कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी रशियाचं रुबल २०२२ चं सर्वोत्तम चलन ठरलं

रशिया -युक्रेन युद्धाला १०० दिवस पूर्ण झाली आहेत. गेल्या दशकातील सगळ्यात भयंकर युद्ध म्हणून आज या संघर्षाकडे पाहिलं जातंय. इंटरनेटच्या जमण्यात होत असलेल्या या युद्धाची सगळी माहिती, विध्वंस आपण मोबाइलवर बघतोय.

युक्रेनमधील बुचाच्या रस्त्यांवर पडलेला मृतदेहांचा खच, मारियुपोलमधील एक उडवलेले थिएटर, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर क्रॅमतोर्स्क रेल्वे स्टेशनवर उडालेला गोंधळ सगळं आपल्या डोळ्यासमोर येत आहे.

मृतांच्या आकड्यांची तर खरी गिनतीचा बाहेर येत नाहीये.

युक्रेनच्या एकट्या मारियुपोलमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांनी २१,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेशातील सिव्हिएरोडोनेत्स्क हे शहर जे रशियाच्या आक्रमणाचे केंद्रस्थान बनले आहे तिथल्या महापौरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे १५०० लोक मारले गेले आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याच आठवड्यात सांगितले की दररोज ६० ते १०० युक्रेनियन सैनिक लढाईत मरत आहेत. रशियाकडून जी अधीकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये रशियाचे १३५१ सैनिक मारले गेले आहेत आणि ३८२५ जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

युक्रेननं तसं रशियाचं आक्रमण बऱ्यापैकी थोपवून धरलं आहे.

 यात जगातील इतर देशांची विशेषतः नाटो सदस्य देशांची युक्रेनला साथ मिळत आहे. युरोप अमेरिकेकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात हत्यारांचा पुरवठा केला जात आहे. अमेरिका आणि इतर युरोपियन देश युद्धात सरळ नं सहभागी होता अजून एका मार्गाने रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे रशियावर आर्थिक निर्बंध टाकून.

रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर एकाच महिन्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियावर पाश्चिमात्य देशांच्या “अभूतपूर्व निर्बंध” ची प्रशंसा केली होती आणि रशियाची रुबल करंसी धुळीत मिळाल्याचं म्हटलं होतं.

 

२४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले ज्यात रशियाचा परकीय चलनाचा पुरवठा रोखण्यासाठी रशियाच्या केंद्रीय बँकेची मालमत्ता गोठवण्या बरोबरच अनेक निर्बंध होते.

त्यामुळं युद्धाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये लोकांनी बँकांकडून शक्य तितकी रोख रक्कम मिळवण्याचा आणि आयात केलेल्या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याने रशियाच्या अर्थव्यस्थेवर चांगलाच ताण पडला.

रशियन चलन ७ मार्च रोजी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर गेले आणि रुबलने निम्मे मूल्य गमावले. परंतु  एप्रिल महिन्यातच जानेवारीच्या तुलनेत रशियन रूबल डॉलरच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत वाढला आणि सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला.

आज रशियन रुबल २०२२ मध्ये जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारे चलन आहे.

आज युद्धाच्या आधी ज्या पातळीवर रुबेल होता त्यापेक्षाही त्याचे मूल्य वाढलेलं आहे.

WhatsApp Image 2022 06 03 at 4.58.01 PM 1

त्यामुळं आता वेस्टर्न कंट्रीजच्या निर्बंधांच्या उपयुक्ततेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. भारत आणि चीन वगळता जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांनी वाळीत टाकली असताना रशियाच्या चालनाने  ही करामत कशी करून दाखवली तेच एकदा बघू.

पाहिलं म्हणजे रशियन सरकारने चलनाच्या वापरावर ठेवलेला पूर्ण कंट्रोल.

करंसी मार्केटला पण डिमांड-सप्लायचा नियम लागू होतो. म्हणजे जर बाजारात रूबल जास्त असेल आणि त्याला तेवढी मागणी नसेल तर आपोआप त्याच मूल्यं कमी होतं. पुढे रुबलच्या बाबतीत रशियाने जे केलं त्यावरून तुम्हाला समजेलच.

सरकारच्या आर्थिक भात्यातलं एक प्रमुख हत्यार असतंय भांडवल करणे. म्हणजे सरकार देशात आणि देशाबाहेर किती पैसा जाईल यावर मर्यादा आणते.

रशियाने रुबलच्या विक्रीवर मर्यादा घालून लोकांनी रशियामधून किती पैसे काढता येतील यावर  कठोर मर्यादा घातल्या आहेत. 

उदाहरणार्थ, रशियन लोकांना $10,000 पेक्षा जास्त परकीय चलन काढण्यास किंवा परदेशी खात्यांमध्ये पैसे हलविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांना देशांतर्गत आर्थिक मालमत्ता विकण्यासही बंदी घातली.

त्यामुळे झालं असं की देशातील परकीय गुंतवणूक बाहेर गेली नाही आणि रुबलची घसरण झाली नाही. त्याचबरोबर रशियाने परदेशी चलन मिळवणाऱ्या निर्यातदारांना परदेशात कमावलेल्या पैशापैकी ८०% पैशाचे  रुबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचे आदेश दिले आहेत. रशिया अजूनही तेल आणि वायू निर्यातीतून भरपूर पैसा कमावत आहे हे लक्षात घेता चलनासाठी हा एक महत्त्वाचा आधार ठरला.

यामुळं काय झालं की रशियन चलनाची मागणी वाढली.

त्याचबरोबर रशियाच्या रिझर्व्ह बँकेने  व्याजदर २०% पर्यंत दुप्पट केले. 

त्यामुळे रशियन लोकांना त्यांचे रुबल बँकांमध्ये ठेवण्यास प्रोत्साहित केले मिळाले. आणि मार्केटमधील चलनाचा पुरवठा मर्यादितच राहिला.

याला जोड मिळाली युद्धामुळे वाढणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीची. 

यामुळं रशियाला एक्सपोर्टमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली. रशियातून होणार ऑइल आणि गॅस पुरवठ्याशिवाय  जर्मनी, ब्रिटन आणि फ्रांस आणि इतर यूरोपातील प्रमुख देशांना पर्याय नाही. त्यातच चीनसारख्या देशांनी डिस्काउंटेड किंमतीत मोठ्या प्रमाणात तेल उचललं.

त्यातच रशियाने गॅसचे पैसे फक्त रुबलमध्येच घेण्यास सुरवात केली. 

त्यामुळं झालं असं की रुबलच्या मागणीत अजूनच वाढ झाली आणि परिणामी रुबलची किंमत अजूनच वाढली. या कारणांमुळे रशियन रुबलचं मूल्य आर्थिक निर्बंधांनंतरही वाढत गेलं. 

मात्र तज्ज्ञांच्या मते रशियाने कृत्रिमरीत्या किंमती कंट्रोल केल्या आहेत आणि हे काय जास्त वेळ टिगणार नाही.

 इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्सने यावर्षी रशियाचा जीडीपी १५% नी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे रशियाने मागच्या १५ वर्षात केलेली आर्थिक वाढ धुळीस मिळणार आहे. तसेच रशियातीळ बेरोजगारी ४.१% वरून ८% पर्यंत पोहचली आहे. त्यामुळं युरोप आणि अमेरिकेतून जे सँक्शन्स रशियावर टाकण्यात आले आहेत ते काही काळांनंतर रशियाला हिट करतील असं सांगितलं जातंय. मात्र सध्यातरी रशियाचा रुबल  भक्कम आहे एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.