प्रश्न कितीपण मोठा असेना का, दाजींच ऐकायलाच लागतं.

गेले अनेक दिवस सुरु असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ताकारणात आज एक नवीन ट्विस्ट आला. राष्ट्रवादीमधून बंडखोरी उपमुख्यमंत्री बनले अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसात पदाचा राजीनामा दिला.

शनिवारी सकाळी त्यांनी शपथ घेतल्यापासून राज्यभर खळबळ उडाली होती, दादांनी किती आमदार नेले, राष्ट्रवादी मध्ये उभी फुट अशा चर्चा सुरु होत्या. रोज त्यांची मनधरणी करायला दिग्गज नेते जात होते पण दादा काही ऐकत नव्हते.

अखेर आज त्यांची मनधरणी एका विशेष व्यक्तीकडून करण्यात आली,

सदानंद सुळे.

महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकारण्यांच्या नातेवाईक असणारा भाग्यवान माणूस म्हणजे. सदानंद भालचंद्र सुळे. भाग्यवान या करता कारण सदानंद सुळे यांचे मामा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत तर सासरे शरद पवार आहेत. एवढं मोठ्ठं नात्याचं वैभव मिळणारा भाग्यवान नाही तर दुसरा काय असू शकतो.

सदानंद सुळे सध्या महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत. तर खासदार सुप्रिया सुऴेंचे पती आहेत.

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख कशी झाली.

सुप्रिया सुळे यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. 12 वी नंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद काँलेजमधून बीएस्सी. मायक्रोबायलाॅजी केली. त्यावेळी शऱद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र तेव्हाही सुप्रिया सुळेंनां त्यांनी सगळ्यांसोबत बसने ये जा करत, असं सांगितलं जातं.

काँलेजचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुप्रिया सुळे पुण्यात काकांकडे काही दिवसांकरिता राहायला आल्या. पुण्यात राहत असतांना त्यांनी पुण्यातल्या एका अग्रगण्य वृत्तसमुहात काही काळ नोकरीही केली. याच दरम्यान फॅमिली फ्रेंडकडे सुप्रियाताईंची ओेळख पहिल्यांदा सदानंद सुळे य़ांच्यासोबत झाली. या ओळखीनंतर त्याची भेट वाढली. ते चांगले मित्र झाले. त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला.

सुळेंच ठाकरे कुटुंबियांशी नाते आहे हे सुप्रिया यांना तेव्हाच कळाले.

सदानंद हा बाळासाहेब ठाकरेंच्या सुधा नावाच्या बहिणीचा मुलगा. त्यांचे वडील म्हणजे भालचंद्र सुळे. ते महिंद्रा कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरीला होते. तर संदानद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते.

सुप्रियाताई आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू असल्यामुळे यांच्या मैत्रीचं रूपातंर प्रेमात झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र असं असलं शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलिकडे जपली होती.

सुप्रियाताई लहानपणी बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या. पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियांच पूर्वी पासून एकमेकांच्या घरी येण जाण असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार यादेखील सख्ख्या मैत्रिणी. म्हणूनच राजकीय वाद कितीजरी असले तरी हे कौटुंबिक नात टिकून राहिलं होतं.

तर दुसरीकडे सुप्रियाताई आणि सदानंद सुळे यांचे मनं जुळले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी लग्न ठरवण्यास पुढाकार घेतला. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हताच. सगळं जुळून आलं. तारीख ठरली गेली.

शरद पवारांनी स्वत: अनेक गावात जाऊन सुप्रियाताईच्या लग्न पत्रिका वाटल्या. महाराष्ट्रातल्या अनेक गावात ट्रकांनी पत्रिका आणि लाडू पाठवले. अनेक दिग्गजांना आमंत्रण धाडले. बारामती सजवली. देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी सात हेलीपॅड सज्ज ठेवले होते.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गाधी, तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर असे अनेक दिग्गज मंडळी आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 मध्ये हा दिमाखदार सोहऴा पार पडला.

लग्नानंतर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे अमेरिकेत गेले. सदानंद सुळे यांची नोकरी तिथं सुरू होती. सुप्रियाताईनीं बर्केले विद्यापीठात अॅॅडमिशन घेऊन पुढील शिक्षण सुरू ठेवलं. त्यामुळे सुप्रियाताईंनी त्या विद्यापीठात शिक्षण घेत असतांना जलप्रदुषणावर अभ्यास करून पेपरही सादर केला होता.

मात्र काही काळानंतर सदानंद सुळे यांची सिंगापुरला बदली झाली. सुप्रियाताई आणि सदानंद सुळे काही काळ तिथे राहिले. त्यानंतर जकार्ताला काही ते नोकरीला होते. मात्र त्यानंतर ते कायमचं आपल्या माणसात राहण्यासाठी भारतात आले.

भारतात आल्यानंतर सुप्रियाताईंनी स्वत:ला समाजकारणात झोकून दिलं.

तर सदानंद सुळे यांनी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. २००६ साली सुप्रिया सुळे राज्यसभेची निवडणूक लढवणार हे जेव्हा बाळासाहेबांना कळाल तेव्हा त्यांनी पवारांना फोन केला आणि म्हणाले,

“सुप्रिया ६ महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळली आहे. तिच्याविरुद्ध मी उमेदवार देणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच म्हणाल तर कमळाबाईला कस पटवायच ते मी बघतो.”

आणि सुप्रिया सुळेंची पहिली निवडणूक बिनविरोध झाली. पुढे त्या राजकारणात यशाच्या एक एक पायरी चढत गेल्या. मात्र कधीही त्यांची बाळासाहेबांशी भेट व्हायची तेव्हा ते राजकारणाऐवजी आवर्जून आपल्या नातवंडांची, त्यांच्या ट्युशन क्लासेसची चौकशी करायचे.

सुप्रिया व सदानंद सुळेंच्या घरासाठी बाळासाहेब ठाकरे कुटुंबप्रमुखच होते.

आज बाळासाहेब नाहीत पण त्यांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष पहिल्यांदा राजकारणात आघाडी करण्याचा विचार करतोय. तस पाहायला गेल तर दोन्ही पक्षांची विचारधारा दोन धृवावरची आहे. मात्र त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यातील कौटुंबिक नाते उपयोगी पडेल का हा प्रश्न अनेकजण विचारत आहे.

सदानंद सुळेंची मध्यस्ती महाशिवआघाडी आकारास येण्यात कामगिरी बजावू शकते असेही काही तज्ञांचे मत होते.

सदानंद सुळे व सुप्रिया सुळे जेजुरी गडावर

पण सदानंद सुळे राजकारणात पडणार नाहीत हे सुप्रियाताई ठामपणे सांगायच्या.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतक्या मोठ्या दोन पॉवरफुल घराण्यांशी इतक जवळच नात असूनही सदानंद सुळे यांच्याबद्दल कोणालाच जास्ती माहित नसते. कधी प्रसिद्धीही नाही आणि कधी मोठाले आरोपही नाहीत. कायम हसतमुख अबोल असणाऱ्या सदानंद सुळेनी राजकारणाची सावली देखील पडू दिली नाही. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला पवार कुटुंबात किंमत होती.

आणि म्हणूनच आज अखेरचा उपाय म्हणून सदानंद सुळे यांनी आज सकाळी या सत्ता नाट्यात भाग घेतला आणि हॉटेलमध्ये जाऊन अजितदादांची समजूत घातली, फक्त त्यांचं ऐकून अजितदादा परत फिरले अस सांगितलं जातंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.