एकवेळ अशी आली होती की ‘शोले’ मधुन अमजद खानला काढून टाकण्यात येणार होतं

‘शोले’ सिनेमा हा भारतीय सिनेमातील एक माईलस्टोन सिनेमा. जसजसे आपण मोठे होतो आणि थोडंफार आपल्याला शहाणपण येतं तेव्हा ‘शोले’ हा बघावाच लागतो. याला कारण असं, लहानपणापासुन आई-वडीलांकडून ‘शोले’ बद्दल इतकं ऐकलं असतं, की एका वेगळ्याच प्रकारचं कुतूहल मनात निर्माण झालं असतं. त्यामुळे नेमका हा सिनेमा कसा आहे, याचं प्रचंड अप्रुप असतं.

एकवेळ अर्धवट झोपेतुन अभ्यासामधल्या प्रश्नांची उत्तरं नाही आठवणार. परंतु ‘शोले’ मधला कोणताही डायलाॅग विचारा, लगेच सांगता येईल. ‘शोले’ घडताना बरेच किस्से झाले असणारच. इतका मोठा सिनेमा, एक से बडकर एक कलाकार, कॅमेरासमोर इतके कलाकार, कॅमेरामागे सुद्धा अनेक माणसांची धडपड.

त्यामुळे ‘शोले’ च्या सेटवर घडलेले अनेक किस्से हे माहित असतीलच.

आज तुम्हाला सांगणारेय, डाकु गब्बर सिंग रंगवलेल्या अमजद खानचा एक वेगळाच किस्सा… म्हणजे एकवेळ अशी आली होती की, गब्बरचा रोल करायला जमत नव्हता म्हणुन अमजद खानला ‘शोले’ सोडावा लागणार होता. 

सुरुवातीला थोडं अमजद खानविषयी…

उंच धिप्पाड असा अमजद खान जेव्हा सिनेमात दिसायचा तेव्हा त्याची शरीरयष्टी आणि भेदक नजर पाहून धडकीच भरायची. शांत दिसणारा हा माणुस सिनेमात कधी काय करेल काय सांगता यायचं नाही.

सिनेमात येण्याआधी १७ व्या वर्षापासुन अमजद खानने रंगभुमीवरील नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली होती. १९५१ ते १९५७ या काळात अमजदने ‘नाजनीन’, ‘अब दिल्ली दूर नही’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी नाटकांमध्ये काम केले. ‘मुगल-ए-आझम’ चे दिग्दर्शक के. असीफ यांना साहाय्यक म्हणुन अमजदने सुरुवातीला काम केले.

इथुन ख-या अर्थाने अमजदचा बाॅलिवूड प्रवेश झाला. 

 

१९७३ साली ‘हिंदुस्तान की कसम’ या सिनेमातुन अमजद खान प्रथमच अभिनेता म्हणुन समोर आला. परंतु अमजदला इतकी ओळख मिळाली नव्हती. पुढच्या दोनच वर्षात अमजदला रमेश सिप्पींनी ‘शोले’ मधील गब्बर सिंग साठी विचारले. इतका मोठा सिनेमा, ‘गब्बर’ सारखी इतकी तगडी भुमिका मिळाल्याने अमजद खानला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ‘गब्बर’ च्या भुमिकेसाठी ‘शोले’ चे पटकथाकार सलीम-जावेदच्या सांगण्यावरुन अमजदने तरुण कुमार भादुरी लिखित ‘अभिशपथ चंबल’ या पुस्तकाचं वाचन केलं. 

खुपदा विद्यार्थी लेखी परीक्षेत अव्वल असतात परंतु प्रॅक्टीकलमध्ये मार खातात.

असंच काहीसं अमजद खानच्या बाबतीत झालं. अमजदने ‘गब्बर’च्या भुमिकेसाठी पुर्वतयारी चांगली केली परंतु ही पुर्वतयारी कॅमेरासमोर कमी पडली. ‘गब्बर’च्या भुमिकेसाठी अमजदचा आवाज सर्वांना अत्यंत नाजुक वाटत होता. गब्बर डाकुंचा सरदार असल्याने त्याचा आवाज मोठा असुन त्यामध्ये एक प्रकारची मग्रुरी सर्वांना अपेक्षित होती.

पण काही केल्या अमजदला आवाजाची मोठी पट्टी लावणं जमत नव्हतं. यामुळे एकवेळ अशी आली की, ‘शोले’ मधून अमजद खानला वगळण्यात येणार होतं. 

यावेळेस ‘शोले’चे लेखक सलीम-जावेद अमजद खानच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना अमजदच्या अभिनयक्षमतेवर विश्वास होता. सलीम-जावेदच्या सांगण्यावरुन अमजदला भुमिकेची तयारी करण्यासाठी थोडा वेळ देण्यात आला. यादरम्यान अमजद खानचे सीन वगळता इतर कलाकारांच्या सीनचं शुटींग करण्यात आलं. 

‘शोले’ सिनेमाचे कॅमेरामन द्वारका द्विवेचा यांच्या सूचनेवरुन अमजद खान जवळपास पंधरा दिवस दररोज गब्बरच्या वेशभुषेत सेटवर एकटाच वावरायचा. भुमिकेसाठी लागणारे हावभाव, आवाज अशा गोष्टींचा अमजद खान सराव करायचा. याचा फायदा असा झाला की, पंधरा दिवसानंतर कॅमेरासमोर गब्बरची भुमिका करण्यासाठी अमजद खान सज्ज झाला तेव्हा त्याच्या देहबोलीत आत्मविश्वास झळकत होता.

अमजद खानने प्रभावी अभिनय करुन सर्वांनाच चकीत केले. 

अमजद खान गब्बरच्या भुमिकेत पुर्ण एकरुप झाला होता. याचं उदाहरण म्हणजे, सिनेमात एका प्रसंगात वीरुला गब्बरने बांधलं असतं. गब्बर सिंग बसंती जवळ येऊन घाबरवण्यासाठी तिचा हात मुरगळतो, आणि वीरुला सोडवण्यासाठी काचेच्या तुकड्यांवर नाचायला सांगतो.

अमजद खानने या प्रसंगात बसंती अर्थात हेमा मालिनीचा हात इतका जोरात मुरगळला की, पुढचे काही दिवस हेमा मालिनीचा हात आणि खांदा दुखत होता. धर्मेंद्रला हे कळताच धरमपाजी अमजद खानवर नाराज झाले. अमजदने धरमपाजींची माफी मागितली. मग कालांतराने धर्मेंद्रचा अमजदवरील राग निवळला. 

‘शोले’ १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला.

सिनेमाने अमाप यश मिळवलं, हे आपण सर्व जाणतोच. परंतु संजीव कुमार, अमिताभ, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांसारख्या कसलेल्या कलाकारांपेक्षा जास्त प्रसिद्धी गब्बर साकारणा-या अमजद खानला मिळाली.

ही प्रसिद्धी इतकी जबरदस्त होती की, अमजद खानने त्याकाळी गब्बरच्या गेटअपमध्ये ब्रिटानीया कंपनीच्या एका बिस्कीटाच्या जाहीरातीसाठी काम केले. ‘गब्बर की असली पसंद’ ही या बिस्कीटाची टॅगलाईन होती. एखादा खलनायक अशी जाहीरात करण्याची ती पहिलीच वेळ होती. 

अशाप्रकारे अभिनय येत नसल्याने ‘शोले’ सोडावा लागत असलेल्या अमजद खानने पुढे अनेक सिनेमांमध्ये उत्तमोत्तम भुमिका साकरल्या. पण आजही ‘गब्बर सिंग’ म्हणुनच अमजद खानची ओळख आहे. आणि ही ओळख कधीही पुसली जाणार नाही. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.