बहुमत चाचणी म्हणजे काय? चाचणीची प्रक्रिया सुरुवात ते शेवटपर्यंत अशी असते…

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा आता प्रचंड वेग आलाय.. कालच रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे त्यामुळे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.. त्यानुसार राज्यपालांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेत. पुढचे ४८ तास राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचे असणार आहेत. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष उद्याच्या बहुमत चाचणीवर असणारे.

पण याबाबतची साधी सोपी माहिती आपल्याला नसते….त्याच संदर्भातील काही प्रश्न म्हणजे,

  • बहुमत चाचणी म्हणजे काय?
  • ही चाचणी कशी होते?
  • त्यासाठी कितीचं संख्याबळ आवश्यक असतं?
  • कोणत्या पक्षाकडे कितीचं संख्याबळ आहे?
  • याबाबतचा निर्णय कोण घेत असतं ?
  • आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर सरकार कोसळणार का?

उद्या सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विधिमंडळात काय काय घडणार??

तर शिंदे गटानं सरकार अल्पमतात असल्याचं म्हंटलंय आणि त्यानंतर  भाजपच्या शिष्टमंडळाने बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली, त्या मागणीनंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार उद्या सकाळी ११ वाजता विधिमंडळाच्या सभागृहात विशेष अधिवेशनाला सुरूवात होईल. या अधिवेशनात बहुमत चाचणी पार पडेल. 

मात्र सर्वात महत्वाचा बेसिक प्रश्न बहुमत चाचणी म्हणजे काय ? 

बहुमत चाचणीला इंग्रजीमध्ये फ्लोअर टेस्ट असं म्हणतात. कोणत्याही सत्ताधारी पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारं बहुमत नसेल तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात. यासाठी विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं. सभागृहात सर्वात मोठा पक्ष (ज्यांच्याकडे सर्वात जास्त आमदारंही संख्या आहे तो पक्ष) सत्ता स्थापनेचा दावा करतो. तर आपल्याकडे बहुमत आहे की नाही हे बघायला सत्ताधारी एक प्रस्ताव विधानसभेत मांडतो.  

राज्याच्या विधानसभेत २८८ सदस्य संख्या आहे. त्यामुळे बहुमतासाठी १४५ आमदारांची संख्या असणं बंधनकारक आहे. ज्याच्याकडे हा आकडा आहे तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. 

मग बहुमत चाचणीत सद्यस्थितीत कोणत्या पक्षांकडे किती संख्याबळ आहे ? 

 तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ आमदार, काँग्रेसकडे ४४, शिवसेनेकडे १६ आमदार आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीकडे एकूण आमदारांची संख्या आहे ११३ आणि २०१९ ला सत्तास्थापनेवेळी सोबत असणारे अपक्ष मविआलाच मतदान करतील का हे उद्या कळेल.

तर शिंदे गटात – शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि अपक्ष मिळून – ५१ आमदार आहेत….तर भाजपकडे स्वतःचे १०६ आमदार + समर्थक ७ अपक्ष आमदार आहेत तर राज्यसभेत आम्हांला १३४ जणांनी मतदान केल अस भाजपने सांगितलेल. त्यामुळे शिंदे गट, अपक्षांच्या साथीने भाजप बहुमताचा आकडा सहज गाठू शकतो.

आता बघूया बहुमत चाचणीत मतदान प्रक्रिया कशी असते ? 

सभागृहाच्या नियमात असलेल्या तरतुदीप्रमाणे बहुमत चाचणीची संपूर्ण मतदान प्रक्रिया खुल्या पद्धतीने होणार आहे. सभागृहाचे सभापती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. असा प्रस्ताव आणतात तो एका ओळीचा वाचून दाखवतात. 

मग ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांना सभागृहात सभापतींच्या उजव्या बाजूला आणि ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचं आहे त्यांना सभापतींच्या डाव्या बाजूला बसून घेण्यास सांगतात. जे तटस्थ आहे त्यांना सभापतींच्या समोर बसायला सांगितले जाते. 

त्यानंतर मग जे सदस्य प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहेत त्यांना उभं राहण्यास सांगितलं जातं. 

प्रत्येक आमदाराने मतदान करण्यास जागेवरून उठून हेडकॉउंट म्हणजेच शीरगणती करतो. 

यामध्ये आमदार आपलं नाव आणि अनुक्रमांक उच्चारतात. म्हणजेच अमुक आमदार उठतात स्वतःचं नाव सांगतात आणि १ हा आकडा बोलतात. दुसरे आमदार उठतात स्वतःचं नाव सांगून २ हा आकडा बोलतात, तिसरे आमदार उठून स्वतःचं नाव सांगून ३ हा आकडा बोलतात. अशी मतदानाची प्रक्रिया सुरु होते. हे आकडे स्वतः आमदार मोजतात किंव्हा विधिमंडळ सचिवालय त्यासाठी मदत करत असतं. 

अशाप्रकारे प्रस्तावाच्या विरोधात असेलेल्यांनी शिरगणती केली जाते आणि मग तटस्थ सदस्यांची देखील अशीच मोजणी होते. 

मतमोजणी बाबतची सर्व नोंद सभापती आणि विधीमंडळ सचिवालयातर्फे घेतली जाते.  मग प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या आणि तटस्थ राहणाऱ्या आमदारांचा आकडा जाहीर करतात आणि निकाल जाहीर करतात. तसेच बहुमत चाचणीसाठी आवाजी मतदानाचाही नियम आहे. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी राज्यपालांचा असतो. 

त्यानुसार  राज्यपालांनी हेडकॉउंट करण्याचे आदेश दिलेत. त्याप्रमाणे ठरावाच्या बाजूने किती आणि विरोधात किती या मतांची मोजणी करून उपाध्यक्ष निकाल जाहीर करतील.   

विधानसभेवर निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी बहुमत चाचणीच्या दिवशी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावरही बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. कारण, मतदान करायचं की नाही, याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केलं, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरत असतो.

यात पक्षाचा व्हीप जारी केला जातो का ? तर हो.

ठराविक एका बाजूने मतदान करण्यात यावं यासाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हीप म्हणजेच पक्षादेश काढला जातो.

विधानसभेला अध्यक्षच नाहीयेत मग या सगळ्या प्रक्रियेत निर्णय घेण्याचा अधिकार कुणाकडे असतो ? 

जरी राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देत असतात तरी राज्यपालांचा या चाचणीत राजकीय हस्तक्षेप नसतो. ही बहुमत चाचणी पार पाडण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची असते.  सद्या विधानसभेला अध्यक्ष नाहीयेत. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याबाबतचे सर्व निर्णय घेऊ शकतात. 

तर अशाप्रकारे ही झाली सर्व बहुमत चाचणीची प्रक्रिया मात्र ताजे अपडेट्स पाहिलेत तर शिवसेना राज्यपालाच्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलीये. त्यावर आज संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. 

आता सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो ते त्यावर पुढच्या सर्व घडामोडी अवलंबून आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.