जन आशीर्वाद यात्रेच्या गर्दीवर टीका करताना शिवसेनेने आपल्या गर्दीकडे पण बघायला हवे…

आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,

जन आशीर्वाद यात्रा ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही शक्तीप्रदर्शन करताय हे एक प्रकारे तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करताय ठीक आहे पण किमान तुम्ही संयम पाळा, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला आहे.

एकीकडे शिवसेना भाजपवर टीका करताना दिसत आहे, मात्र त्याचवेळी स्वतः शिवसेनाच आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्दीला निमंत्रण देताना दिसून येत आहे. हा कार्यक्रम म्हणजे ‘युवासेनेचा युवा संवाद’. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेवर आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून अशी टीका होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमध्ये नव्याने समावेश झालेल्या भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. १६ ऑगस्ट पासून या यात्रेला सुरवात झाली आहे. यात कॅबिनेट मंत्री नारायण राणे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्य मंत्री कपिल पाटील हे सहभागी झाले आहेत.

ही यात्रा मुंबई, कोकण, बीड, औरंगाबाद, नांदेड, ठाणे, पालघर, वसई-विरार, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यातून जाणार आहे. या यात्रेची शेवट २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

मात्र भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरुन शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका टळला नसून गर्दी जमविणे चुकीचे असल्याचे शिवसेनचे म्हणणे आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जन आशीर्वाद यात्रेवरून भाजपवर टीका केली आहे.

याबाबत भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उत्तर दिले आहे. सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. मात्र ज्यावेळी संसदेत वेल मध्ये गोंधळ सुरु होता त्यावेळी तुम्ही मास्क सुद्धा घातला नव्हता आणि लोकप्रतिनिधी एकमेकांना खेटून उभे होता असे उत्तर दिले आहे.

युवा सेनेचा युवा संवाद

मागच्या महिनापासून राज्यात युवसेना पदाधिकारी दौरा सुरु आहे. शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. या संवादाची पुण्यातून सुरुवात झाली होती. आता मराठवाड्यानंतर विदर्भात १९ ऑगस्ट पासून युवा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणर आहे.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे दौरा करत आहे. या दौऱ्यानिम्मित होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये ठीक-ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता.

गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा

कार्यक्रमात गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच तेथे कोरोना नियमांचे लल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही जालना आणि इतर ठिकाणी झालेल्या युवा संवाद कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती. तेथे अनेकांनी मास्क घातला नव्हता, सोशल सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे पाहायला मिळते.

May be an image of one or more people and people standing

१३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद ग्रामीण मध्ये झालेल्या युवा संवाद कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती. यावेळी अनेकांनी नियमाचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकार मंत्री आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. त्याच्या परवानगीने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

एकीकडे शिवसेनाभाजपच्या जन आशीर्वाद यात्रे निम्मित होणाऱ्या गर्दी वरून टीका करत आहे. मात्र दुसरीकडे युवा सेनेच्या कार्यक्रमासाठी होणाऱ्या गर्दीकडे कानाडोळा तर करत नाही ना खरच शिवसेना कोरोनाच्या नियमांबाबत गंभीर आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.