यापूर्वी देखील अनेकदा टिकैतांनी आपल्या विधानामुळे शेतकरी आंदोलनाला अडचणीत आणलंय

लखीमपूर  हिंसाचारात आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, इतर २ जण हे भाजपा कार्यकर्ते असल्याचं समोर आलंय. याशिवाय एका स्थानिक पत्रकाराचा देखील या घटनेत मृत्यू झाला. लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती .  देशातील विरोधी पक्ष देखील या घटनेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मंत्री पुत्र असणाऱ्या आशिष मिश्राला अटक सुद्धा करण्यात आलीये. हे प्रकरण एकूणच देशभरात चर्चेचा विषय ठरलंय.

शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेतील ‘क्रिया- प्रतिक्रिये’च्या विधानाने व्यासपीठावरील सर्व शेतकरी नेते अवाक झाले. लखीमपूर खेरीमधील शेतकऱ्यांना कारखाली चिरडून टाकण्याच्या घटनेनंतर आंदोलकांच्या जबर मारहाणीत दोन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याचे टिकैत यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले.

आता बघूया राकेश टिकैत यांनी कोणते वादग्रस्त विधान केले ते.

“गाडी मध्ये बसलेले लोक कोण होते, ज्यांनी लोकांना (शेतकरी आंदोलन कर्त्यांना ) चिरडले ? आणि त्यानंतर ज्यांनी (शेतकरी आंदोलनकर्ते) लाठी ने हमला केला ते दोषी कसे ? ”

यापुढेही ते म्हणाले कि,

” ती क्रिये ची प्रतिक्रिया होती. जर कोणी गाडी ने लोकांना चिरडत आहे आणि त्यानंतर लोक लाठी चालवत आहे तर हे षडयंत्र नाही. हे कोणते पूर्वनियोजन नाही. हि हत्या असू शकत नाही, आम्ही अशांना (लाठीने हल्ला करणारे शेतकरी) दोषी समजत नाही . दोषी तर ते लोक आहेत ज्यांनी गाडीने लोकांना चिरडले.”

राकेश टिकैत यांच्या या विधानामुळे शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण राकेश टिकैत यांची वादग्रस्त विधान करून शेतकरी आंदोलन अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी अशा प्रकारची विधाने केली आहे.

त्याआधी आपण हे बघू कि हे राकेश टिकैत आहेत तरी कोण ? त्यांच्याकडे आंदोलनचे नेतृत्व गेले तरी कसे ?

खरंतर, राकेश टिकैत यांचे पिता महेंद्र सिंह टिकैत हे एक शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांचाच वारसा म्हणून राकेश टिकैत यांना शेतकऱ्यांचं एवढ्या मोठ्या संख्येत पाठबळ मिळालंय. टिकैत कुटुंब गेल्या कित्येक दशकांपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढत राहिलंय.राकेश टिकैत १९९२ साली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर सरकारी नोकरी करत होते. मात्र, आपल्या वडिलांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. १९९३ – ९४ साली लाल किल्ल्यावर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व महेंद्र सिंह टिकैत यांच्याकडे होतं. या आंदोलनात राकेश टिकैत हेदेखील वडिलांसोबत सहभागी झाले. सरकारकडून आंदोलन संपवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 तेव्हा राकेश टिकैत यांनी सरकारी नोकरी सोडत शेतकऱ्यांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राकेश टिकैत हे शेतकरी आंदोलनात सक्रिय आहेत.

शेतकरी आंदोलनाला राकेश टिकैत यांच्या विधानांमुळे अनेकदा अडचणीत आणलंय असा आरोप अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर याआधी सुद्धा केलाय

आता बघूया कि याआधी त्यांनी अशी कुठली विवादास्पद विधाने केलीत ज्यामुळे शेतकरी आंदोलन अडचणीत आलंय 

ऑगस्ट २०२१ मध्ये हरियाणा मधील सिरसा येथे शेतकरी संमेलनात त्यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप लावले.  ते म्हणाले कि उत्तर प्रदेश च्या निवडुणकीआधी कुठल्यातरी मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करण्यात येईल. यांच्यापासून तुम्ही सावध राहा. मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करून ते देशात हिंदू मुसलमान करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील.

राकेश टिकैत एवढ्यावरच थांबले नाहीत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हरियाणा येथील करनाल येथे पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्ज ची तुलना त्यांनी तालिबानशी करून टाकली. ते म्हणाले कि

” ज्यांनी डोकं फोडण्याचा आदेश दिला तो तालिबान चा कमांडर आहे. आणि पोलिसांच्या ताकदीने सरकार या देशावर कब्जा करू पाहत आहे.”

२६ जानेवारी ला लाल किल्ल्यावर झालेल्या शेतकरी हिंसाचारानंतर  सुद्धा राकेश टिकैत यांनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते  कि,

“लाल किल्ल्यावरील हिंसाचारात उपद्रवी झेंडा लावत होते तेव्हा पोलिस कुठे होते? त्यांनी गोळीबार का केला नाही? हिंसाचार करणारे तिथून कसे पळाले? पोलिसांनी त्यांना का जाऊ दिले”
लाल किल्ल्यावरील हिंसेदरम्यान पोलिसांनी गोळीबार का केला नाही?

असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने टिकैत यांच्यावर टिका झाली. शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याची टिकैत यांची इच्छा होती का? असा सवाल उपस्थित केला गेला.

राकेश टिकैत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची शृंखला मोठी आहे. नुकतंच  लखीमपूर हिंसाचारवर केलेल्या  वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सतत च्या वादग्रस्त विधानामुळे शेतकरी आंदोलनातील मागण्या पूर्ण होण्यास अडचण येतेय असाच काहीसा सूर शेतकरी आंदोलनकर्त्यांमधून उमटत आहे. आता राकेश टिकैत यांचे हे वादग्रस्त विधान आंदोलनाला काय वळण देईल हे बघणं महत्वाचं असेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.