आमदारकी मिळविणे तितक सोपं राहिलं नव्हत. २०१४ मध्येच ती जागा स्वाभिमानीकडून शिवसेनेने घेतली होती. २०१९ ला ती जागा लढवून जिंकणे शेट्टींना सोपे नव्हते. त्यांनी स्वाभिमानीचा उमेदवार दिला पण, जागा जिंकता आली नाही. 

आता शिरोळ विधासभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा मुसंडी मारणे शेट्टींना अवघड आहे. शिवाय निवडणुका होण्यास अजून चार वर्षांचा वेळ आहे. त्यामुळे आता शेट्टींना राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारुन विधान परिषदेवर जाण्यावाचून पर्यायच नाही. हाच त्यांच्यासमोरील राजकीय पुनर्वसनाचा सोपा पर्याय आहे.

मात्र, आजपर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून राजकारण केले, जनाधार वाढवला त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तिकिटांवर विधान परिषदेत जायचं का, असा प्रश्न शेट्टी यांना पडला असावा. किंबहुना शेट्टी यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पडला असावा.

पण, राजकारणात शेट्टींना आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर शेट्टींना राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारावा लागणार आहे. शेवटी राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र असत नाही.

शेट्टींचा सदाभाऊ होण्याची शक्यता कमी

विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतल्यानंतर शेट्टींचा सदाभाऊ खोत होईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सदाभाऊ खोत यांनी आमदारकी आणि राज्यमंत्रिपद मिळताच सरकार धार्जिणी भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांचा संप फोडण्यात भूमिका बजावली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पहाटे घेतलेली पत्रकार परिषद सदाभाऊ खोत यांच्या आग्रहामुळेच घेतल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्यांशी, शेतकरी संघटनेशी द्रोह करण्याचे काम सदाभाऊ खोत यांनी केल्याचा आरोप अनेक संघटना करीत होत्या. कृषी राज्यमंत्री असूनही शेतकरी आणि शेती प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता.

आता विधान परिषदेवर गेल्यानंतर राजू शेट्टी यांना ही अशीच भूमिका घ्यावी लागेल काय, शेतकरी विरोधाची भूमिका घ्यावी लागेल काय, अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. पण, शेट्टींनी यापूर्वी केंद्र -राज्यात मजबूत सत्तेत असलेल्या आणि देशभर मोदींची जादू कायम असताना सत्ताधारी भाजपशी उघड-उघड फारकत घेतली होती. देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र आणून भाजप सरकार विरोधात आवाज उठवला होता. आज त्यांच्या पुढे पर्याय नाही म्हणून ते विधान परिषदेवर जाण्याचा विचार करीत आहेत.

मात्र, पुढील लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाण्याबाबत वेगळा विचार करु शकतात किंवा ज्या तडफदारपणे भाजपशी असलेली मैत्री तोडली त्याच तडफदारपणे राष्ट्रवादी बरोबर असलेली मैत्री तोडतील किंवा तितकी धमक त्यांच्यात आहे.

सत्तेशी चिटकूनच राहयचे असते, तर आजवर  ते तसे कधीही करु शकले असते. त्यामुळे शेट्टींचा सदाभाऊ खोत होईल, असे आजतरी वाटत नाही. वेळ आल्यास जसे भाजपला सोडले, तसेच शेट्टी राष्ट्रवादीला ही सोडतील. 

राष्ट्रवादी काँग्रेसची सेफ गेम

राष्ट्रवादी काँग्रेसने शेट्टींना विधान परिषदेची ऑफर देऊन सेफ गेम खेळला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या बारा आमदारांमध्ये कुणाचीही राजकीय सोय लागणार नाही, त्यांची पात्रता पाहूनच नियुक्ती केली जाईल, असे थेट संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून शेट्टींना ऑफर दिली गेली असल्याचे कळते. शेट्टी शेतकरी नेते आहेत, शेतकऱ्यांसाठी त्यांनी रस्त्यांवर उतरून आंदोलने केली आहेत.

राज्यपालांनी त्यांची नियुक्ती नाकारल्यास राज्यपाल शेतकरी विरोधी आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीला करता येणार आहे.  महाराष्ट्रातील  जनतेमध्येही असाच संदेश जाऊ शकतो. त्यामुळे शेट्टींची नियुक्ती राज्यपालांना सहजासहजी नाकारता येणार नाही.

शिवाय यामागे काही स्थानिक गणितेही असल्याचे समोर आले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जयंत पाटील आपल्या मुलाचे भविष्य अजमावून पाहण्याच्या विचारात असल्याचे कळते. त्यामुळे शेट्टींची विधान परिषदेवर वर्णी लावून जयंतराव आपल्या मुलासाठी हातकणंगले मतदारसंघ सेफ करीत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

एकूणच शेट्टी यांचे राजकीय पुनर्वसन होणार असले, तरी शेट्टी यांच्या निवडीमागे राष्ट्रवादीचा फायदा आहे.

शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिल्यास या भागात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला सहज आव्हान देऊ शकेल. शेट्टींची राष्ट्रवादी काँग्रेसलाही गरज असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

लेखक : दत्ता जाधव 

संपर्क : dattajadhav2009@gmail.com

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.