मॅराडोना होण्याचं स्वप्न पाहणारा सिद्धार्थ हिंदी सिरियलचा सर्वात मोठा स्टार बनला..

बॉलिवूडमध्ये ग्लॅमर तयार करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी छोट्या पडद्यावर हिट व्हावं लागतं.

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात मोठा सुपरस्टार असलेल्या सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालंय. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं स्टारडम सिद्धार्थ शुक्लाचं होतं. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थचं निधन हे हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं आहे. ४० वर्षांचा असलेला सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस या रियालिटी शोचा विजेता होता आणि सोबतच तो खतरो के खिलाडी या शोचा सुद्धा तो विजेता होता.

सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी रात्री झोपेच्या गोळ्यांचं सेवन केलं होतं आणि त्यानंतर तो उठलाच नाही आणि झोपेतच त्याच निधन झाल्याचं सांगण्यात आलं. टीव्ही इंडस्ट्रीसाठी सिद्धार्थ शुक्लाचं निधन हा मोठा धक्का मानला जात आहे. बिग बॉस या रियालिटी शो ला खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणण्याचं श्रेय हे सिद्धार्थ शुक्लालाच जातं. अनेक तरुण मुलं मुली सिद्धार्थच्या बॉडी फिटनेस आणि पर्सनॅलिटीचे चाहते होते. 

एक नजर सिद्धार्थ शुक्लाच्या करिअरवर टाकूया. १२ डिसेंबर १९८० साली त्याचा जन्म महाराष्ट्रात मुंबईत झाला होता. कॉलेज काळामध्ये इंटेरियर डिझाईनचा कोर्स सिद्धार्थने पूर्ण केला होता. पण अभिनय किंवा इंटेरियर डिझाईनिंग हे त्याच पहिलं प्रेम नव्हतं. त्याच पाहिलं प्रेम फुटबॉल होतं. लहानपणापासून त्याने मॅराडोना होण्याचं स्वप्न पाहिलेलं. मध्यंतरी फेमस इटालियन टीम एसी मिलान जेव्हा भारतात आली तेव्हा अंडर -१९ मधून सिद्धार्थ शुक्ला त्यांच्या विरुद्ध खेळला होता.

पण फुटबॉल मध्ये करियर करायचं त्याच स्वप्न अधुरंच राहिलं. ज्यावेळी तो इंटेरियर डिझाईनचा कोर्स करत होता तेव्हा त्याला अभिनयाची गोडी लागली, शिक्षण पूर्ण करत असताना त्याला जाणवलं कि टीव्ही क्षेत्रात आणि सिनेमात जास्त स्कोप आहे.

खेळाची आवड असल्याने त्याची पर्सनॅलिटी चांगली होती याच कारणामुळे तो टीव्ही क्षेत्रात चांगलाच हिट झाला. २००८ साली त्याला पहिली सिरीयल मिळाली ती म्हणजे बाबुल का अंगना छुटे ना से…स या  सिरियलनंतर ए अजनबी आणि लव्ह यु जिंदगी या मालिकांमध्ये त्याने काम केलं. पण पाहिजे तशी प्रसिद्धी सिद्धार्थ शुक्लाला मिळत नव्हती. 

याच दरम्यान २०१२ साली बालिका वधू नावाची मालिका कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झाली आणि खऱ्या अर्थाने सिद्धार्थ शुक्ला भारतभर प्रसिद्ध झाला. बालिका वधू सीरियलमध्ये शिवराज शेखर हे पात्र साकारलं आणि प्रेक्षकांना ते चांगलंच भावलं. २०१३ साली झलक दिख ला जा या रियालिटी शोमध्ये सुद्धा सिद्धार्थने आपला जलवा दाखवला. सोबतच पवित्रा रिश्ता या मालिकेत गेस्ट ऍपेरियन्स सुद्धा त्याने केला होता.

काही वर्षांपूर्वी करण जोहर निर्मित हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया या सिनेमात सिद्धार्थने सपोर्टींग ऍक्टरचा रोल केला होता, या सिनेमातला सिद्धार्थ चांगलाच भाव खाऊन गेला. या भूमिकेसाठी स्टारडस्ट अवॉर्ड सिद्धार्थला मिळाला होता.

२०१६ मध्ये खतरो के खिलाडीच्या ७ व्या सिजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला होता. कॉमेडी नाईट्स, इंडियाज गॉट टॅलेंट आणि बिग बॉस या शोजमध्ये सुद्धा तो सहभागी होता. २०१९ मध्ये बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्ये सिद्धार्थ शुक्ला पॉप्युलर स्टार झाला आणि ह्या शोचं जेतेपद सुद्धा त्याने मिळवलं. छोट्या पडद्यावरचा मोठा स्टार म्हणून सिद्धार्थ शुक्ला ओळखला जायचा, पण त्याच्या अकस्मात निधनाने मालिका क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.