१५ टन सोन्याचा खजिना हुडकून काढला पण कुठे ठेवलाय हेच विसरून गेला.

भावड्या जर तुला १०० रुपयेची नोट मिळाली तर तू काय करशील ? खर्चाचं बाजूला जाऊ द्या हो ती अगदी जपून खिशात ठेवू. चार दिवस ती सांभाळून त्याचा आनंद साजरा करू मग नंतर त्या शंभर रुपयांची अगदी मन भरे पर्यंत चैनी करू.

पण आपला एक भिडू आहे टॉमी थॉमसन नावाचा. या गड्याला १५ टन सोन्याचा खजिना गावलाय. पण तरीही हे येडं गेली ५ वर्षे तुरुंगात आहे. का?

कारण त्याने खजिना शोधला पण तो कुठे ठेवलाय हेच तो विसरून गेला.

चक्कीत जाळ झाला ना? अहो आता गुंजभर सोन्याची किंमतसुद्धा हजारांच्यावर गेलीय. अगदी किलोभर सोनं सापडलं तरी आयुष्य सुखी होऊन जाईल आणि ह्यो माणूस टनाने सापडलेलं सोनं कुठं हरवून बसला. अहो लिहितानाच लई शिव्या सुचत आहेत पण असो कंट्रोल करतो.

तर या स्टोरीची सुरवात होते १८५७ साली.   

अमेरिकेच्या फेमस गोल्ड रशचा हा काळ. देश विदेशातील तब्बल ३ लाख जनता कुदळ फावडंघेऊन सोन्याच्या खाणी शोधण्यासाठी कॅलिफोर्नियाचे डोंगर दऱ्या धुंडाळत होती. अनेकांना सोन सापडलं, कित्येक जणांनी यात प्राण गमावला. अनेकजण रंकाचे राव झाले. कँलिफोर्नियाच पण या निमित्ताने नशीब उजळलं. मागच्या दहा वर्षात बरंच काय काय झालं.

तर या गोल्ड रश मध्ये सापडलेलं २० टन सोने भरून एस.एस.सेंट्रल अमेरिका नावाचं जहाज  ३ सप्टेंबर १८५७ रोजी कॅलिफोर्नियाहुन न्यूयॉर्कला निघालं. या जहाजाचा कप्तान कर्नल विल्यम हेरॅण्डन हा होता. त्याला अमेरिकन नेव्हीचा सर्वात आऊटस्टँडिंग ऑफिसर समजला जायचा. त्याच्या जहाजावर जवळपास साडे चारशे प्रवासी आणि शंभरभर क्रू मेम्बर्स होते.

पहिले तीन-चार दिवस व्यवस्थित गेले. पण जेव्हा त्यांनी क्युबा सोडलं तेव्हा पासून वादळी वाऱ्यांना सुरवात झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे अनेक जण घाबरून गेले. पण जहाजाचा कॅप्टन खमक्या असल्यामुळे काही होणार नाही असंच वाटत होतं.

तीन दिवस हे वादळ जहाजाला झोंबलं. कशीबशी वाट काढत असताना मात्र एकदा जोराची लाट आली आणि जहाजाचा बॉयलर कोसळला. सिलजवळ एक मोठं भोक पडलं. कॅप्टनला कळालं आता जहाज शंभर टक्के बुडणार पण तो पर्यंत वेळ टळून गेली होती.

टायटॅनिक मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे जहाजात लाईफबोटीची कमतरता होती. फक्त शे दीडशे लहानमुले आणि बायकांना वाचवता आलं. बाकीचे सगळे बुडून मेले आणि सोबत तो सोन्याचा खजिना सुद्धा.

हे १५-२० टन सोने समुद्रात गायब होणे हा धक्का साधा नव्हता. अख्खा देश यामुळे हादरून गेला. लोकांनी हाय खाऊन आत्महत्या केली. कित्येक बँका इन्व्हेस्टमेन्ट कंपन्या रस्त्यावर आल्या. घाबरून बँकांमधून पैसे काढणे सुरु झालं. एकामागोमागे के कारणे सुरु झाली आणि अमेरिकेत महामंदी आली.

यालाच अमेरिकन इतिहासात पॅनिक ऑफ १८५७ म्हणून ओळखलं गेलं. त्यातून बाहेर पडायला त्यांना बरीच वर्षे लागली.

कट २ १९८७.

जवळपास शे दीडशे वर्ष हे सोनं समुद्राच्या तळाशीच राहिलं. खरोखर हा अपघात झाला होता की हि देखील एक कॉन्स्पिरसी होती याच्या चर्चा टीव्हीवर चालायच्या. अनेक शूर वीर हंटर या जहाजाच्या शोधात निघाले होते पण त्यांच्या हाताला काही लागलं नव्हतं.

या सगळ्यांच्या प्रमाणेच टॉमी थॉमसन नावाचा एकजण आपलं छोटंसं जहाज आणि १३ जणांची टीम घेऊन या ट्रेजर हंट साठी निघाला.

त्याची टीम सोनार, रोबोट सारखी अत्याधुनिक इक्वीपमेन्ट घेऊन उतरली होती. त्याला या मिशन साठी १६१ लोकांनी मिळून ११ मिलियन डॉलरचे फंडिंग केलं होतं. यातून खजिना सापडला तर त्याचा वाटा आपल्याला मिळेल एवढी त्यांची माफक अपेक्षा होती.

टॉमीला जगातला सर्वोत्कृष्ट ट्रेजर हंटर म्हणून ओळखला जायचा. त्याने कष्ट करून बरोबर ११ सप्टेंबर १९८८ रोजी हा खजिना शोधून काढला. जगभरात त्याच नाव झालं. आजवरचा सर्वात मोठा खजिना त्याच्या बद्दलच्या कथा दंतकथा सगळ्या सापडल्या होत्या. टॉमी वर पैसे लावणाऱ्यानी दिवाळी साजरी केली. पठ्ठ्याने त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला होता.

दुसऱ्या दिवशीच्या जगभरातील सगळ्या पेपरमध्ये त्याचे फोटो चमकले.

हरवलेल्या पैकी बऱ्याचसं सोनं सापडलं होतं. अब्जावधी डॉलरमध्ये त्याची किंमत होती. सोन्याची नाणी विकली तर त्यासाठी लिलाव झाला आणि जगातील महागडी विकली गेलेली करन्सी म्हणून ती नाणी ओळखली गेली.

सुरवातीचा कौतुकाचा पिरियड संपला. मग कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. त्याकाळच्या इंश्युरन्स कंपन्यांनी आम्ही जहाज बुडलं म्हणून लोकांना विम्याची रक्कम दिली ती आता परत पाहिजे म्हणून दंगा सुरु केला. यात काही वर्षे गेली. अखेर ९२% खजिना हा शोधणाऱ्यालाच मिळेल असा निर्णय कोर्टाने दिला.

सगळं व्यवस्थित सुरु होतं अचानक २००५ साली टॉमी वर त्याला शोध मोहिमेसाठी पैसे दिलेल्या इन्व्हेस्टरनी दावा ठोकला. त्यांचं म्हणणं होतं कि टॉमीने सापडलेल्या खजिन्याचा वास देखील त्यांना लागू दिला नव्हता. पुढच्यावर्षी टॉमीचे टीम मेम्बर देखील यात सामील झाले. त्यांना पण हा खजिना मिळाला नव्हता.

मग प्रश्न पडला अखेर खजिना कुठे गेला? टॉमी म्हणला मला लक्षात नाही.

एवढी मोठी स्कीम झाली . गुंतवणाऱ्यानी ११ मिलियन डॉलर त्याला दिले होते. खजिना राहू दे आमचे आमचे पैसे तरी परत द्या असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आली. अशातच टॉमीने काही ऑफशोअर अकाउंट मध्ये पैसे गुंतवलेले सापडले.

आधीच तो गजनी झाला होता त्यानंतर मात्र तो डायरेकट मिस्टर इंडियाच झाला. गायब झालेल्या टॉमीला २०१५ साली शोधून काढण्यात आलं. त्याला बेड्या घातल्या. तरी गडी मान्य करायला तयार होईना कि खजिना कुठे आहे.

तो आजही म्हणतो कि खजिन्यामधील ५०० नाणी त्याच्या जवळ आहेत मात्र ती कुठे ठ्वली आहेत हे त्याला आठवत नाही.

गेली पाच वर्षे तो तुरुंगात आहे. दिवसाला १००० डॉलर प्रमाणे त्याच्यावर फाईन बसवला जातोय. आता साहेब ६८ वर्षांचे झालेत.पुढचं सगळं आयुष्य तुरुंगात जाण्याची शक्यता आहे पण त्याचा कंट्रोल सुटलेला नाही. खरच तो सोनं कुठेतरी लपवून विसरलाय की खर्च करून रिकामा झालाय कळायला मार्ग नाही. गेली १५० वर्षे समुद्रात लपलेल्या त्या शापित खजिन्याचं कोडं अजूनही उलगडत नाही हे नक्की.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.