प्रशासन म्हणत होतं अण्णाभाऊ फेमस नाहीत,आठवलेंनी मग आपला हिसका दाखवलाय

रामदास आठवले दलित समाजासाठी लढणारं आजच्या राजकारणातील अग्रेसर नाव. सोशल मीडियावर जरी त्यांना ट्रोल केलं जात असलं तरी ज्यांचा आठवलेंशी प्रत्यक्ष संबंध आलाय त्यांचा अनुभव मात्र वेगळा असतोय. आठवलेंकडे काम नेलं आणि ते त्यांनी केलं नाही असं क्वचितच होतं असा आपला अनुभव असल्याचं लोक सांगतात. विशेषतः दिल्लीत महाराष्ट्रातील माणूस गेल्यावर आठवले त्याची जातीनं विचारपूस करतात, दिल्लीत राहण्याची व्यवस्था लावून देतात असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळं ‘आठवले’ म्हणून ‘पाठवले’ म्हणणाऱ्यांनी त्यांची ही बाजू ही पाहावी असं त्यांचे समर्थक सांगतात. 

डॉ.आंबेडकर फाऊंडेशनमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नाव सामील करण्याच्या वादात त्यांची अशीच बाजू समोर आलीय.

‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती उपेक्षितांच्या तळहातावर तरली आहे’असे सांगणारे महाराष्ट्राचे  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगप्रसिद्ध आहे. अनेक लोकनाट्ये, कथा-कादंबऱ्या, नाटकं, पोवाडे, चित्रपट कथांलेखनाचे धनी असलेल्या अण्णा भाऊंचे साहित्य आज १० भाषांमध्ये अनुवादित झालंय. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला मात्र अण्णाभाऊंच्या या कार्याबद्दल कल्पनाच नाहीए. 

भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या फौंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊ साठे यांचं नाव नव्हतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबवल्या जातात. तसेच समाजसुधारक, प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत केली जाते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत रविदास, संत कबीर या महापुरुषांसोबतच राज्यपातळीवरील छत्तीसगढचे संत व सतनामी समाजाचे गुरू बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरू संत अय्यंकली, तमिळनाडूचे गुरू नंदनार, महाराष्ट्रातील संत चोखामेळा, संत नामदेव यांचा यादीत समावेश आहे.

अशा महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊ साठे यांचा देखील समावेश करावा अशी मागणी करणारं पत्र भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला पाठवले होते. 

मात्र या पत्रावर फाउंडेशननं दिलेला रिप्लाय धक्कादायक होता.सुमारे पाच महिन्यांनी फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी स्पष्टीकरण दिलंय .

 ‘‘पत्रातील विनंतीचा गांभीर्याने विचार केला गेला़, मात्र देशातील इतर महापुरुषांप्रमाणे अण्णा भाऊ साठे हे प्रसिद्ध वा प्रतिष्ठित असल्याचे आढळले नाही. त्यामुळे संबंधित योजनेत त्यांचा समावेश केला जाऊ शकत नाही’’ असं त्रिवेदी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. 

तसेच कोणत्या आधारावर फाऊंडेशनने हा निर्णय घेतला हे ही त्यांनी पत्रात सांगितलं नाही. सुधाकर भालेराव यांनी मग हे पूर्ण प्रकरण लावून धरलं. फाऊंडेशन अण्णाभाऊ साठे सारख्या महामानवाला ‘वेल नोन’ नाहीत असं म्हटल्यावर एकच वाद निर्माण झाला.

ही गोष्ट मग केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या लक्षात येतात त्यांनी यात जातीनं लक्ष घातलं. त्या सचिवाला अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असे अपशब्द वापरणं कसं चुकीचं असल्याचं सांगितलं. या अधिकाऱ्याला समज देऊन त्याला माफी मागायला सांगितल्याचंही सांगितलं जातंय. . तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या यादीत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. आठवलेंच्या या स्वीफ्ट ऍक्शननं फौंडेशनचे अधिकारही चांगलेच गोंधळले होते.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.