बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली होती तेव्हा सतीश मानेशिंदे यांनीच त्यांना सोडवलं होतं..

कालचा संपूर्ण दिवस नारायण राणे यांच्या अटकेच्या बातमीने गाजला. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवली पाहिजे या अर्थाचं वक्तव्य केलं आणि राडा सुरु झाला. संगमेश्वर येथे नारायण राणेंना सरकारने अटक केली. त्यांना जेवण देखील करू दिल नाही असं म्हटलं जातं.

शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना भिडले. कोंबडीचोर घरकोंबडा अशा सर्व पद्धतीच्या टीका पाहावयास मिळाल्या. 

रात्री उशिरा राणे यांना महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. राणेंना जामीन मिळू नये म्हणून कोर्टात राज्यसरकारतर्फे जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र राणेंची जामीन सरकार रोखू शकलं नाही. 

सगळीकडे एकच चर्चा होती. सरकार आणि राणेंच्या जामिनात एकच माणूस उभा होता. तो म्हणजे सतीश मानेशिंदे.

सतीश मानेशिंदे सध्याचे भारतातले सर्वात हायसेस्ट पेड वकील आहेत. मध्यंतरी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस त्यांनीच लढवली म्हणून ते चर्चेत आले होते. यापूर्वी देखील १९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संजय दत्तची अटक, सलमान खानचं ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरण, राखी सावंत, छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे पर्यंत अनेक हाय प्रोफाइल केस त्यांनी लढले आहेत.

पण महाराष्ट्रात विशेष माहित नसलेला पण तितकाच दमदार असलेली एक केस म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेची केस.

सतीश मानेशिंदे मूळचे धारवाडचे. वकिलीच शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून ते मुंबईला आले. तिथे आपली चमक दाखवली.  यातूनच त्यांना थेट भारतातले आजवरचे सर्वात मोठे सेलिब्रिटी क्रिमिनल लॉयर राम जेठमलानी यांच्या हाताखाली काम करायला मिळालं. १९८३ साली त्यांनी ज्युनियर लॉयर म्हणून सुरवात केली.  जेठमलानी यांच्याकडून अनेक डावपेच शिकून घेतले. पुढे स्वतः ची प्रॅक्टिस सुरु केली.

असं म्हणतात कि मानेशिंदे एका दिवसाची दहा लाखांची फी आकारतात. त्यांनी अनेक केस लढवल्या पण त्यांच्यासाठीही सर्वात महत्वाची केस होती बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची केस.

२४ जुलै २०००. संपूर्ण मुंबईमधील वातावरण तंग बनलं होतं. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. शाळा लवकर सोडण्यात येत होत्या. दुकाने बंद करून लोकं आपआपलं घर गाठत होती. संपूर्ण देश टीव्ही समोर येऊन बसला होता. न्यूज चॅनेल सकाळपासून मुंबईत नेमकं काय घडतंय याचं प्रक्षेपण लाईव्ह दाखवत होते.

विषय होता बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद पाडू शकणारे नेते. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली. आपल्या अमोघ वक्तृत्वा जोरावर त्यांनी मराठी माणसाच्या हृदयावर राज्य केलं. जर कुठे अन्याय झाला तर आपल्या ठाकरी भाषेत आघात करायला ते मागे पुढे पाहायचे नाहीत. आपल्यावर टीका काय होतेय कोणी काय कारवाई करेल याचा त्यांनी कधीच विचार केला नाही.

शिवसैनिकांचं जीवापाड प्रेम हीच बाळासाहेबांची ढाल होती.

बाळासाहेबांच्या या रोखठोक प्रतिक्रियेमुळे त्यांना संपूर्ण भारतभरात हिंदुहृदय सम्राट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांची देशभरातील लोकप्रियता गगनाला भिडली होती. अशातच मुंबईत जातीय दंगलींनी पेट घेतला. कित्येक महिने मुंबई जळत होती. या दंगलींना बाळासाहेब ठाकरे यांची प्रक्षोभक भाषणे कारणीभूत ठरली असं म्हटलं गेलं. 

दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण अयोग स्थापन करण्यात आला. पण त्या काळात शिवसेनाभाजप युतीचे सरकार असल्यामुळे दंगलीच्या अनेक केसेस रद्द करण्यात आले.

पुढे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले तेव्हा त्यांनी जुन्या फायली बाहेर काढल्या. या सगळ्या मागे होते तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले छगन भुजबळ.

एकेकाळचे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असलेले आणि आता सेना फोडून शरद पवारांना मिळालेले छगन भुजबळ म्हणजे शिवसैनिकांचे सर्वात मुख्य शत्रू. त्यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ला देखील झाला होता. बाळासाहेबांना टी बाळू म्हणायचं धाडस फक्त भुजबळांकडे होते. 

याच भुजबळांनी आपल्या टेबलवर श्रीकृष्ण आयोगाची फाईल आल्यावर बाळासाहेब ठाकरेंना अटकेचे आदेश सोडले.

त्यावेळी संपूर्ण मुंबईत वातावरण स्फोटक बनलं. पोलिसांची स्पेशल तुकडी कोर्टात तैनात करण्यात आली. तरीही ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. छगन भुजबळ बदल्याच्या भावनेतून हि कारवाई करत आहेत असं बोललं गेलं. 

जवळपास ५०० पोलीस बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासाठी मातोश्रीवर पोहचले. प्रचंड गर्दीत जयजयकाराच्या गजरात बाळासाहेब पोलिसांच्या स्वाधीन झाले. तिथून त्यांना महापौर बंगल्यात अटक करण्यात आली. बुलेटप्रुफ कार मधून त्यांना थेट कोर्टात नेण्यात आलं.

कोर्टात बाळासाहेबांची बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सतीश मानेशिंदे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मानेशिंदे यांनी आपल्या लौकिकाप्रमाणे ती यशस्वी पणे पार पाडली. छगन भुजबळ यांनी जंग जंग पछाडून देखील बाळासाहेबांना तुरुंगात नेणे त्यांना शक्य झालं नाही. त्यांचा स्टंट वाया गेला.

कोर्टाने बाळासाहेब ठाकरे यांना जामीन मंजूर केला. सतीश मानेशिंदे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 

काळाचा महिमा म्हणजे एकेकाळी बाळासाहेबांना सोडवणारे मानेशिंदे आज नारायण राणे यांना सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.