याचा अर्थ आता शिवसेना – भाजप कधीच एकत्र येणार नाहीत का?

मागच्या काही दिवसात राज्यात शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा चालू होत्या. काही माध्यमांनी त्याबाबतच्या बातम्या देखील दिल्या. तर काही माध्यमांनी त्याची सूत्र देखील मांडली. यात मग देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचं सांगिलं गेलं. सोबतच नितीश कुमारांसारखी युती तोडून पुन्हा उद्धव ठाकरे हेचं महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून राहणार आहेत.

मात्र सध्यातरी तसं काहीही घडलेलं दिसतं नाही. राज्यातील समीकरण देखील बदलेली नाहीत. त्यातचं आता शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलेलं आहे. मात्र याच मंत्रिपदामुळे आता शिवसेना – भाजपच्या एकत्र येण्याच्या समीकरणांबद्दल चर्चा थांबलेली दिसते. याच कारण देखील सर्वश्रुत आहे ते म्हणजे राणे आणि शिवसेना यांच्यातील विळ्या-भोपळ्याचा वैर.

त्यामुळेच आता प्रश्न विचारला जाऊ लागला आहे तो म्हणजे आता भाजप आणि शिवसेना पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत का? राणेंना मंत्रिपद दिल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर काही परिणाम होणार का?

मात्र तज्ञांच्या मते सेनेच्या एका कट्टर विरोधकाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले म्हणून मोदी-ठाकरे यांच्या नात्यावर काही परिणाम होणार नाही. सोबतच त्यामुळे शिवसेना – भाजपच्या एकत्र येण्याच्या सूत्रावर देखील कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना जेव्हा एकत्र यायचं असेल तेव्हा ते जरुर येतील. याला काही कारण देखील सांगितली जातं आहेत.

१. उद्धव ठाकरे – नरेंद्र मोदी एकमेकांवर थेट टिका करणं टाळतात..

जरी राज्यात भाजप आणि शिवसेना एकमेकांवर थेट टीका करत असले, राज्यात ते दोघे सध्या एकमेकांचे प्रमुख विरोधक असले तरी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यातील संबंधांमध्ये फरक आहेत. ते कधीही एकमेकांवर थेट टीका करत नाहीत. त्यांनी वैयक्तिक संबंधांमध्ये कुठेही कटुता येऊ दिलेली नाही.

याची काही उदाहरण देखील आपण बघू शकतो.

एक तर जेव्हा उद्धव यांची विधान परिषदेत राज्यपालांनी कालावधीचं कारण पुढे करत नियुक्ती करण्यास नकार दिला होता. तेव्हा मोदी यांनी पुढाकार घेऊन तिथं निवडणूक घ्यायला लावली. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे यांच्यात वाद झाले तेव्हाही त्या वादातून मोदी कटाक्षाने बाजूला राहिले. अलीकडचेच उदाहरण बघायचं म्हंटलं तर मागच्या महिन्यातील दोघांची भेट.

नरेंद्र मोदी यांची इतर राज्यांमध्ये देखील आपल्या मित्रपक्षांसाठीची हीच रणनीती आहे.

म्हणजे ओरिसात भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण नवीन पटनाईक यांच्यावर मोदी कधीही टीका करत नाहीत. आंध्राचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका टाळली जाते. रेड्डी यांच्यावर सीबीआय, ईडीचे आरोप आहेत. अकाली दलाशी भाजपचे भले फाटले असेल, पण मोदी त्यांच्यावर टीका करीत नाही. माजी पंतप्रधान देवेगौडा विरोधात जाणार नाहीत याची काळजी मोदी सातत्यानं घेत असलेले दिसून येतं.

त्या तुलनेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत मात्र भाजपची फुटपट्टी वेगळी आहे.

२. अलीकडील काही दिवसांमधील वक्तव्य

राजकारणात कधीही कोणतीही गोष्ट अचानक ठरत नसते, आणि मंत्रिपदासारखी गोष्ट तर नाहीच नाही हे सत्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपद एका रात्रीत दिलं आहे असं आजिबात नाही.

त्यामुळे मंत्रिमंडळाची तयारी ही मागच्या अनेक दिवसांपासून सुरु होती. ती चालू असताना, आणि अधिवेशनाआधी देवेंद्र फडणवीस यांची २ वेळा दिल्लीवारी झाली होती. यातचं नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं फिक्स झालं असल्याचं सांगण्यात येतं.

मात्र त्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून काही वक्तव्य आली होती, ती ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अधिवेशनाआधी ४ जुलै रोजी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,

शिवसेना आणि आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हतं, आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, जर-तरला काही अर्थ नसतो.

त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेते आशिष शेलार आणि खासदार संजय राऊत यांच्या ‘कथित’ गुप्त भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र आपल्याला त्याबद्दल माहित नाही पण राजकारणात अशा गाठीभेटी होतं असल्याचं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली होती. 

तर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं,

“शिवसेना गेली ३० वर्षं आमच्यासोबत होती. १९८४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार आमच्या चिन्हावर निवडणूक लढले होते. त्यामुळे शिवसेना हा काही आमचा शत्रू नाही. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांना फसवण्यात आलं. त्यांनाही मुख्यमंत्रिपदाचा मोह पडला.

तर त्याच वेळी शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत देखील म्हणाले की, 

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद नक्कीच आहेत आणि मी देखील हेच सांगत आहे. आम्ही काय भारत-पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. पण दोन्ही पक्षांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. आमिर-किरणप्रमाणेच आमचंही नातं असंच आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनंतरच हि सगळी वक्तव्य आली होती. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपद फिक्स झाल्यानंतर देखील दोन्ही पक्षांकडून एकप्रकारे एकमेकांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा संदेश देण्यात आल्याचं दिसून आलं होतं. 

३. पंतप्रधान मोदी – मुख्यमंत्री ठाकरे भेट

जेष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

सध्या जरी राणेंच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सध्या थांबल्या आहेत. मात्र राजकारणात कोणतीही गोष्ट परमनंट नसते. राणे आज मंत्रिमंडळामध्ये आहेत.

सोबतच राणे मंत्रिमंडळात असले आणि या चर्चा थांबल्या असल्या तरी मागच्या महिन्यातील भेटीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कुठंही कटुता आलेली नाही, असच म्हणावं लागेल. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या शक्यता संपलेल्या नाहीत.

४. उद्धव आणि नितीश कुमार यांच्यात बेसिक फरक आहे…

आता अजून एक मुद्दा विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही काळापासून चर्चेला होता तो म्हणजे  उद्धव ठाकरे नितीश कुमारांसारखी युती तोडून बाहेर पडतील आणि भाजप सोबत सरकार स्थापन करतील. पण इथं अडचण होती ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यातील बेसिक स्वभाव फरकाची.

याबद्दल बोलताना जेष्ठ राजकीय पत्रकार डॉ. विजय चोरमारे सांगतात कि,

नितीश कुमार यांनी एका रात्रीत लालू प्रसाद यादव यांच्याशी युती तोडून भाजपसोबत सरकार बनवलं होतं. कारण ते ऑपॉर्च्युनिस्टिक राजकारणी आहेत. त्यांना तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहेत असं वाटलं कि ते भाजपसोबत गेले. कारण त्यांना बिहारवर एकट्याचा होल्ड हवायं.

मात्र उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तसा नाही. त्यांना आघाडीतून बाहेर पडण्यासाठी भक्कम कारण लागणार. त्यामुळे बिहारसारखं चित्र आता सध्या महाराष्ट्रात दिसू शकलेलं नाही, किंवा तशी शक्यता वाटत नाही. मात्र उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणारच नाहीत असं आजिबात नाही. असं देखील डॉ. चोरमारे सांगतात.

५. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्र महत्वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उत्तरप्रदेश म्हणजे सत्तेचा रस्ता असेल तर महाराष्ट्र म्हणजे सत्तेच्या चाव्या आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण एकतर उत्तरप्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून जातात. सोबतचं दुसरी गोष्ट म्हणजे देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे.

त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य कोणत्याही पक्षासाठी हातचं जाऊन चालणार नसते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रासारखं राज्य हे मागच्या ३ दशकांपासून कोणत्याही एका पक्षाला काबीज करता आलेलं नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांसाठी महत्वाचे आहेत असं दोन्ही पक्षातील नेते आजही सांगताना दिसतात.

या सगळ्या गोष्टींमुळे एका नारायण राणे या व्यक्तीमुळे शिवसेना आणि भाजप किंवा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध बिघडतील असं वाटत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सोबतच आगामी काळात भाजप – शिवसेना एकत्र देखील येऊ शकतात असं देखील सांगितलं जातं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.