त्यादिवशी विलासराव रितेशला म्हणाले,”तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो.”

असं म्हणतात, मोठ्या वटवृक्षाच्या छायेत लहान रोपांची वाढ होत नाही. पण काही रोपं अशीही असतात जी वटवृक्षाच्या छायेत राहून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. वटवृक्षाची उंची गाठणं शक्य नाही, हे त्यांना माहीत असतं. तरीही वटवृक्षाची सावली मिळाल्याचं सुख आणि समाधान त्यांना असतं.

विलासराव देशमुख आणि त्यांचा सुपुत्र रितेश देशमुख यांची सुद्धा अशीच एक कहाणी.

रितेश आजही कुठेही गेला, तरीही विलासरावांची हमखास आठवण काढतो. रितेशच्या प्रत्येक शब्दांमधून त्याच्या मनात असलेला वडिलांविषयीचा अपार आदर जाणवतो.

रितेशचे दोन्ही भाऊ, अमित आणि धीरज आज राजकारणात सक्रिय आहेत. वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा हे दोघेही पुढे चालवत आहेत. लहानपणापासून घरात राजकारणाचा माहोल असला तरीही रितेशने मात्र अभिनेता होण्याची वाट निवडली.

आपल्या घरात सुद्धा आपण एखादी नवी गोष्ट करायचं बघतो, तेव्हा आई – वडिलांची परवानगी घेतो. रितेशच्या आयुष्यात सुद्धा असा प्रसंग आला जेव्हा रितेशने सिनेमात अभिनय करण्याचं ठरवलं.

त्यावेळेस विलासराव देशमुख रितेशला काय म्हणाले, याचा हा किस्सा. 

भिडूंनो, सध्याचं राजकारण ज्या खालच्या पातळीवर सुरू आहे, ते पाहून कधीकधी जुने दिवस आठवतात. एकमेकांवर आरोप होणं, टीका होणं आधी सुद्धा व्हायचं. परंतु त्यात सुद्धा एक मिश्किलपणा असायचा.

समोरच्या नेत्याने आपल्यावर टीका केली तर त्या टीकेला तिरकस अंगाने उत्तर देण्याचं कसब पूर्वीच्या राजकारणी व्यक्तींकडे होतं. त्यामुळे आधी शाब्दिक वाद अनुभवायला वेगळीच गंमत यायची. शाब्दिक कोट्या करून लोकांचं मन जिंकणारा असाच एक राजकारणी म्हणजे विलासराव देशमुख.

हसतमुख चेहरा ठेवून बोलता बोलता दुसऱ्या व्यक्तीवर अगदी आपल्याही नकळत विलासराव विडंबनात्मक बोलून जायचे. अशावेळी त्यांचं बोलणं ऐकून ते आरोप करत आहेत की स्तुती, असा गोंधळ व्हायचा. इतकं विलासरावांच्या बोलण्यात एक चातुर्य असायचं. अशा कुशल राजकारणी नेत्याचा सहवास रितेशला लहानपणापासून लाभला. 

आज भारतीय सिनेसृष्टीत कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या रितेशला अभिनयाची इतकी आवड नव्हती. किंवा कॉलेजमध्ये असताना रितेशने कधी नाटक किंवा डान्स अशा सांस्कृतिक गोष्टींमध्ये भाग घेतला नाही.

असं जरी असलं तरीही रितेशला सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड होती. घरी व्हिडिओ कॅसेट आणून धीरज, अमित आणि रितेश ही तीनही भावंडं दिवसाला तीन सिनेमे पाहायचे. विलासरावांना सुद्धा तशी सिनेमा पाहण्याची आवड. परंतु व्यस्त दिनक्रमामुळे त्यांना कधी जमायचं नाही. तरीही महिन्यातून एकदा जमेल तसं संपूर्ण देशमुख कुटुंब सिनेमा पाहायला थेटरमध्ये जायचं. 

रितेशने आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं होतं. यामध्येच रितेश करियर करणार असं सर्वांना वाटतं होतं.

पण २००३ साली रितेशला ‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा ऑफर झाला.

त्यामुळे अचानक गाडी अभिनयाकडे वळवण्याचा रितेशने विचार केला. परंतु हा निर्णय आई आणि वडिलांना सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे रितेशने या गोष्टीसाठी निर्मात्यांकडे १५ दिवसांची वेळ मागितली.

विलासरावांना याविषयी सांगण्याआधी रितेशने आईला हा निर्णय सांगितला. जेणेकरून आई त्याच्या वतीने विलासरावांना ही गोष्ट सांगेल. परंतु “तुझा निर्णय आहे, तू स्वतः सांग.” असं आई रितेशला म्हणाली.

यादरम्यान विलासराव मुख्यमंत्री होते. नाही म्हटलं तरी रितेशच्या मनात वडीलांविषयी एक आदरयुक्त भीती असावी. अखेर एकदा योग्य संधी साधून रितेशने वडिलांसमोर हा विषय काढला. रितेश म्हणाला,

“सिनेमाची ऑफर आलीय.”

यावर विलासरावांनी विचारलं,

“काय निर्माता बनणार का?”. “नाही, काम करायची ऑफर आलीय”, रितेशने वडिलांना उत्तर दिलं.

यावर आश्चर्याने “अच्छा! हीरो होणार!” असं विलासराव रितेशला म्हणाले. “हा म्हणजे, असं समोरच्यांना वाटतंय” रितेश म्हणाला. विलासरावांनी स्वतःचं काहीही मत न देता “बघा, तुम्हाला काय करायचं ते!” असं रितेशला म्हणाले. 

हा संवाद झाल्यानंतर रितेशने वडिलांना एक गोष्ट सांगितली.

रितेश म्हणाला,

“मुद्दा असा आहे की, माझी काही ओळख नाही. माझं काहीच नाव नसल्याने ९०% असं होऊ शकतं की, सिनेमा उद्या फ्लॉप होऊ शकतो. त्यावेळेस लोकं असं म्हणणार नाहीत की, रितेश देशमुखने वाईट काम केलं. तर मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मुलाने वाईट काम केलं, असं लोकं म्हणतील. त्यामुळे उगाच तुमच्या नावाला धक्का लागेल.”

मुलाचं म्हणणं विलासराव काळजीपुर्वक ऐकत होते. रितेशचं बोलून झाल्यावर विलासराव शांतपणे त्याला म्हणाले,

“तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो.” 

एक वडील आणि एक मार्गदर्शक म्हणून विलासरावांनी उच्चारलेली ही वाक्य रितेशने आजही लक्षात ठेवली आहेत. बॉलिवुड सारख्या झगमगत्या विश्वात चोहीकडे अनेक प्रलोभनं आणि वाईट गोष्टी पसरलेल्या असतात. अशा दुनियेत इतकी वर्ष यशस्वी अभिनेता राहूनही रितेश कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात आजवर सापडला नाही.

त्यामुळे वडिलांनी दिलेला सल्ला नकळतपणे रितेशने जपला आहे. आजही विलासरावांच्या आठवणीने रितेश व्याकूळ होतो. विलासराव देशमुखांसारख्या वटवृक्षाच्या सावलीत वाढलेल्या रितेशने एक अभिनेता आणि निर्माता म्हणून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.