शपथविधीचा सूटदेखील रेडी होता. पण त्या खेळीमुळं लालांचं केंद्रीय मंत्रिपद एका रात्रीत हुकलं…
१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं असं त्यांचं म्हणणं होतं.
पण या लोकसभा निवडणुकामध्ये इंदिरा गांधींचा गर्व ठेचून काढायचा असं म्हणत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले.
सबंध देशात जनता पक्षाची लाट होती. महाराष्ट्रात देखील याचा परिणाम जाणवत होता. पण काँग्रेस देखील पूर्ण ताकदीने उतरली होती. यात सर्वात जास्त निवडणूक गाजली ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. त्याला कारण देखील तसचं होतं.
त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे होते संभाजीराव काकडे.
समाजवादी चळवळीचे मोठे नेते म्हणून संभाजीरावांना ओळखलं जातं होतं. सोबतच त्यावेळचे देशाचे नेते मोरारजी देसाई यांच्याशी देखील काकडेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते.
१९७१ साली पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून तत्कालीन पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रंगराव पाटील यांचा पराभव करून संभाजीराव काकडे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते, आणि त्यानंतर १९७७ ला थेट बारामतीमधून लोकसभेला उतरले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा अभ्येद्य किल्ला. केशवराव जेधे, तुलसीदास जाधव अशा काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवल्या नेत्यांनी त्यावेळी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. अशा किल्ल्यातून भारतीय लोक दलातर्फे संभाजीराव काकडे उभे राहिले होते. त्यांच्या विरोधात उभे होते राज्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते विठ्ठलराव गाडगीळ.
प्रचाराला देखील काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारखे नेते होते. शरद पवार यांचा घराचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी जातीनं लक्ष घातलं होतं.
त्यातही थोडं मागं जावून बघितलं तर संभाजीराव काकडे यांचा भाऊ बाबालाल काकडे यांचा पराभव करून १९६७ साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यामुळेच खरतर १९७७ च्या या लोकसभा निवडणुकीत पवार-काकडे या एका वैयक्तिक वादाची सुप्त किनार देखील होती.
अपेक्षेप्रमाणे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निकाल लागला तेव्हा संपूर्ण देशातून काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. संजय गांधी, इंदिरा गांधी देखील आपले मतदारसंघ वाचवू शकले नाहीत.
त्याच लाटेत इकडे काँग्रेसचा बारामतीचा किल्ला देखील ढासळला. संभाजीराव काकडे निवडून आले होते. त्यांना जवळपास २ लाख ३ हजार मत मिळाली तर विठ्ठलराव गाडगीळ यांना १ लाख ७२ हजार मत. ४० हजारांच्या मोठया मताधिक्क्याने संभाजीरावांनी लोकसभेत प्रवेश केला.
देशात जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं, मोरारजी देसाई देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले.
त्यानंतर काही दिवसातच केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराचे वारे वाहू लागले होते. या विस्तारात पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या अत्यंत जवळच्या अशा संभाजीराव काकडे यांचं नाव फायनल केलं होतं. गृह राज्यमंत्री पद त्यांना मिळणार असल्याचं निश्चित झालं होतं. तसं खुद्द पंतप्रधानांकडून त्यांना सांगण्यात आलं.
त्यामुळे काकडे शपथविधीच्या तयारीला लागले. यात त्यांनी शपथविधी साठी सूट शिवला, दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे रिझर्वेशन देखील करण्यात आलं.
मात्र अशातच एक घटना घडली.
संभाजीराव काकडे हे त्यावेळी पुणे जिल्हा खरेदी संघाचे मॅनेंजिंग डायरेक्टर होते. हा संघ त्यांच्या भावानं म्हणजे मुकुटराव काकडे यांनीच स्थापन केला होता आणि ते स्वतः अध्यक्ष देखील होते.
शपथविधीच्या आधीच संभाजीराव काकडेंवर या संघात तांदूळ घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले. आरोप गंभीर होते. त्यामुळे राज्य सरकारकडून पण लागलीच पावलं उचलत काकडेंवर रातोरात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महाराष्ट्रातील सगळी वृत्तपत्र दिल्लीला पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली. असे भ्रष्टाचाराचे आरोप असलेला माणूस आपल्या मंत्रिमंडळात घेणार का? असे प्रश्न पंतप्रधांनांना विचारण्यात येऊ लागले. मोरारजी देसाई देखील अत्यंत कडक स्वभावाचं व्यक्तिमत्व. काकडेंवरील आरोपांची बातमी बघून त्यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार सुरु केला.
त्यानंतर मोरारजी देसाई यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, आणि अखेरीस चर्चेअंती संभाजीराव काकडेंचे नाव मागे पडले आणि त्यांचं संभाव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री पद हुकले. काकडेंच्या जागी जळगावचे सोनुसिंग पाटील यांना गृहराज्यमंत्री पदाची लॉटरी लागली.
त्यानंतर १९८५ साली शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संभाजीराव जनता पक्षातून पुन्हा खासदार झाले. त्यानंतर १९९० मध्ये ते शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्या वेळी त्यांच्या प्रचाराला तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग आले होते. तेव्हा सिंग यांची सभा चांगलीच गाजली होती.
दुसऱ्या बाजूला या दरम्यानच्या काळात सहा-सात वर्षातच ते या तांदूळ भ्रष्टाचार आरोपातून निर्दोष देखील सुटले. मात्र एका चुकीच्या आरोपामुळे संभाजीरावांचं मंत्री हुकलं ते कायमचचं. त्यांना पुन्हा कधीच मंत्रिपदाची संधी चालून आली नाही.
त्यानंतर मागील काही काळापासून संभाजीराव काकडे राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. मात्र त्यांचे राजकीय घटना घडामोडीवर बारकाईने लक्ष असायचे. दुर्दैवाने मे २०२१ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
हे हि वाच भिडू
- बारामतीला लग्नसोहळ्यासाठी आलेले राजीव गांधी चंद्रशेखर यांचं सरकार पाडण्याचा प्लॅन आखत होते..
- महाराष्ट्राच्या नेत्याने फक्त फ्रेंडशिपचा हवाला देऊन मोरारजींचे सरकार पाडले..
- त्यांच्या प्रयत्नांतून पुण्याजवळची छोटी खेडी आशिया खंडात नावाजलेली उद्योगनगरी बनली..