युक्रेनमध्ये रशियन सैनिकांचे सात हजार मृतदेह बेवारस पडून आहेत

रशिया-युक्रेन युद्धाचा आज ५०वा दिवस आहे. युद्ध अवघ्या १५-२० दिवसांत संपेल आणि रशियापुढं युक्रेनचा निभाव लागणार नाही असं भाकीत होतं. मात्र युक्रेनच्या नागरिकांचे चिवट प्रयत्न, नाटो आणि इतर देशांकडून झालेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि युद्धात पुरेशा तयारीनीशी नं उतरलेलं रशियन सैन्य यामुळं  सुरवातीला यश मिळूनही रशियन सैन्याला मोठी हानी सहन करावी लागत असल्याचं सांगण्यात येतंय.

रशियाने त्यामुळेच युक्रेनच्या राजधानीजवळून काढता पाय घेतला आहे.

आणि आता रशिया पुन्हा नव्याने प्लॅनींग करून हल्ला चढवेल असं सांगण्यात येत आहे. मात्र रशियन सैन्याने जशी जशी माघार घ्यायला सुरवात केली तस तशी युद्धाची भीषणता जगासमोर येऊ लागली आहे.

सामान्य नागरिकांचे बेवारस पडलेले मृतदेह किंवा त्यांना मोठ्या संख्खेने पुरलेल्या दफनभूमीचे फोटो पुढं येत होते.

आता त्यात भर पडली आहे रशियन सैनिकांच्या मृतदेहांची.

युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शवगृहात रशियन सैनिकांचे हजारो बेवारस मृतदेह पडून आहेत. कारण रशियन सरकारने  एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मृतांची संख्या मान्य करण्यास नकार दिला आहे.

युक्रेन सरकारच्या अधिकाऱ्यांनी  द वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी  ७००० हून अधिक मृत रशियन सैनिक युक्रेनमधील शवगृह आणि रेफ्रिजरेटेड रेल्वे डब्यांमध्ये साठवले आहेत.

एवढंच नाही तर मृत सैनिकांचा आकडा लपवण्यासाठी रशियाने  हजारो मृत सैनिकांना युक्रेनमधून बेलारूसला नेलं असल्याचेही रिपोर्ट पुढे येत आहेत.

नाटोच्या अंदाजानुसार रशियाने युद्धादरम्यान १५,००० पर्यंत सैन्य गमावले आहेत. तर युक्रेनने रशियाचे सुमारे २०,००० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

 त्याचवेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या आठवड्यात सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की युक्रेनने युद्ध सुरू झाल्यापासून २,५०० ते ३,००० सैनिक गमावले आहेत.दरम्यान, रशियाने आपला अधिकृत मृतांचा आकडा १३५१ असल्याचं सांगितलं आहे. रशियाने ही आकडेवारी २५ मार्चला सांगितली होती.

युक्रेननं यापुढं जाऊन रशियन सैनिकांच्या मृतदेह मायदेशात पाठवूं देण्यास तयार असल्याचे देखील म्हटले आहे.

  “आम्ही  सर्व मृतदेह  मोजत आहोत. आमच्याकडं फ्रीजमध्ये त्यांचे अवशेष आहेत. आणि आम्ही हे मृतदेह रेड क्रॉसला देऊ शकतो किंवा त्यांना बेलारूसपर्यंत देखील पोहचवू शकतो. रशियाला जिथे पाहिजे आहेत तिथे आम्ही हे मृतदेह पोहचवण्यास तयार आहोत “

असं युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी म्हटले आहे.

मात्र युक्रेनच्या या दाव्याला आणखी बळ मिळते ते रशियाने केलेल्या कायद्यांमुळे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०१५ मध्ये एका हुकुमावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये असं म्हटलं होतं की सर्व लष्करातील सगळ्या मृत्यूंचे सरकारी  गुपित म्हणून वर्गीकरण केलं जाईल.

यामध्ये शांतताकाळातील आणि युद्ध काळातील अशा दोन्ही घटनांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी युक्रेनमधील काही भागातील बंडांमध्ये त्यावेळी रशियन सैनिकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप झाले होते आणि तेच झाकण्यासाठी पुतीन यांनी हा कायदा आणल्याचं म्हणालं गेलं होतं.

आणि याला जोड मिळाली आणखी एका नव्या  कायद्याची.

रशियातील या नवीन कायद्यात लष्कराबद्दल जाणूनबुजून “बनावट” बातम्या पसरवल्याबद्दल १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावन्यात येणार आहे. 

त्यामुळे रशियातील एनजीओ आणि अधिकाऱ्यांना युक्रेनमधील परिस्थितीबद्दल उघडपणे बोलणे कठीण झाले आहे. रशियाच्या याच गुप्ततेमुळे, रशियन सैनिकांच्या अनेक कुटुंबांना त्यांच्या आप्तस्वकीयांना  काय झाले याची माहितीच मिळत नाहीये.

याचदरम्यान, युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयानं एक टेलिग्राम चॅनेल काढलं आहे. या चॅनेलवर  रशियन मृत सैनिकांचे फोटो टाकण्यात येतात आणि ते पाहून नातेवाईक सैनिकांना ओळखू शकतात  अशी व्यस्था करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, मृत सैनिकांची ओळख पटवण्यासाठी युक्रेन अमेरिकन कंपनीचे फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरत आहे.

आता हे सगळं किती भयानक आहे हे यावरूनच कळत आहे. यातली मृतांची संख्या कमी जास्त देखील होऊ शकते. मात्र यावेळी हे ही सत्य आहे की युद्धात मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आणि युद्ध तरीही थांबायचं नाव घेत नाहीये.

 सैनिकांची होणारी हाणी पाहून रशिया क्षेपणास्त्रांच्या वापर करून हवाई हल्याचा विचार करू शकते असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. आणि रशियाने पण युक्रेनच्या अनेक  ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात   मिसाइल टाकण्यासही सुरवात देखील केली आहे. त्यामुळे युद्धाचं याहूनही भीषण रूप आपल्याला पाहायला मिळू शकतं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.