कांद्यासोबत मीठ अन् अंगाला शेण ; लोकं ऑक्सिजन वाढवायला येडेचाळे करायला लागलेत

कोरोनाच्या दूसऱ्या लाटेनं आभाळ गाठलय. लोकांना ऑक्सिजन मिळना. बेड मिळना. इंजेक्शन मिळना. सोयरिक मिळना. पैसे मिळना…

लय काय आहे ते मिळना झालय. थोडक्यात काय तर महाराष्ट्रासह भारताची लागायला सुरवात झाल्या. तिसरं महायुद्ध झाल्यानंतर फक्त झुरळं टिकून राहतील अस सांगितलं जातं. झुरळांच माहिती नाही पण आपल्याकडं अशी एक जमात आहे जी शंभर टक्के टिकून राहणार.

या जमातीचं नाव असतय. ढक्कलगाडी. दिवसभर व्हॉट्सएपच्या या ग्रुपवरनं त्या ग्रुपमध्ये काय ना काय ढकलत रहायचं हा त्यांचा आवडता धंदा असतोय.

आत्ता हेच बघा ऑक्सिजन कमतरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अफवा यांचा डेटा गोळा करायचं काम आम्ही केलं. जेव्हा या ढक्कलगाडीकडून संपुर्ण डेटा गोळा करत गेला तेव्हा आमच्या सपशेल फ्यूजा उडाल्या.

त्यापैकीच काही प्रमुख अफवा वाचा. 

१) ओवा आणि कापूरच्या उपायाने वाढते ऑक्सिजन पातळी ?

व्हॉट्सएप आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ओवा आणि कापराच्या वापराचा घरगुती  उपाय मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. ज्यानुसार ओवा आणि कापूर एका रुमालात बांधून त्याचा वास घेतल्याने ऑक्सिजन पातळी वाढते.

एवढेच नव्हे तर या उपायाच्या परिणामाचे एक उदाहरण देखील दिले आहे.

यात म्हंटले गेलेय की.

गुजरातमधील एका कोरोना संक्रमित मुलाची ऑक्सिजन पातळी ८०-८५ पर्यंत झाली होती. त्यावेळी रुग्णालयात उपचार करण्याऐवजी त्यांच्या घरच्यांनी त्याला कापराची वडी आणि ओवा रुमालात बांधून त्याला १०-१२ वेळा खोल श्वास घेण्यास सांगितले. ज्यानंतर २४ तासात त्याची ऑक्सिजन पातळी ९८-९९ पर्यंत वाढली.

याबाबत डॉक्टर आणि तज्ञांना विचारले असता हा दावा खोटा असल्याने म्हंटले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले कि, कापूर आणि ओव्याच्या उपायाने ऑक्सिजन पातळी वाढण्याचा कोणताही उपाय नाही.

२) ‘सेहत कि पोटली’ ऑक्सिजन पातळी वाढविण्यात फायदेशीर ? 

ऑक्सिजन पातळी वाढविण्याबाबत आणखी एक अफवा मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. ज्याला ‘सेहत कि पोटली’ असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

यात कापूर आणि ओव्या बरोबर लवंग आणि निलगिरीच्या तेलाच्या वापराविषयी सांगितल जात आहे. हे सर्व एकत्र करून त्याची रुमालात पुडी बांधून दिवसभर आणि रात्री आपण त्याचा वास  घेत राहिल्यास ऑक्सिजन पातळी वाढण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान,  डॉक्टरांनी या दाव्याचे खंडन केले आहे.

३) गाय ही एकमेव अशी पशु आहे जी, ऑक्सिजन घेते आणि सोडते. 

अफवा पसरवण्यात राजकारणी लोकही मागे नाहीत. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड भाजपा अध्यक्ष अजय भट्ट यांनी दावा केला हेला होता की, गाय हि जगातली एकमेव प्राणी आहे जी ऑक्सिजन शरीरात घेते आणि ऑक्सिजनचं सोडते. (जर ऑक्सिजन घेवून ऑक्सिजनचं सोडायचा आहे तर गाय हे रिकामे उद्योग का करतेय असा प्रश्न डोक्यात यायला पाहीजे) असो यावरून त्याकाळात जोरदार टीका झाली.

त्यांच्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनीही या दाव्याचे समर्थन केले आहे. रावत त्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनला होता. असेच दावे राजीव दीक्षित यांच्या पुस्तकात देखील केले गेले आहेत.

त्यामुळेच व्हाटसएप विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या घरात गाय बांधून कोरोना काळात ऑक्सिजन वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वर या गोष्टीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच नाव देण्यात येतं.

४)गोमूत्र आणि शेणामुळे कोरोनासंसर्ग बरा होतो.

गाय हा भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र प्राणी मात्र तिच्या बद्दलच्या अफवा बऱ्याच पसरत असतात, गेल्या वर्षी कोरोना काळात आसाम विधिमंडळाच्या सदस्या सुमन हरिप्रिया यांनीही असा दावा केला होता कि,

‘गोमूत्र आणि शेणामुळे कोरोना संसर्ग बरा होतो.”

हि अफवा त्याकाळात चांगलीच गाजत होती. कित्येकजण रोज गोमूत्र प्रश्न करत होते. काहीजणांनी अंगाला शेण लावण्याची थेरपी देखील सुरु केली होती. मात्र या गाईबद्दलच्या सगळ्या दाव्यांचे तज्ञ डॉक्टरांनी खंडन केलं. आता या अफवा कमी झालेल्या दिसतात.

५) मिठाबरोबर कांदा खाल्लं की १५ मिनिटात कोरोना रुग्ण होतो बरा

वाढत्या कोरोना संक्रमणात आणखी एक अफवा शेअर केली जात आहे. ज्यात म्हंटले गेले कि, मिठाबरोबर कांदा खाल्ल्याने कोरोना पोझीटिव्ह रुग्ण १५ मिनिटांत बरा होतो. फेसबुकवर सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे. मात्रा, या दाव्याबाबत कोणताही पुरावा अद्याप आढळला नाही.  गेल्या वर्षीही असाच एक दावा केला जात होता ज्यात म्हंटले गेले होते कि, आलं, लसून आणि मध खाल्ल्याने कोरोना बरा होतो. लोकांना जे खपवायचं असतं त्याच्या पुड्या सोडल्या जात असाव्यात.

६) या औषधाने ४ दिवसात बरा होणार कोरोना ? 

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अहमदाबादच्या एका कंपनीने दावा केला कि, त्यांचे औषध ‘ आयुष ॲडवान्स’ संक्रमिताच्या आतील कोरोना  विषाणू बऱ्यापैकी कंट्रोल करतात  आणि ४ दिवसात कोरोना रुग्णाला बर करत.

aayudh advance 1618918391

यात असाही दावा केला जात होता कि, कोरोना साथीच्या काळात कामी येणाऱ्या रेमेडीसिवीर इंजेक्शनापेक्षा हे ३ पट जास्त प्रभावी आहे. दरम्यान, कंपनीचा हा दावा खोटा असल्याचे म्हंटले गेले आहे.

आयुष मंत्रालयाने  कारवाई करत गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाच्या सहआयुक्त (अन्न) यांनी राजकोट येथील या आयुर्वेदिक औषध उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस देखील  बजावली आहे.

बाकी रामदेव बाबांच बरं चाललय…!

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.