नेपाळच्या राजकुमारीच्या नादात सल्लूभाईला दणके खायला लागले होते..?

कधीकधी वाटतं आम्हाला लय अक्कल आल्या. दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी शोधून तुमच्यापुढं सांगितल्यामुळे आम्हाला लय कळतं. पण काय होतं एखादे दिवशी एखादा मेल येतो आणि एखादा प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न वाचून आमच्या फ्यूजा उडतात. भेंडी हे तर कधीच वाचलं नव्हतं की…

मग शोधाशोध सुरू होते. असच ही स्टोरी लिहताना झालं. एका भिडूने मॅसेज केला. त्यात त्याने सलमान खान आणि नेपाळची राजकुमारी स्वर्गीय राजकुमारी श्रुति राज्यलक्ष्मी देवीशहा यांचातला मॅटर काय होता याची विचारणा केली… 

वाचक भिडूच्या या प्रश्नावर आमची पहिली रिएक्शन होती ती म्हणजे

भेंडी ह्यो सलमान कुठंकुठं काशी केलाय काय माहिती

पण विचारलय तर शोधायला पाहीजे म्हणून आम्ही शोधाशोध सुरू केली.

तेव्हा राजकुमारी श्रुती आणि सलमान खानचा मॅटर तर समजून आला पण त्याला अधिकृत असा दुजोरा कुठे मिळत नव्हता. मात्र फेसबुक, कोरा, ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल मिडीयावर ही गोष्ट मात्र सांगण्यात आली होती. अनेक ठिकाणी नेपाळच्या लोकांनीच याचे संदर्भ दिलेले आहेत.

बर ही गोष्ट अधिकृतरित्या का नाही याचं कारण सांगताना अस सांगण्यात आलय की राजकुमारी श्रृती ही राजघराण्यातील होती. त्यांच्याबाबतची माहिती अशी छापणं म्हणजे एका देशाला अंगावर घेण्यासारखं असल्याने हे धाडस कोणी केलं नाही. शिवाय दोन देशातील संबंधाचा विचार करता पुढे पिक्चर सहित अनेक गोष्टी कचऱ्याच्या डब्यात घालण्यात आल्या..

आत्ता नेमका मॅटर काय सांगितला जातो ते पाहूया..

सलमानचा मैने प्यार किंया तेव्हा नेपाळमध्ये धुमाकूळ घातल होता. १९९० नंतरचा तो काळ होता आणि त्या काळात नेपाळमध्ये नुकतच VCR चं आगमन झालेलं. VCR कॅसेटचा नेपाळमधला पहिला स्टार होता तो सलमान खान.

याच काळात पाकीस्तानची हिरोईन सोम्या अली सोबत सलमान एक सिनेमा करत होता. सिनेमाचं नाव होतं बुलंद..

बुलंद सिनेमाचं शुटिंग नेपाळमध्ये होणार होतं. त्यासाठी सलमान नेपाळमध्ये गेला होता. साहजिक भावड्याच्या आजूबाजूला खूप गर्दी जमा व्हायची. सलमान देखील या स्टारडमचा उपभोग घेत होता.

बुलंदच्या शुटींग नेपाळमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आलं.  सुमारे ६०-७० टक्के सिनेमाचं शुट पुर्ण झालं. अखेरच्या टप्यातलं शूटींग काठमांडूच्या पद्मा कन्या कॉलेजच्या आवारात होतं.

या शुटींग दरम्यानचं हा किस्सा घडला..

झालं अस की या कॉलेजमध्ये खुद्द नेपाळच्या राजकन्या शिकत होत्या. सलमानचं नाव ऐकून त्या देखील इथे आल्या. सलमानच्या आजूबाजूला फॅन्स लोकांचा गराडा पडला. दूसरीकडे दूरवर थांबून राजकुमारी श्रूती देखील सलमानच्या ऑटोग्राफची वाट पहात होत्या. सल्लू भाईने मात्र कोणालाही ऑटोग्राफ दिली नाही. पण राजकुमारी श्रूतींना ऑटोग्राफ द्यायला तो विसरला नाही. रितसर त्यांच्यी भेट घेवून फक्त आणि फक्त राजकुमारी श्रूतींना ऑटोग्राफ देवून तो निघून चालला.

पण यामुळे भलतीच गोष्ट घडली. सलमानच्या विरोधाच तिथे उपस्थित असणाऱ्या नेपाळी तरुणांनी मोर्चा उघडला. सलमानने राणी साहेबांनाच फक्त सही दिल्याचा राग त्यांना होता. सोबत फोटो काढल्याने हा राग तर तुफान वाढला.

या विरोधात नेपाळी तरुणांनी सलमानला दणके देण्यास सुरवात केली. कसाबसा सल्लू त्या तडाख्यातून सुटला आणि आपल्या हॉटेलमध्ये परतला. दूसऱ्या दिवशीच्या शुटींगवेळी पुन्हा हल्ला करण्यात आला. सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. पण तरिही काहीही फरक पडला नाही.

अखेर संपुर्ण युनिट उर्वरित शुट पुर्ण न करताच परतले. त्यामुळे सिनेमाचं शुटिंग रखडलं. पुढे हा पिक्चर कधीच रिलीज झाला नाही. सलमानचा पहिला रिलिज न झालेला सिनेमा म्हणून बुलंद ला ओळखलं गेलं. सिमेमातली हिरोईन सोम्या अलीसोबतच त्याचं अफेअर देखील गाजलं पण दरम्यानच्या काळात सलमानने कधी नेपाळला भेट दिल्याचं ऐकिवात आलं नाही.

मध्यंतरी जेव्हा बिग बॉसच्या निमित्ताने सलमान नेपाळला जाणार असल्याच्या बातम्या पसरल्या तेव्हा पुन्हा हे प्रकरण सोशल मिडीयावर चर्चेत आलं आणि सलमानने पुन्हा नेपाळचा दौरा पुढे ढकलला..

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Siddharth Shah says

    Bhidu rolls Royce chi info kad

Leave A Reply

Your email address will not be published.