एकदा विनोद दुआंनी २२ हजार किलोमीटर प्रवास करत भारत पालथा घातला होता…

आपल्या भारतीय लोकांच्या आयुष्यात हिंदी भाषा आली ती टीव्ही आणि सिनेमांमुळं. बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये दोन, तीन भाषा एकत्र करून हिंदी भाषा बोलली जायची. पण लहेजा असलेली मधाळ हिंदी ऐकायला मिळाली ती न्यूज चॅनेल्समुळं. ही हिंदी कानावर पडण्यामागं, एक आवाज होता तो विनोद दुआंचा.

त्यांचा आवाज कानावर पडला की, घरातले लहानगेही टीव्हीसमोर बसायचे. विशेषत: शुक्रवारी ‘द वर्ल्ड धिस वीक’ आणि शनिवारी रात्री ‘परख’ बघण्यासाठी. फक्त हेच दोन शो नाही, तर निवडणुकांपासून इतर कुठल्याही विषयावरती विनोद दुआ शो करणार असतील, तर लोक टीव्हीला कान लावून बसायचेच.

ते १९७४ मध्ये दूरदर्शनमध्ये ऑडिशन देण्यासाठी गेले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘वाढलेले केस, मोठी दाढी, काळा टी-शर्ट आणि निळी जीन्स अशा अवतारात मी मुलाखतीसाठी गेलो. तेव्हा निवड प्रक्रिया अवघड होती, पण माझा स्वतःवर विश्वास होता.’ विनोद यांच्या कारकिर्दीला दूरदर्शनपासून सुरुवात झाली. पुढं १९८५ मध्ये त्यांनी एमजे अकबर यांच्यासोबत ‘न्यूज लाईन’ नावाचा शो सुरू केला. त्यावेळी तो पहिला गैर सरकारी कार्यक्रम होता.

त्यांनी १९८४ च्या निवडणुकांदरम्यान प्रणॉय रॉय यांच्यासोबत विशेष शो केला. न्यूज लाईन या कार्यक्रमानंतर त्यांनी दूरदर्शनसाठी ‘परख’ नावाचा कार्यक्रम केला, जो सुपरहिट ठरला. झी टीव्ही हे पहिलं प्रायव्हेट टी चॅनेल होतं. त्यावरही त्यांनी चक्रव्यूह नावाचा कार्यक्रम केला. पुढं त्यांनी अनेक कार्यक्रम केले, वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सवर आणि नंतर सोशल मीडियावरही ते सातत्यानं दिसले.

त्यांनी बऱ्याचदा लाईव्ह टीव्हीवर अनुवादाचंही काम केलं. आता समोर घडणाऱ्या घडामोडींचं वार्तांकन करतानाच त्याचा अनुवाद करणं हे तसं जोखमीचं काम. आणि माणूस म्हणलं की चुका या घडणारच. एका मुलाखतीत त्यांनी आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल अगदी हसतखेळत सांगितलं होतं. तो किस्सा असा होता की,

”१९८७ मध्ये मास्को मध्ये ‘भारत महोत्सव’ सुरू होता. त्या कार्यक्रमात तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष मिखेल गोर्बाच्येव आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी उपस्थित होते. हे दोघे मिळून एका झाडाचं रोपण करणार होते आणि त्याला पाणी घालणार होते. हे पाणी दोन्ही देशांमधल्या नद्यांचं होतं. राजीव गांधी गंगाजल टाकणार होते, तर गोर्बाच्येव वोल्गा नदीचं. राजीव मल्होत्रा यांनी या कार्यक्रमाचं इंग्रजीत वर्णन केलं, त्यानंतर मी हिंदीत अनुवाद करत होतो. बोलताना मी चुकून म्हणालो की, राजीव गांधी यात गंगा जल टाकतील आणि गोर्बाच्येव वोडका जल.”

आपल्या आयुष्यातल्या सन्मानजनक घटनांसोबतच आपल्या चुकाही तितक्याच प्रांजळपणे कबूल करणारी, दुआ यांच्यासारखी माणसं तशी विरळाच.

रेल्वेतून भारतभ्रमण

निवडणुका कव्हर करण्यासाठी पत्रकार वेगवेगळे प्रयोग करतात. आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यत कसं पोहोचता येईल आणि आपल्या माध्यमातून आपण जास्तीत लोकांचं म्हणणं कसं मांडू यासाठी प्रत्येक जण आग्रही असतो. विनोद दुआ यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकांवेळी एक अनोखा प्रयोग केला. महात्मा गांधी यांचे नातू रामू गांधी आणि दुआ यांचा चांगलाच परिचय होता. एकदा गप्पांवेळी रामू गांधी यांनी दुआ यांना महात्मा गांधींच्या भारत दौऱ्याचा दाखला दिला.दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर भारत समजून घेण्यासाठी गांधीजींनी रेल्वेतून भारतभ्रमण केलं होतं.

इलेक्शन कव्हर करण्यासाठी आणि भारतीय जनमानसाची नस ओळखण्यासाठी दुआ यांनीही भारतभर फिरण्याचं ठरवलं, यासाठी त्यांनी पर्याय निवडला तो रेल्वेचा. त्यांनी जम्मूमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत मजल मारली. पश्चिम ते पूर्व पट्ट्यासाठी त्यांनी भुज ते लिखापाणी असा प्रवासही केला. त्यांनी ३२ दिवसांत २२ हजार १६० किलोमीटर अंतर कापत सगळा भारत पालथा घातला. या प्रवासातल्या काही रात्री त्यांनी छोट्या हॉटेलमध्ये घालवल्या, तर २३ रात्रींसाठी त्यांची झोप रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्ब्यातच झाली.

तब्येत बिघडल्यामुळं त्यांना २९ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढे त्यांची तब्येत आणखी खालावली. शनिवारी त्यांनी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.