खरंच मुंबई पोलीस हे स्कॉटलंड यार्ड पोलीसांनंतर दोन नंबरला येतात का..?

मुंबई पोलीस म्हणल्यावर आपल्या सर्वांच्या मनात एकच शब्द आठवतो तो म्हणजे अभिमान.  लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की मुंबई पोलीस ही स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा खालोखाल दोन नंबरवर आहे. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने देखील एका केसच्या निकाला वेळी म्हटलं होतं,

“मुंबई पोलिसांना जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते.”

खुद्द जर हायकोर्ट सुद्धा असं म्हणत असेल तर प्रश्न पडतो की ही तुलना सुरु झाली कशामुळे ? खरंच जगात असं रँकिंग काढलं जात का ? आपण सोडून जगात इतर कोणी मुंबई पोलिसांचं कौतुक करतो का?

सगळ्यात पहिल्यांदा स्कॉटलंड यार्ड पोलीस कोण आहेत हे समजावून घेऊ.

आपल्या पैकी अनेकांना गैरसमज असतो त्याप्रमाणे स्कॉटलंड यार्ड हे स्कॉटलंडचे नाही तर इंग्लडमधील लंडनमधले पोलीस डिपार्टमेंट आहे. याचे खरे नाव मेट्रोपॉलिटन पोलीस सर्व्हिस असे आहे. १८२९ साली झाली. त्याकाळी या पोलीस डिपार्टमेंटचे लंडनमधील न्यू स्कॉटलंड यार्ड रोड येथे ऑफिस होते म्हणूनच तिचे टोपणनाव स्कॉटलंड यार्ड असं पडले.

आता त्यांचं ऑफिस तिथे नाही  पण आजही कट्टर इंग्लिश माणूस या पोलिसांना स्कॉटलंड यार्ड असच ओळखतो. जगातलं पहिलं अधिकृत पोलीस दल हे बिरुद ते अभिमानाने मिरवतात.

या स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे क्राईम इन्व्हेस्टीगेशनची पद्धत. त्यांनी गुन्हेगारीचा छडा लावण्यासाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबली आहे ज्यामुळे त्यांचा तपासाचा वेग आणि निकाल हे जगात सर्वोत्तम मानले जाते.

मुंबई पोलीसची निर्मिती याच धर्तीवर करण्यात आली. 

मुंबई पोलीस आणि स्कॉटलंड यार्डची तुलना खूप जुनी आहे. अगदी अठराव्या शतकात या पोलीस दलाची स्थापना झाली. जेव्हा चार्ल्स फोर्जेटची नियुक्ती इथला पोलीस अधीक्षक म्हणून झाली तेव्हा त्याने मुंबई पोलिसांचं रुपडंच बदलून टाकलं. तो स्वतः वेषांतर करून रस्त्यावर जाऊन सामान्य जनतेची मते जाणून घेत असे. इंग्रज असूनही त्याला भारतीय भाषा रीतिरिवाज याचं ज्ञान होतं. तो प्रचंड हुशार होता.

१८५७च्या उठावात देखील त्यांनी आपले खबऱ्यांचे जाळे आणि वेषांतर करून फिरण्याची सवय यातून मुंबईतील बंडकर्त्यांना शोधून काढलं आणि उठाव सुरु होण्याच्या आधी तो मोडून काढला. त्याच्याकडे असा कठोरपणा असला तरीही फोर्जेट हा त्याच्या उच्च गुणवत्तेच्या पोलीसी कामामुळे भारतीयांमध्ये प्रशंसनीय होता.

त्याने बीट पद्धती, रात्रीची गस्त आणि ईतर कार्यपद्धती अंमलात आणल्या. जर कोणा अधिकाऱ्याने स्थानिक जनतेशी गैरवर्तन केले किंवा कोणाकडून लाच मागितली तर फोर्जेट अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करीत असे. 

त्याने केलेल्या कामाचं कौतुक इंग्लंडमध्ये देखील झालं. प्रोफेशनल पोलिसी कारवाया ज्यासाठी स्कॉटलंड पोलीस ओळखले जायचे त्याचे प्रतिबिंब भारतात चार्ल्स फोर्जेटने मुंबईत उमटवले होते. पुढे १८६३ साली तो इंग्लंडला परत गेल्यानंतर मुंबई पोलीस दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली.

१४ डिसेंबर १८६४ रोजी मुंबई पोलिसचे पहिले कमिशनर सर फ्रॅंक सोटर यांनी उद्दघाटनाच्या दिवशी भाषण केलं आणि तेव्हा म्हणाले,

“माझी आशा आहे हे पोलीस दल स्कॉटलंड यार्डच्या खालोखाल दोन नंबरचे पोलीस दल व्हावे.”

 इथूनच मुंबई पोलीस आणि त्यांच्या स्कॉटलंड यार्ड पोलीस फोर्स बरोबरच्या तुलनेनी सुरवात झाली.

सुरवातीला साधी काठी घेऊन बॉबी पोलीस मुंबईत फिरायचे आणि त्यावरच कायदा व सुव्यवस्था शहरात प्रास्ताहपित करायचे. पुढे जेव्हा शहरात हिंदू मुस्लिम दंगलींना सुरवात झाली तेव्हा इथे स्कॉटलंड यार्ड प्रमाणेच सशस्त्र दलाची स्थापना करण्यास सुरवात झाली.

याबरोबरच लंडन पाठोपाठ मुंबईत देखील इंग्रजांनी सीआयडीची स्थापना केली. 

तिथून पुढे मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्डच्या खालोखाल कार्यक्षम हे बिरुद सांभाळलं. पुढे स्वातंत्र्यानंतर इंग्रज अधिकारी गेले व त्यांच्या जागी भारतीय अधिकारी आले मात्र त्यांनी पोलिसांच्या कठोर कार्यशैली तशीच जपली.

साधारण सत्तरच्या दशकात मुंबईला संघटित गुन्हेगारीचा विळखा बसत गेला. स्मगलिंग आणि बेकायदेशीर धंदे यातून उदयास आलेले गँगस्टर यांचा बजबजाट मुंबईत वाढला होता. करीम लाला, वरदराजन, हाजी मस्तान हे डॉन म्हणून ओळखले जात होते. सुरवातीला ते आपापले धंदे सांभाळायचे पण पुढच्या काळात या गँग्स मध्ये वॉर होऊ लागले. शस्त्रास्त्रे वापरली जाऊ लागली.

ऐंशीच्या दशकात तत्कालीन पोलीस कमिशनर ज्युलिओ रिबेरो यांनी या गुंडाना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सुरवात केली. वाय सी पवार सारख्या अधिकाऱ्याने वरदराजनला पळत भुई करून सोडले. मन्या सुर्वेचा एन्काउंटर, लोखंडवाला शूटआऊट यामुळे तर संपूर्ण देशात मुंबई पोलिसांची दहशत काय असते हे दाखवून देणारा ठरला.

१९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा अगदी विक्रमी वेळेत मुंबईच्या पोलिसांनी या केसचा तपास लावला. या पोल्सीअसिनही गुन्ह्याचा छडा लावण्याची विशिष्ट पद्धत, चार्ल्स फोर्जेटच्या काळापासून चालत आलेलं खबरींच जाळं, व्यवस्थापन या सगळ्याचं कौतुक जगभरात झालं.

सुवेझ कालव्याच्या पलीकडे पूर्वेच्या जगात स्कॉटलंड यार्ड पोलिसच्या तोडीस तोड जर कोणी असेल तर ते म्हणजे मुंबईचे पोलीस.

तिहारचे जेल फोडून जेव्हा चार्ल्स शोभराज पळाला तेव्हा त्याला मुंबई पोलिसांनीच पकडलं. त्यावेळचे पोलीस कमिशनर यांनी जाहीर सांगितलं होतं,

“मुंबई पोलीस ही कोणापेक्षाही दोन नंबरला नाही तर आम्ही सर्वोत्कृष्ट आहे.”

२००८ सालच्या कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलाने दाखवलेलं धैर्य, तुकाराम ओंबळे यांच्या सारख्या एका साध्या कॉन्स्टेबलने एका काठीच्या साहाय्याने पकडलेला दहशतवादी यामुळे जागतिक स्तरावर मुंबई पोलिसांची पाठ थोपटली गेली. अमेरिकी गुप्तचर संस्था, इस्रायल सरकार यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

तस पाहायला गेलं तर जगात पोलिसांच्या कामगिरीचं मोजमाप करायला कोणतंही अधिकृत रँकिंग सिस्टीम नाही, प्रत्येक देशातील प्रश्न तिथली परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे अशी तुलना करणे अतिशय अवघड असते. 

तरी मुंबई सारख्या महाप्रचंड शहरात जी देशाची आर्थिक राजधानी आहे, जिथे बॉलिवूड पासून ते अणुभट्टी पर्यंत अनेक गोष्टी आहेत, लाखो रोज रोजगाराच्या आशेने या शहरात येत असतात अशा ठिकाणी पोलिसांना धार्मिक दंगलीपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत आणि छोट्या पाकिटमारापासून ते गँगस्टर डॉन पर्यंत प्रत्येकाशी चार हात करावे लागतात, एके ४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा सामना करावा लागतो तरी या पोलिसांनी दाखवलेले धैर्य आणि गुन्हेगारांना आवर घालण्यात आजवर आलेलं यश  हे जगात कोणाशीही तुलना करता येणार नाही असेच आहे.

मुंबई पोलिसांना ज्या खडतर समस्यांना सामना करावा लागतो त्या परिस्थिती काम करावे लागले तर स्कॉटलंड यार्डचं काय तर जगातल्या कोणत्याही पोलीस दलाला इथे टाकता येणार नाही. 

गेल्या काही दिवसात मात्र अंबानीच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना अटक, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली आणि त्यांचा लेटर बॉम्ब त्यात केलेला १०० कोटी खंडणीचा आरोप या सगळ्यामुळे मुंबई पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बद्दल बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार म्हणाले,

“कधी मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड बरोबर केली जायची. आता त्यांना खंडणी यार्ड असं म्हटले जाईल.”

सत्तेच्या राजकारणात वाद आरोप प्रत्यारोप चालतच राहतील. पण या  संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई पोलिसची प्रतिमा मलीन होत आहे हे नक्की. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.