भारताचे लष्करप्रमुख सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हौसला वाढविण्यासाठी प्लेबॉय मॅगझीन पाठवायचे

सॅम माणेकशॉ भारताच्या सर्वात पराक्रमी सेनापतींपैकी एक. त्यांच्याच काळात भारताने पाकिस्तान विरुद्धच बांगलादेश युद्ध जिंकलं.पाकिस्तानच्या लष्कराला गुडघ्यावर यायला लावलं. त्यांना फिल्ड मार्शलचा मान देण्यात आला होता.

शिस्तीच्या बाबतीत कठोर असलेले हे लष्करप्रमुख वैयक्तिक आयुष्यात मात्र एक दिलखुलास व्यक्तिमत्वाचे होते.

एका उच्चशिक्षित सुसंस्कृत पारशी कुटूंबात सॅम माणेकशॉ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये डॉक्टर होते. सॅम लहानपणापासून खेळात व अभ्यासात सर्वात पुढे तर होतेच पण शाळेतील सर्वात दंगेखोर मुलांमध्ये त्यांचा समावेश असायचा.सॅम माणेकशॉ यांना केंब्रिज विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती पण वडिलांच्या सांगण्यानुसार ते भारतात थांबले व अत्यंत कमी वयात आर्मी जॉईन केली.

भारतीय मिलिटरी अकॅडमी मधून पास होणारे ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी. तो ब्रिटिशसत्तेचा काळ होता. सैन्यदलातील सर्व वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश असायचे. यामुळे भारतीय अधिकाऱ्यांवरही इंग्रजी छाप ओळखून यायची.

सॅम माणेकशॉ दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ गंभीर जखमी झाले. त्यांची जगण्याची शक्यता कमीच होती मात्र तरीही तीव्र इच्छा शक्तीच्या बळावर ते वाचले.

सॅम माणेकशॉ यांच्या पराक्रमाच्या गाथा भारतीय लष्करात प्रसिद्ध होत्या.

गुरखा रेजिमेंटमध्ये तर ते सॅम बहादूर म्हणून फेमस होते.

१९६२ च्या चीन युद्धावेळी मिझोराममध्ये तैनात असलेली एक बटालियन लढाईपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असलेलं लक्षात आल्यावर माणेकशॉ यांनी त्यांना बांगड्या पाठवून दिल्या होत्या. त्यांच्या या कृतीमुळे जवान पेटून उठले व माघार न घेता चीनच्या फौजेवर धावून गेले.

आपल्या जवानांना प्रेरित करण्याची सॅम माणेकशॉ यांची पद्धतच निराळी होती.

चीनच्या युद्धातील हाराकीरी नंतर भारताच्या नैऋत्य सीमेची जबाबदारी लेफ्टनंट जनरल माणेकशॉ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ते भारतीय आर्मीच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख बनले. याकाळात त्यांनी सैन्यात अनेक फेरबदल केले, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले.

१९६४-६५ साली वर चीनने पुन्हा कुरघोडी करायचा प्रयत्न केला होता. आपलं सैन्य यावेळी पूर्ण तैयारीमध्ये होते त्यामुळे चीनचा हा हल्ला सहज परतवून लावण्यात आला.

यावेळी नथुला पास येथे तैनात असलेल्या ५००० सैनिकांना भेटण्यासाठी सॅम माणेकशॉ गेले.

नाथू ला खिंड ही भारताच्या सिक्कीम राज्याला चीनच्या तिबेट प्रांतासोबत जोडणार्‍या रस्त्यावरील एक खिंड आहे. अति-उंच रस्त्यावरुन जाणाऱ्या घाटातील ही खिंड ४,३१० मी (१४,१४० फूट) उंचीवर आहे.

जगातील सर्वात आव्हानात्मक रणभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथूला पास येथे भारतीय जवान अतिशय खडतर वातावरणात प्रचंड दबावाखाली शौर्याने खिंड लढवत होते.

लेफ्टनंट जनरल सॅम माणेकशॉ यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली.

तिथल्या जवानांशी गप्पा मारल्या. सगळं झाल्यावर या बटालियनचे प्रमुख असलेल्या मेजर इस्टन्स डिसुझा यांना ते म्हणाले,

सुझी, तुझ्या जवानांवर प्रचंड तणाव आहे. त्यांना रिलॅक्स करण्यासाठी काही तरी केले पाहिजे.”

सॅम माणेकशॉ जेव्हा आपल्या कलकत्ता इथल्या हेडक्वार्टरला परतले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम काही प्लेबॉय मासिके घेतली व ती नथुला पास मध्ये तैनात असलेल्या जवानांना पाठवून दिली. सोबत काही सिनेमाच्या संगीताचे LP रेकॉर्ड्स सुद्धा पाठवले.

प्ले बॉय हे त्याकाळात प्रचंड फेमस असलेले एक सेमी पॉर्न मॅगझीन होते. जगभरातली तरुणाई याची फॅन होती.

आपल्या सैनिकांच मन रमाव म्हणून चावट मासिके पाठवणारा हा एकमेव लष्कराधिकरी असेल.

आजही अनेक वर्षे झाली तरी भारतीय आर्मीमध्ये सॅम माणेकशॉ यांच्या कथा दंतकथा सांगितल्या जातात. या कर्तव्यकठोर लष्करप्रमुखाने जगापुढे आपल्या दिलदारपणाचा आदर्श घालून दिला होता हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.