हरियाणाची पोरगी महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यात चर्चेत असते

महाराष्ट्रातला पॉलिटिकल ड्रामा मागच्या काही दिवसांपासून देशभर गाजतोय. बर्‍याच घडामोडींनंतर ठाकरे सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आलं.  

या घटने मागचं एक एक सिक्रेट स्वत: मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळातल्या भाषणात उलगडून सांगितलं आणि चक्क देवेंद्र फडणवीसांना डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली. हे झालं शिंदे गट आणि भाजप यांच्या बाजूचं सिक्रेट. 

पण आता हळू हळू या राजकीय नाट्यातली पडद्यामागची पात्रं सुद्धा बाहेर येऊ लागलीयेत. असच एक पडद्यामागचं फसलेलं पात्रं आता बाहेर आलं. ते म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान. 

मूळच्या हरियाणा इथल्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन आणि त्यांचे एक सहकारी यांना नुकतंच गोवा पोलिसांनी अटक केलीये.

नेमकं भाजपचे बंडखोर आमदार गोव्यातल्या ज्या ताज हॉटेल मध्ये थांबले होते त्याच हॉटेल मध्ये हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी थांबल्यामुळे हा वाद आता जास्तच पेटताना दिसतोय.

नक्की प्रकरण काय आहे बघूया.. 

गोवा पोलिसांनी सोनिया दुहान आणि त्यांचे सहकारी डेहराडूनचे श्रेय कोठीयाल यांना शनिवारी संध्याकाळी हॉटेल ताज गोवा मधून अटक केली. कोठीयाल यांच्या पत्नीचं ओळखपत्र स्वत:चं आहे असं दाखवून हॉटेलमध्ये राहिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सोनिया आणि त्यांच्या सहकार्‍याला हॉटेल मधून अटक केली.

त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा म्हणाले की,

ते दोघे कुठल्याही राजकीय हेतूने नव्हे तर पर्यटनासाठी गोव्याला गेले होते, गोवा पोलिस मुद्दाम त्यांना त्रास देत आहेत आणि विनाकारण त्यांचा छळ करत आहेत.

रविवारी त्यांना २०,००० रु. चा जामीन मंजूर करत त्यांची सुटका करण्यात आली आहे असं सांगितलं जातंय.

मुळच्या हरियाणाच्या असणार्‍या सोनिया दुहन यांचा राष्ट्रवादीशी नक्की कसा संबंध आहे बघू. 

सोनिया ही हरियानाच्या हिसार गावात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आली होती. तिचं शालेय शिक्षण तिच्या गावातच झालं. त्यानंतर तिने कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीएससीची पदवी घेतली. नंतर पायलटच्या प्रशिक्षणासाठी ती काही काळ पुण्यात आली होती.

इथूनच तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा आणि कार्याचा तिच्यावर प्रभाव पडला. सोनियाने २१ वर्षांची असताना राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष जॉइन करून सक्रिय विद्यार्थी राजकरणात प्रवेश केला.

तिने दिल्ली विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस कडून आत्तापर्यंत दोन वेळा निवडणूक लढवलीये.

सोनियाच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालंय. ती हरियाणातल्या आपल्या गावी गेली की आपल्या आई आणि भावंडांसोबत गावातल्या शेतात काम करते. गावातल्या मुलींना शिक्षणासाठी ती नेहमी प्रोत्साहन देते. तिला वाटतं की मुलींनी उच्च शिक्षण घेऊन राजकारणात यावं. ती मुलींच्या शिक्षणासाठी नेहमी धडपड करत असते.

सोनियाने राष्ट्रवादीच्या युवक शाखेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलंय. आता सध्या तीच्याकडं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तिने आजपर्यंत राष्ट्रवादीत मोठ मोठ्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर अगदी कमी वयात तिनं पक्षात स्वत:चं स्थान निर्माण केलंय.

खुद्द शरद पवार सुद्धा म्हणतात “महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत सोनियाचा मोठा वाटा आहे”

२०१९ चा ‘पहाटेचा शपथविधी’ पार पडल्यानंतर राज्यात बरंच मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे सगळ्यात जास्त जागा जिंकून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आपल्या पारंपरिक विरोधी पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी आणि कोंग्रेस सोबत सत्ता स्थापन करणार होती.

असं बोललं जातं की, नेमकं त्याचवेळी भाजपकडून राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ, नितिन पवार, अनिल पाटील आणि दौलत दरोडा या ४ आमदारांना गुरुग्राम मधल्या ओबेरॉय हॉटेल मध्ये जबरदस्तीने ठेवण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीच्या या ४ आमदारांची सत्ता स्थापनेत उपस्थिती असणं महत्वाचं होतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात आणण्याखेरीज राष्ट्रवादीकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यावेळी या आमदारांना सहीसलामत सोडवून आणण्याची ही अवघड पण महत्वाची जबाबदारी पक्षाने सोनिया यांच्याकडे सोपवली.

सोनिया हरियाणाच्या असल्यामुळे तिकडचा बहुतेक परिसर त्यांच्या परिचयाचा होता. त्यामुळे त्यांना हि जबाबदारी देण्यात आली होती. गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेल मध्ये त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. या ४ आमदारांना हॉटेलच्या ५ व्या मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आलेलं. त्यांच्याकडचे फोन सुदधा काढून घेण्यात आले होते. त्यांच्या खोली पर्यंत जायला कोणालाही परवानगी नव्हती.

अशी अवघड परिस्थिती असतांना सुद्धा सोनिया यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन, ही आमदारांच्या सुटकेची मोहीम आखली आणि कशाचीही पर्वा न करता मोठ्या पहार्‍यातून त्या ४ ही आमदारांना सही सलामत बाहेर काढून आणलं. त्यासाठी त्यांनी हॉटेलच्या स्टाफ मधल्या लोकांना सुद्धा सोबत घेतलं होतं. एखाद्या चित्रपटात शोभेल असच हे रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी यशस्वी करून दाखवलं होतं.

त्यानं ४ आमदारांना महाराष्ट्रात परत आणलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीची यशस्वीरीत्या स्थापना झाली.

असं सांगितलं जातं की,

२०१९ मध्ये यशस्वी झालेल्या सोनिया दुहान यांच्याकडे यंदाच्या वेळीही आसाममधून गोव्यात गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बाहेर काढून परत माघारी आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी योजना आखली आणि त्या गोव्याच्या ताज हॉटेल मध्ये पोहचल्या सुद्धा.

मात्र यावेळच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्या पुर्णपणे अपयशी ठरल्या. इकडे महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांनी सत्ता स्थापन केली आणि तिकडे सोनिया पोलिसांच्या हातात सापडल्या..

हेही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.