खरंच रमा नाईकच्या एन्काऊंटरची सुपारी दुबईमधून दिली गेली होती ?

मुंबई अंडरवर्ल्डमधील एन्काऊंटर हा त्याकाळी पोलिसांना मिळालेला फ्रीहँड होता असं म्हटलं जायचं पण सोबतच पोलिसांना मिळणारी एन्काऊंटरची थेट माहिती हि पडद्याआडून कोणतरी पुरवत असल्याचं बोललं जायचं आणि त्यात दाऊद इब्राहिम हे नाव पुढे यायचं. बीआरए टोळी अर्थात बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांनी बनवलेली हि टोळी एकेकाळची सगळ्यात खतरनाक टोळी समजली जायची.

बीआरए टोळीतल्या बाबू रेशीमची थेट जेलमध्ये हत्या करण्यात आली होती त्यामुळे रमा नाईक आणि अरुण गवळी यांना मोठा धक्का बसला होता. रमा नाईकचा सुद्धा एन्काऊंटर इतका गाजला होता कि तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अगोदर बीआरए टोळी हि दाऊद इब्राहीमसोबत काम करायची पण जेव्हा बाबू रेशीमची हत्या करण्यात आली तेव्हापासून रमा नाईक आणि अरुण गवळी डी गँगपासून फटकून वागू लागले कारण त्यांचा हक्काचा साथीदार दाऊदमुळे मारला गेल्याच बोललं जात होतं. 

पण रमाकांत नाईक हा दाऊदला आपला दोस्तच मानत होता. दाऊदच्या टोळीतील शरद शेट्टी उर्फ अण्णा याच्यासोबत रमा नाईकचा एका जमिनीच्या कारणावरून वाद झालेला होता. दाऊदसाठी शेट्टी आणि रमा नाईक दोघेही खास होते. शरद शेट्टी हा तस्करीच्या पैश्यातून दाऊदला भरपूर पैसे मिळवून देत असे आणि तो तेव्हा दाऊदचा उजवा हात होता.

रमाकांत नाईकने अनेक महत्वाच्या कामात दाऊदला साथ दिली होती. दाऊदच्या जीवावर उठलेल्या समद खानला संपवण्यात रमा नाईकचा मोठा वाटा होता. दाऊद शेट्टी आणि नाईकला दुखवू इच्छित नव्हता म्हणून त्याने पर्सनली या जमिनीच्या वादात भाग घेतला. जेव्हा फोनवर नीट बोलणं झालं नाही तेव्हा दाऊदने दोघांनाही बोलावून घेतलं, म्हणणं ऐकलं आणि यात त्याला शरद शेट्टीची बाजू जास्त महत्वाची वाटली आणि दाऊदने रमाविरुद्ध भूमिका घेतली.

रमाकांत नाईकने पुन्हा त्या जमिनीवर आपला दावा ठोकला आणि बंड पुकारलं. दाऊदने डोकं वर काढणाऱ्या रमा नाईकला बाजूला सारण्यासाठी बरेच फोन फिरवले होते असं बोललं जातं. २४ जुलै १९८७ रोजी दक्षिण मुंबईतल्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक राजेंद्र काटदरे यांना रमा नाईक कुठे आहे याची माहिती मिळाली. रमा नाईकला मरेपर्यंत त्याच्यावर एकही केस नव्हती. 

चेंबूरमधल्या एका सलूनमध्ये रमा नाईक केस कापायला गेलेला होता. माहिती मिळताच काटदरे यांनी रमाला संपवण्याचा डाव आखला. त्या सलूनच्या समोर पोलिसांची गाडी धडकताच आतून काहीतरी हालचाल झाली आणि पोलिसांवर फायरिंग सुरु झाली.

प्रत्युत्तर म्हणून पोलीस सावध झाले आणि त्यांनीही फायरिंग सुरु केली. काटदरे यांनी अत्यंत हिमतीने पुढे सरसावत फायरिंग केली, आतून गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याने किंकाळी ठोकली. या चकमकीत रमा नाईक ठार झाला.

सलूनच्या दरवाज्याजवळ रमा नाईक पडला होता. रमा नाईकच्या एन्काऊंटर बद्दल आजही बराच गोंधळ असल्याचं बोललं जातं. अनेक माध्यमांनी भिन्न भिन्न वर्णन केली. इन्स्पेक्टर राजेंद्र काटदरे यांनी रमा नाईकला शरण येण्याचं आवाहन केलं होतं पण त्याने गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि काटदरेंना स्वरक्षणासाठी गोळीबार करावा लागला त्यात नाईक ठार झाला.

असं म्हणतात कि दाऊदनेच काटदऱ्यांना माहिती मिळवून दिली होती. काटदऱ्यांनी हि मोहीम यशस्वी केली खरी पण हीच त्यांची मोठी चूक ठरली. रमा नाईकच्या एन्काऊंटरची बातमी भरपूर व्हायरल झाली. काटदऱ्यांना अपेक्षा होती कि या कामगिरीचं काहीतरी जबरी बक्षीस त्यांना मिळेल पण या एन्काऊंटरमुळे तिथंच काटदऱ्यांची कारकीर्द संपली. 

काटदऱ्यांना याच सेलिब्रेशन करता आलं नाही पण दुबईच्या व्हाईट हाऊसमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. शरद शेट्टीला या एन्काऊंटरचा मोठा आनंद झाला कारण त्याच्या वाट्यातला सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी कायमचा संपला होता. रमा नाईकच्या हत्येने सगळ्यात मोठा शॉक बसला तो अरुण गवळीला कारण अरुण गवळी हा रमा नाईक आणि बाबू रेशीम यांना मोठ्या भावापेक्षाही जास्त मानायचा.

दाऊदने सगळ्यात आधी बीआरए टोळीतल्या बी म्हणजे बाबू रेशीमला संपवलं मग आर म्हणजे रमा नाईकला आता पुढचं टार्गेट गवळी होता. हि मोठी ठिणगी पडली होती आणि अरुण गवळीने आपल्या पद्धतीने एकेकाचा वचपा काढायला सुरुवात केली होती. 

पण रमा नाईकचा एन्काऊंटर हा सगळ्यात जास्त धक्कादायक होता कारण त्याबद्दल अनेक तर्क वितर्क, गूढपणा, वावड्या असं वलय तयार झालं होतं. नाईकचा एन्काऊंटर काटदरेंची नोकरी खाऊन गेला पण दुसर्यांनी त्याच सेलिब्रेशन दुबईच्या व्हाईट हाऊसमध्ये केलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.