उत्तर प्रदेशातले नेते म्हणतायत, श्रीराम हे राजा दशरथाचे नाही, तर निषाद ऋषींचे पुत्र

आता उत्तर प्रदेशात निवडणूक आहे आणि तिथं प्रभू श्रीरामाचा विषय येणार नाही, असं कसं शक्य आहे भिडू? त्यात अयोध्येत राममंदीर होतंय म्हणल्यावर हा मुद्दा टॉपला असणारच. पण यावेळी एक वेगळाच किस्सा झालाय. चक्क श्रीराम हे राजा दशरथांचे पुत्रच नव्हते, असं विधान उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य असणाऱ्या संजय निषाद यांनी केलंय.

संजय निषाद यांचा निषाद पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष आहे. त्यामुळं अयोध्येतली संतमंडळी आणि विरोधी पक्षांनी निषाद यांच्यासोबतच भाजपवरही टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळं भाजप आपल्या होम ग्राऊंडवरच अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

काय म्हणालेत संजय निषाद?

प्रयागराजमध्ये बोलताना ते म्हणाले, ‘असं म्हणलं जातं की, राजा दशरथांना एकही अपत्य नव्हतं आणि श्रृंगी ऋषी निषाद यांनी त्यांना एक यज्ञ करा असं सांगितलं. राजा दशरथांनी आपल्या तीनही राण्यांना खीर दिली. खीर खाल्ल्यानंतर, प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. केवळ खीर खाल्यामुळं कुणीही गर्भवती होत नाही, त्यामुळं श्रीराम हे दशरथांचे कथित पुत्र होते. श्रृंगी ऋषी निषाद हे श्रीरामांचे खरे पिता होते’, असा दावा संजय निषाद यांनी केला.

‘श्रीरामांचे माता-पिता आणि अयोध्या नगरीतले रहिवासी श्रीरामांना कधीच समजू शकले नाहीत. निषाद ऋषींनीच त्यांच्या खऱ्या शक्तीला ओळखलं आणि जो देवाला ओळखतो तोच श्रेष्ठ ठरतो. निषाद ऋषींचाही हाच दर्जा आहे,’ असंही ते म्हणाले.

संजय निषाद कोण आहेत?

पूर्वाश्रमीचे बहुजन समाज पक्षाचे नेते असणाऱ्या संजय निषाद यांनी २०१६ मध्ये स्वतःचा पक्ष उघडला. ‘निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल’ म्हणजेच निषाद असं नाव त्यांनी पक्षाला दिलं. पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षानं १०० उमेदवार उभे केले, मात्र केवळ एकच उमेदवार निवडून आला. लोकसभेवेळीही प्रवीण कुमार निषाद हे एकच खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी सत्तेतल्या भाजपसोबत युती केली. उत्तर प्रदेशमधल्या आगामी निवडणुकांसाठीही हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत.

ओवैसींचा मोहन भागवतांवर निशाणा

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी निषाद यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. ‘सरसंघचालक तर डीएनए तज्ञ आहेत, त्यामुळं त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं,’ असं ओवैसी म्हणले आहेत.

या प्रकरणावरून अयोध्येतले संतही चांगलेच नाराज झाले. श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी, ‘निषाद यांच्या बोलण्यामुळं प्रभू श्रीरामांचा आणि त्यांच्या भक्तांचा अपमान झाला आहे. त्यांनी ईशनिंदा केली आहे. भाजपनं निषाद पक्षासोबतची युती तोडावी,’ असं ते म्हणालेत.

निषाद यांची वक्तव्यावरून कल्टी

प्रकरण चिघळतंय म्हणल्यावर निषाद यांनी आपल्या वक्तव्यावरून कल्टी मारली आहे. ते म्हणाले, ‘मी प्रभू श्रीरामांचे गुण आणि महानतेचा गौरव करत होतो. निषाद समाज प्रभू श्रीरामांशी कसा संबंधित आहे, हे मला सांगायचं होतं. मात्र माधम्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला.’

आता या वक्तव्याचा भाजपच्या कॅम्पेनवर काही परिणाम होतो का? निषाद पक्ष आणि भाजपची युती टिकणार का? याचं उत्तर लवकरच मिळेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.