राजीवजींचा एक निर्णय ज्यामुळे ‘इन्फोसीस’ सारख्या हजारो कंपन्या उभ्या राहिल्या.

आज भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनला आहे. युरोपातल्या कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतीय लोक महिती तंत्रज्ञानाशी संबंधीत व्यवसायात नोकरी करत आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला असतील किंवा गुगलचे सुंदर पिचाई असे अनेक भारतीय मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे नेतृत्व करत जागतिक पातळीवर भारतीयांची मान उंचावत आहेत. आयटीमधलं हे यश मात्र सहजासहजी आलेलं नाही.

यात अनेकांचा हातभार लागला आहे.

जवाहरलाल नेहरूंनी आयआयटी सारखी संस्था स्थापन केली, त्यावेळी तिचा उल्लेख ‘नेहरूंनी पाळलेला पांढरा हत्ती’ असा केला जायचा. मात्र याच आयआयटीमधून हजारो जागतिक दर्जाचे इंजिनिअर बाहेर पडू लागले ज्यांनी पुढे देश घडवला.

१९५३ साली समरेंद्र कुमार मित्रा यांनी कोलकता येथे ‘इंडियन स्टेटस्टीकल इन्स्टिट्यूट’मध्ये  भारतातील पहिला संगणक बनवला. त्यानंतर भारतात ६० च्या दशकात भारतात कॉम्पुटर कंपन्या सुरू होऊ लागल्या होत्या. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांनी अपेक्षित वेग धरला नव्हता.

१९७८ साली जनता सरकारमधील जॉर्ज फर्नांडिस यांनी अमेरिकेच्या त्या काळातील अमेरिकेतील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या ‘आयबीएम’ला देशाबाहेर घालवलं होतं. त्यामुळे आयआयटीमधून पास होणाऱ्या अनेक टॅलेंटेड तरुणांनी भारतात संधी नाही म्हणून अमेरिकेची वाट धरली होती.

त्या काळी भारतातील सत्ताकारणावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता.

त्यामुळे कॉम्प्युटरच्या येण्यामुळे अनेक कामगारांना रोजगार गमवावा लागण्याची भीती सर्वत्र मांडली जायची. त्यातूनच कंप्युटरच्या आयातीवर बरेच निर्बंध लादण्यात आले होते. ‘लायसन्स राज’ला तोंड देत टीसीएस, विप्रो, पटणी कॉम्प्युटर्स अशा भारतीय कंपन्या आपला मार्ग शोधण्यासाठी धडपडत होत्या.

11sld1
इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळातील फोटोत सहकाऱ्यांसोबत नारायण मूर्ती

 

१९८१ साल उजाडलं.

पटणी कॉम्प्युटर्समधून बाहेर पडत नारायण मूर्ती आणि त्यांच्या ६ साथीदारांनी ‘इन्फोसिस’ या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. कंपनी तर स्थापन झाली पण ‘लायसन्स राज’मुळे  इन्फोसिसला स्वतःच टेलिफोन कनेक्शन मिळवायला एक वर्ष तर स्वतःचा कॉम्प्युटर आयात करायला ३ वर्षे लागली.

आज हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे त्या काळातलं वास्तव होतं !

अशातच भारतीय राजकारणाच्या पटलावर राजीव गांधींचा उदय झाला. पूर्वाश्रमीचे पायलट असणारे राजीव गांधी स्वतः टेक्नोसॅव्ही होते. त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं महत्व महत्व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना समजावून सांगितलं.

राजीव गांधींच्याच प्रयत्नामुळे ऑगस्ट १९८३ मध्ये आयटी कंपन्यांसाठीचे अनेक नियम शिथिल करण्यात आले.

scan0252
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विषयावरील राष्ट्रीय परिषदेत राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा

१९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि सत्ताकारणाची सूत्रे राजीव गांधी यांच्या हाती आली. पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर राजीव यांनी सर्वप्रथम ज्याला आज आपण ‘डिजिटल क्रांती’ म्हणून ओळखतो त्या ‘दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान’ धोरणात अमुलाग्र बदल घडवून आणले. पी.एस.देवधर, एन. शेषाद्री, टी.एच. चौधरी अशा तज्ञांनी मिळून या धोरणाला नवीन रुपडं दिलं.

सी- डॉट या संस्थेची उभारणी करण्यात आली आणि  धोरणाच्या   अंमलबजावणीसाठी ‘सॅम पित्रोदा’ नावाच्या अनिवासी भारतीय तज्ञाना भारतात परत बोलवून घेतलं. पुढच्या काळात राजीव-सॅम जोडीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काय कमाल केली याची साक्ष इतिहास कायमच देत राहील. राजीव गांधी हे सगळं करत असताना तत्कालीन विरोधकांनी मात्र या धोरणाविरुद्ध खूप आगपाखड केली.

मात्र राजीव गांधी मागे हटले नाहीत.

अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर देण्यास नकार दिला, तेव्हा हे आव्हान आपलं आपणच पेलायचा निर्णय राजीव यांनी घेतला. या जबाबदारीसाठी त्यांनी विजय भटकर या माणसाची निवड केली. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सीडॅकची स्थापना करण्यात आली. सीडॅकने विक्रमी वेळेत आणि अतिशय कमी किंमतीत ‘परम’ या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती केली. ‘परम’ची निर्मिती बघून सगळं जग भारतीय गुणवत्तेपुढे अवाक झालं.

राजीव गांधींच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार मदरबोर्डच्या आयातीवरील शुल्क माफ करण्यात आलं.

त्याचा फायदा नारायण मूर्तीच्या इन्फोसिससारख्या अनेक छोट्या कंपन्यांना झाला. उपग्रहाच्या माध्यमातून सॉफ्टवेअर निर्यात सोपी झाली. अनेक भारतीय कंपन्या अमेरिकेपेक्षा स्वस्त दरात सॉफ्टवेअर पुरवू लागल्या.

१९९१ च्या जागतिकीकरणानंतर तर भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना अवकाशच खुलं झालं. इन्फोसिसचंच उदाहरण द्यायचं झालं तर पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून कर्जाऊ घेतलेल्या  १०००० रुपयांच्या भांडवलावर सुरू करण्यात आलेल्या या कंपनीने १९९९ सालापर्यंत १०० मिलियन डॉलर वार्षिक उत्पन्नाचा आकडा पार केला.

आजघडीला इन्फोसिसचं वार्षिक उत्पन्न १० बिलियन डॉलर इतकं आहे.

सन २००० नंतर आलेल्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या बूममुळे भारतीयांना माहिती तंत्रज्ञानाच्या यशाची फळे चाखायला मिळाली.

मात्र याचे बीजं राजीव गांधी आणि नारायण मूर्ती यांसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या माणसांनी ८० च्या दशकातच रोवून ठेवली होती.

हे ही वाच भिडू. 

 

2 Comments
  1. Anurag says

    राजीव गाँधीनच महिमा मंडन करणारी मंडली नी बोफ़ोर्स ची कथा पण संगायची ना , लोकांना कळेल कि किती महान होते ते

  2. Shahaji says

    Please check facts. Bhatkaranna Rajiv ne nivadla mhane. Congress chi chatunyapayi kiti fekal re

Leave A Reply

Your email address will not be published.