वेस्ट इंडिजच्या तोफांमधलं सगळ्यात खतरनाक नाव मायकेल होल्डिंग होतं…

मनापासून क्रिकेट आवडणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त काय आवडतं? सिक्स मारणारा फलंदाज? नाही. गुगलीवर होणारे बोल्ड? नाही. उत्तर आहे फास्ट बॉलिंग. तेजतर्रार बॉल फलंदाजाच्या कानापासून किंवा डोळ्यांसमोरुन जात असावेत, स्विंग होणाऱ्या बॉलसमोर फलंदाज हुकला की ‘ओह्ह्ह्हह्ह’ म्हणून ओरडायला मिळावं, लयदार बॉलिंग ॲक्शन असणाऱ्या फास्ट बॉलरनं सनासना दांड्या उडवाव्यात… भले समोर आपली आवडती टीम असली, तरी बाजार उठताना पाहण्यात एक चोरटं सुख असतं.

फास्ट बॉलिंगची ही कला, आता काही प्रमाणात कमी झालेली असली, तरी एक काळ होता जेव्हा फास्ट बॉलिंग बघणं ही जन्नत असायची आणि वेस्ट इंडिजची टीम फास्ट बॉलिंगचा आत्मा होती. जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स, कॉलिन क्रॉफ्ट आणि मायकेल होल्डिंग ही त्यांची चौकडी प्रतिस्पर्धी संघांना ‘चांडाळ चौकडी’ वाटायची. 

या चौघांमध्ये सगळ्यात फास्ट होता, मायकेल होल्डिंग.

बऱ्याच खेळाडूंना त्यांचे टीममेट्स, पत्रकार, चाहते यांच्याकडून टोपणनाव मिळायचं होल्डिंगला टोपणनाव मिळालं होतं, अंपायर्सकडून. तेही त्याच्या बॉलिंगमुळं. हे नाव होतं ‘व्हिस्परिंग डेथ.’ शब्दश: अर्थ काढायचा झाला तर, कुजबुजणारा मृत्यू. होल्डिंग काहीसा तिरका पळत यायचा, तो ना दात ओठ खायचा, ना जोर लावायचा, असं म्हणतात पळताना त्याच्या पावलांचा फार आवाजही व्हायचा नाही. अंपायरच्या जवळ आल्यावर एक छोटीशी उडी आणि मग मनगटाचा वापर करुन हातातून गोळी सुटावी अशा स्पीडनं बॉल सुटायचा. त्या गोळीचा वारा अम्पायर्सना जाणवायचा. त्यात तो बाऊन्सर असला तर फलंदाजाला आपल्या बरगड्या, डोकं वाचवावं लागायचं. होल्डिंग इतका अचूक होता, की त्याच्या बाऊन्सरमुळं फलंदाजाला बॉलचा वास कसा असेल हे समजायचं.

आपल्या कसोटी कारकिर्दीत होल्डिंगनं ६० मॅचेस खेळत २४९ विकेट्स घेतल्या. तो अगदीच ऑलराउंडर नसला, तरी संघाला गरज असताना बॅटिंगमध्ये चमक दाखवत त्यानं ६ कसोटी अर्धशतकंही मारली आहेत. वनडेमध्येही त्यानं १४२ विकेट्स घेतल्या, पण त्याची कसोटी मधली बॉलिंग पाहणं हा सोहळा असायचा.

होल्डिंग आणि अस्थमा

लहान वयातच होल्डिंगला क्रिकेटचं येड लागलं होतं. जसजसं हे प्रेम वाढत गेलं, तसतसा त्याचा अस्थमाही वाढत गेला. बरीच वर्ष होल्डिंग इनहेलर जवळ बाळगून असायचा. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यानं  अस्थम्यावर मात केली आणि जगानं एक डेडली, तरीही तितकाच सुंदर पेस बॉलर पाहिला.

होल्डिंग आणि कमेंट्री

क्रिकेट बघणं हा सुद्धा एक सुंदर विषय असतो. समोर काय घडतंय हे डोळ्यांनी पाहण्यात जितकी मजा असते, तितकीच ते ऐकण्यातही. कमेंट्री करणाऱ्याचा आवाज भारी असावा आणि त्याला क्रिकेटचं सखोल ज्ञान असावं या अगदी बेसिक अपेक्षा होत्या. ज्ञानाच्या बाबतीत होल्डिंग बाप होताच, पण त्याचा आवाज दैवी वाटायचा. त्याच्या आवाजातला खर्ज आणि टिपिकल कॅरेबियन क्सेंट तासनतास ऐकला तरी बोर वाटायचा नाही. होल्डिंगच्या आवाजात कित्येक क्षण अजरामर झाले आणि कित्येक सामन्यांना एक वेगळीच धार चढली. गौरव कपूर होल्डिंगला ‘मॉर्गन फ्रीमन ऑफ क्रिकेट’ म्हणतो, ते काही उगाचच नाही.

ती एक ओव्हर…

क्रिकेटच नाही, तर कुठल्याही खेळाच्या चाहत्यांना ‘ग्रेटेस्ट’ निवडायची सवय असते. म्हणजे ग्रेटेस्ट टीम कुठली, ग्रेटेस्ट कॅप्टन कोण, ग्रेटेस्ट ग्राऊंड कुठलं… असे अनेक विषय असतात. तसाच एक विषय म्हणजे, ग्रेटेस्ट ओव्हर इन टेस्ट क्रिकेट. ही ओव्हर टाकलीये मायकेल होल्डिंगनं आणि समोर फलंदाज होता, जेफ्री बॉयकॉट. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात, होल्डिंगनं बॉयकॉटला पहिले पाच बॉल इतके जोरात टाकले, की बॉयकॉटला अक्षरश: कसरत करावी लागली. काही बॉल बाऊन्सर गेले, एक मांडीला लागला, एक चुकून बॅटला लागला. शेवटच्या बॉलला सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते, होल्डिंग शांतपणे पळत आला… ती नेहमीची क्शन झाली आणि बॉयकॉटचा स्टम्प डायरेक्ट हवेत डान्स करत गेला. ती ओव्हर आजही जगातली बेस्ट ओव्हर मानली जाते आणि होल्डिंगच्या हातात जादू होती, यावर सगळ्या जगाचा विश्वास बसतो.

 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.