सियाचीन हिरो हनुमंथप्पांच्या पत्नीला सरकारने अजून नोकरी देखील दिलेली नाही…

तीन वर्षापूर्वी जम्मू-काश्मीर मधील सियाचीन मध्ये लान्सनायक हनुमंथप्पा हे ६ दिवस २५ फुट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. सातव्या दिवशी त्यांना ढिगाऱ्याखालुन जिवंत बाहेर काढण्यात आले, हा एक चमत्कारच होता.

तेव्हा देशभर त्यांचीच चर्चा होती, लोकही त्यांच्या या साहसला सलाम ठोकत होते. त्यानंतर लान्सनायक हनुमंथप्पाची प्रकृती फार खालावली होती, त्यामुळे ते वाचू शकले नाहीत. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

तेव्हा केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी, घर आणि जमीन देण्याचे वचन दिले होते.

लान्सनायक हनुमंथप्पाच्या ५ वर्षाच्या मुलीच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्याचे देखील बोलले गेले होते. आता या घटनेला ३ वर्षे होऊन गेलीत पण, शहीद लान्सनायक हनुमंथप्पाच्या कुटुंबाला जमीन, घर तर दूरच त्यांच्या पत्नी महादेवी यांना साधी नोकरी सुद्धा मिळालेली नाही. शहिद झालेल्या हनुमंथप्पा यांच्या कुटूंबाकडे आज कोणताच आर्थिक स्त्रोत नाही.

हनुमंथप्पा यांच्या पत्नींनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं होतं की,

दोन वर्षांपुर्वी केंद्र सरकारकडून मला एक पत्र मिळालं होतं. त्यामध्ये धारवाड जिल्ह्यातील रेशीम विभागात मला नोकरी करण्याविषयी विचारण्यात आलं होतं. तिथे मला ६ ते ८ महिने अस्थायी स्वरूपाची नोकरी मिळाली. पण जेव्हा तेथील अधिकाऱ्यांना मी नोकरीवर कायम करण्याविषयी विचारलं तेव्हा मला कोणतच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर मी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांसोबतच अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पत्र लिहली. पण कोणाचच उत्तर आलं नाही.

हनुमंथप्पा यांच्या पत्नी पुढे सांगतात की, स्मृती इराणी यांनी त्यांना नोकरी मिळवून देण्याबद्दल एक ट्विट केले होते. स्मृती इराणी हुबळी दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्या ट्विटची आठवण करुन दिली होती पण अस कोणतच ट्विट त्यांनी केलं नसल्याच सांगितलं. त्यांनी ट्विट केल्याबद्दल स्पष्ट नकार दिला.

कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर बेतादूर जवळ त्यांना चार एकर पडिक जमिन देण्यात आली. त्या जमिनीत कोणतच उत्पन्न निघत नाही. आपल्याला घर नाही की, नोकरी नाही. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे पण त्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत नाही. सरकारकडे मागणी केली पण शहिद झाल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करणारे सरकार आत्ता मात्र हात वर करत असल्याचं त्यांनी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं होतं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.