ना काळा पैसा आला, ना पेट्रोल स्वस्त झालं, आता रामदेवबाबांचं ट्विट पण गायब झालंय

दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा… पुन्हा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. नाय नाय प्राणायाम करायला नाय लावत, तुम्हाला थोडी मन:शांती दिली. सध्या तुमचं आयुष्य लय सुंदर सुरू असंल, घरी भांडणं होत नसतील, जे1 झालं का विचारल्यावर लगेच रिप्लाय मिळत असंल, बॉस कामावर ओरडत नसंल, तरी एक गोष्ट या आनंदाला बट्टा लावत असणार ती म्हणजे पेट्रोल.

जस्ट पेट्रोल भरून आला असाल तर किंमत बघून इंजिनपेक्षा डोकं गरम असणार, म्हणूनच तुम्हाला मन:शांती दिली.

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड सोबत भांडण झाल्यावर दुरावा जेवढा वाढत नाही, तेवढे पेट्रोलचे भाव वाढत गेलेत. गाड्या फुकून टाकायच्या आणि बैलगाड्या घ्यायच्या म्हणल्या तरी खिशात पैशे नाहीत, असं लिहिलेलं आम्ही सोशल मीडियावर वाचलं. एक जुनी मैत्रीण सांगायची, अपेक्षा कायम दुःख देतात, तिनं दाखवलेली स्वप्नं बघण्याच्या नादात तिचं वाक्य कधी सिरियसली घेतलंच नाही.

रामदेव बाबांनी पण असंच एक स्वप्न दाखवलेलं. ‘भारतात काळा पैसा आला तर, पेट्रोल ३० रूपये होणार.’ आम्ही म्हणलं ओके. लगेच धूम पिक्चरमधल्या उदय चोप्रासारखं आम्ही इमॅजिन केलं. आपल्याकडे सुपरबाईक, आपल्या बायकोकडं सुपरबाईक, आईबापाकडं कार, पोरं शाळेत कारनी जातायत. बँकेत पंधरा लाखाच्या एफड्या आहेत, फुल सुखी माणसाचा सदरा फिलिंग!

आम्ही काय खोटं नाय बोलत, हे बघा बाबांचं ट्विट
आम्ही काय खोटं नाय बोलत, हे बघा बाबांचं ट्विट

 

आता किस्सा काय झालाय, गेल्या काही दिवसांत पेट्रोलनं फुल हेल्मेट बिल्मेट काढून सेंच्युरी साजरी केलिये. सामान्य माणसं सचिननं हाणलेल्या शोएब अख्तरसारखं गप पडून आहेत. हे सगळं होतंय म्हणल्यावर स्वप्न दाखवणाऱ्या रामदेव बाबांची आठवण येणारच की.

रामदेवबाबांचं जुनं ट्विट हुडकायला गेलो, तर बाबांनी ट्विट डिलीट केलेलं. साहजिकच सोशल मीडियावर कल्ला सुरू झाला. ट्विटरवर एक युझर म्हणाला, ‘रामदेव बाबा म्हणाले तसं ३० रुपयात पेट्रोल मिळालं, पण फक्त ३०० मिलीलिटर.’ काँग्रेसनं पण ‘हे ट्विट करून गेलात कुठं?’ असा सवाल केला.’ थोडक्यात सोशल मीडियावर रामदेव बाबांची शाळा घेतली गेली.

आता पेट्रोल डिझेलचे सध्याचे दर आपण बघू

गेल्या काही दिवसांत वाढत गेलेलं पेट्रोल कमी व्हायचं नावच घेईना. गुरुवारी महाराष्ट्रातला पेट्रोल दर ५८ पैशांनी वाढून ११२.६५ रूपयांवर पोहोचलाय. तर डिझेलचा भाव आहे १०२.०१ रूपये. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक मुख्य राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलनं किंमतीची शंभरी पार केली आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.