नेपाळमध्ये सतत विमान अपघात होण्यामागे फक्त उंच पर्वत हेच कारण आहे का ?

काल नेपाळमध्ये विमान दुर्घटना घडली. ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स या विमानातून प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये सर्व ६८ प्रवशांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. या ६८ प्रवाशांपैकी ४ प्रवासी हे भारतीय होते.

हे विमान नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूहून निघालं होतं आणि पोखरा या ठिकाणी जात होतं. साधारण १८ मिनीटं हे विमान उडालं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर आता नेपाळमध्ये विमान दुर्घटना अधिक होतात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

२००० च्या वर्षापासून ते आतापर्यंत नेपाळमध्ये १७ विमान दुर्घटना झाल्या आहेत.

नेपाळमध्ये विमान दुर्घटना अधिक होण्यामागे काही कारणं आहेत. ती कारणं नेमकी कोणती आहेत हे पाहुया.

सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नेपाळमधली भौगेलिक परिस्थिती.

नेपाळला खरंतर निसर्गाचं वरदान मिळालंय. डोंगर दऱ्यांनी भरलेला असा हा देश आहे. अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर, जगातल्या सर्वात मोठ्या १४ पर्वतांपैकी ८ पर्वत हे एकट्या नेपाळमध्ये आहेत. आता या गोष्टीचा नेपाळला देश म्हणून पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी प्रचंड फायदा होतो. निसर्गप्रेमी, गिर्यारोही अशा सगळ्या मंडळींना नेपाळ स्वत:कडे आकर्षित करून घेत असतं.

हेच पर्वत आणि डोंगर-दऱ्या या नेपाळमधल्या विमान दुर्घटनांमागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.

या पर्वतांमुळे आणि उंच डोंगरांमुळे इथे विमान उडवणं हे धोकादायक आणि जोखमेचं काम आहे. काठमांडू ही एक दरी आहे. काठमांडू साधारणपणे एखाद्या वाटीच्या आकाराचं आहे. चहुबाजूने मोठमोठाले डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये हे शहर वसलंय. ही एकंदरीत परिस्थिती विमानांच्या उड्डाणांसाठी धोकादायक असल्याचं तज्ञ सांगतात.

हे मोठे डोंगर, अनिश्चित हवामान अशी आणखीही बरीच कारणं नेपाळमधल्या विमान दुर्घटनांसाठी कारणीभूत आहेत.

बेसिक विज्ञान काय सांगतं? तर, जितक्या उंचावर जाऊ तितका हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे, डोंगराळ भाग असण्याचा अर्थ असा होतो की, कमी दाबाच्या प्रदेशातून विमानाचं टेकऑफ आणि लँडींग करावं लागतं. जे करणं सर्वसाधरण वातावरणापेक्षा अधिक जोखमीचं असतं.

नेपाळमधल्या हवामानाचा विचार केला तर, नेपाळमधलं हवामान हे बऱ्याचदा अचानक बदलतं. हवामान बदलांमुळे बऱ्याचदा डोंगराळ भागात धुकं पसरतं त्यामुळे पायलटला विमान उडवण्यासाठी अनेक अडथळे येतात. आणि यामुळे नेपाळमधला विमानप्रवास हा धोकादायक होतो.

नेपाळमधलं जुनाट तंत्रज्ञान हे ही एक कारण आहे.

आर्थिक दृष्ट्या जगातील सर्वात कमकुवत देशांमध्ये नेपाळचंही नाव येतं. त्याचा परिणाम असा होतो की, नेपाळमध्ये देशातल्या देशात उडणारी विमानं ही जुनी झालेली आहेत. त्यांच्यामध्ये आताचं अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही. यातलं सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे, रडार किंवा जीपीएस सिस्टीम.

आता रडार किंवा जीपीएस असेल तर, धुक्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने पायलटला दिसायला अडथळा येत असेल तर,  विमानाची दिशा ठरवायला मदत होते. पण, नेपाळमधली बरीच देशांतर्गत विमानं ही जुनी झालेली असल्यामुळे त्यांच्यात हे तंत्रज्ञान नाही.

याच कारणांमुळे, युरोपियन युनियनने नेपाळमधल्या सगळ्याच एअरलाईन्सला २०१३ पासून हवाई सेवा चालवण्यास नकार दिला आहे.

नेपाळची विमान वाहतुक संस्था हाही एक मुद्दा आहे.

सीएएन म्हणजेच सिव्हील एव्हिएशन ऑथोरिटी ऑफ नेपाळ ही नेपाळमधील विमान सेवांसाठीची नियामक संस्था आहे. तर दुसऱ्या बाजुने, हीच संस्था नेपाळमध्ये विमान सेवाही पुरवते. या मुद्दा असा येतो की, काही नियम बनवताना ही संस्था स्वत:च्या बाजुला झुकतं माप देणारं किंवा स्वत:साठी फायदेशीर असा नियम बनवू शकते जे की, सुरक्षेच्या दृष्टीकोनाने धोकादायक आहे.

यासंबंधीत युनायटेड नेशन्सच्या इंटरनॅशनल सिव्हील एव्हिएशन ऑर्गनायझेशनने नेपाळला २००९ मध्येच सुचना दिल्या होत्या. नियामक संस्था आणि सेवा पुरवणारी संस्था या वेगवेगळ्या असाव्यात असं मत व्यक्त करण्यात आलं होतं. परंतु, आजही या दोन विभक्त संस्था झालेल्या नाहीत.

नेपाळमधील माध्यमांच्या वृत्तांनुसार, या दोन संस्था विभक्त न होण्यामागे अंतर्गत राजकारण आहे.

‘काही मोठ्या पदावरील लोकांना हे आवडणार नाही. सध्या या लोकांना दुप्पट फायदा होतोय संस्था विभक्त झाल्यास त्यांना तो फायदा मिळणार नाही.’

एकंदरीत, नेपाळमध्ये विमान अपघातांचं प्रमाण अधिक असण्यामागे डोंगर-दऱ्यांचा असलेला परिसर, अनिश्चितरित्या बदलणारं वातावरण या नैसर्गिक कारणांसह जुनाट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापक पातळीवरील राजकारण या गोष्टीही कारणीभुत आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.